26.2 C
Panjim
Sunday, July 25, 2021

मी आषाढ बोलतोय…

  • मीरा निशिथ प्रभुवेर्लेकर

सृष्टीत नवनिर्मिती करणार्‍या, वैशाखतप्त झालेल्या निसर्गाला, मानवाला, पशुपक्ष्यांना आपल्या अमृतधाराच्या वर्षावाने शांत करणार्‍या या माझ्या सखीची- आषाढसरींची सर अन्य कोणत्याही मासातल्या सरींना थोडीच येईल!

नमस्कार! आम्ही आलोय… नाही ओळखलंत? अहो मी तो- आषाढमास! ‘नेमेचि येतो मग पावसाळा’ या उक्तीनुसार मी झालो की हो हजर… आपल्या सेवेसाठी! हैराण झाला होता ना वैशाखवणव्याने? आता मनसोक्त झेला अंगावर माझ्या नावाच्या धारा- आषाढधारा आणि उपभोगा गारवा, थंडावा, ओलावा!
हिंदू कालगणनेनुसार माझा चौथा नंबर लागतो हे तर तुम्ही जाणताच. सूर्य मिथुन राशीत असताना माझ्या अस्तित्वाला प्रारंभ होतो. अस्मादिक अवतरले की व्यासपूजा, दीपपूजन, कोकिळव्रत… काय नि काय चालू होतं. याच मासाच्या अमावास्येच्या तिथीला पूर्वजांचे स्मरण करून त्यांना श्राद्ध घातले जाते. गोरगरिबांना अन्नदान, वस्त्रदान, दक्षिणा देऊन पिंपळालाही जलार्पण केले जाते. भाविक या पारंपरिक प्रथा आजही पाळताना दिसतात तेव्हा मी समाधान पावतो.
आता ऋतूचा अर्थ फिरता काळ. निसर्गनियमानुसार सहाही ऋतूंच्या वार्षिक फेर्‍या अव्याहतपणे चालू असतात. सगळे ऋतू आपापल्या खासियतीनिशी प्रकट होतात. पण त्या ‘वसंता’चं कोण कोडकौतुक! अस्मादिक भी कुछ कम नहीं! आमच्या सोबतीने येणार्‍या वर्षाराणी काय कमी सुंदर दिसतात? या वर्षामुळे वसुंधरा कशी देखणी होते! हं! आहे आमची वर्षा तशी थोडीशी खट्याळ, चंचल, लहरी आणि प्रसंगी तापटही बरं का! एकदा का ही अवतरली की हिच्या बरसण्याला ना ताळ असतो ना तंत्र. रुद्रावतार धारण केला की धो-धो कोसळून सर्वांनाच भंडावून सोडेल. हिच्या लहरीपणामुळे क्षणापूर्वी लख्ख प्रकाशात सूर्यस्नान घेणारी सृष्टी पळभरात आषाढधारांत जलस्नान करताना दिसेल. सकाळी नितळ दिसणार्‍या मातकट मातीवर संध्याकाळी नाजूक तृणांकुरही उगवण्याचा चमत्कार करणारी ही किमयागारच वाटते. ही जादू ती करू शकते ते केवळ माझ्या वास्तव्यातच हं!
तिच्या लहरीनुसार विविध रूपं ल्यालेली ही सर्वांना दृष्टिसुख देण्याबरोबरच मनालाही टवटवी देते. रसिक म्हणतातच की- धरित्रीचं लावण्य निरखावं ते आषाढ मासातच! कारण, पानझडीमुळे ओकीबोकी झालेली सृष्टी माझ्या आगमनानंतर जणू अंगाभोवती हिरवी शाल लपेटून घेतल्यासारखी दिसते. हिला पाहून बाकीबाबांच्या लेखणीतून तर काव्यसरीच बरसल्या- सृष्टीला लागला पाचवा महिना, गडद निळे जलद भरून आले, सरीवर सरी वगैरे… या काव्यसरी आषाढसरीतच बरसतात की नाही? निसर्गात अंकुरणार्‍या तृणांकुरांप्रमाणेच कवीच्या प्रतिभेला आणि सर्जनशीलतेला अंकुर फुटण्याचा हाच तो मुहूर्तमास. काव्यजन्मासाठी पोषक असं वातावरण तयार होतं ते याच मासात असं मी ठामपणे म्हणतोय.

प्रेमीजनांना या आषाढधारा किती भावुक बनवत असतात. आषाढ मासात रोपट्यांना अंकुर, कवींना काव्यांकुर तर प्रेमीजनांना प्रेमांकुर फुटत असतात. एखादी प्रेमिका ‘बरस असा की प्रिया न जाईल माघारी घरात’ अशी, तर दुसरी प्रियतमा ‘मेघा रे मेघा रे, मत परदेश जा रे’ अशी विनवणी करते. तर एखादं प्रेमियुगुल आषाढसरींच्या बरसातीत ‘प्यार हुआ इकरार हुआ’ म्हणत भिजू नये म्हणून एकाच छत्रीत खेटून चालतात आणि तरीही चिंब भिजून जातात… परस्परांच्या स्पर्शसुखात!
आणि आपला बळीराजा? तो तर वैशाखवणव्यात भेगाळलेल्या जमिनीवर कधी एकदा वरुणराजाची कृपा होते याच प्रतीक्षेत असतो. ‘बरसो रे मेघा, मेघा बरसो’ अशी त्याने घातलेली आर्त साद वर्षाराणीच्या हृदयाचं पाणी पाणी करते आणि मग ती काकुळतीने काळजात दाटून आलेल्या जलधारांचा वर्षाव करते. अशावेळी ‘घुमड घुमडकर आयी रे घटा’ असे सूर आळवत आभाळातल्या जलधारांत आपलेही आनंदाश्रू मिसळतो.

माझ्या पदार्पणाच्या प्रथम दिवसाला ‘कालिदास दिन’ म्हणून फार महत्त्व आहे. या थोर विभूतीच्या स्मृतींशी मी कायम संलग्न झालोय याचा मला सार्थ अभिमान वाटतो. यांच्यामुळेच तर आषाढमहिमा वृद्धिंगत होतो. कविकुलगुरू कालिदासांनी ‘मेघदूत’मध्ये माझ्या आगमनानंतरच्या पहिल्या पावसाचं फार सुरेख वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात-
आषाढस्य प्रथम दिवसे मेघमाश्लिष्ट सानुं|
वप्रक्रीडा परिणतगज प्रेक्षणीयं ददर्श॥
एकमेकांना आदळून गर्जना करणारे ढग झगडणार्‍या राक्षसाप्रमाणे भासतात. पण हेच मेघ पुढे काही क्षणात एकमेकांच्या बरोबरीने मागील सर्वकाही विसरून संथपणे आकाशात विहरताना दिसतात. या आषाढमेघांपासून माणसं काहीतरी बोध घेतील का?
मानवी शैशवाचं आणि माझं एक अतूट नातं जमलंय. आषाढसरींच्या ओसंडण्याबरोबर घरातील सार्‍या बच्चेकंपनीच्या ओसंडणार्‍या आनंदाची अनुभूती मी वर्षानुवर्षे घेत आलेलो आहे. हे अवखळ बालगोपाळ साचलेल्या जलात जोरजोरात ‘कदमताल’ करून एकमेकांवर चिखल टाकण्याचा खट्याळपणा करतात. शिवाय वर्तमानपत्रं फाडून बनवलेल्या छोट्या-छोट्या होड्या पाण्यात सोडून त्यांच्या स्पर्धाही लावल्या जातात. आयुष्यातील सर्वात सुरम्य काळातील या गोड आठवणींचा मनात तयार झालेला अल्बम ही खास वयोवृद्धांसाठी माझी भेट असते… कधीच न तुटणारी… न पुसणारी!
माणसं उत्सवप्रिय आणि श्रद्धाळू असतात. ‘आषाढी एकादशी’ हा सर्व भाविकांसाठी एक धार्मिक सण. विठ्ठलभेटीसाठी भुकेलेले वारकरी तर तहानभूक विसरून हरी नामाचा गजर करत टाळ-मृदंगाच्या नादात तल्लीन होऊन नाचत-नाचत अनवाणी मार्गक्रमण करतात. या वारकर्‍यांना ना आपल्या तब्येतीची, ना काटाकुट्यांची, ना डोईवर भिजणार्‍या कांदा-भाकरीची पर्वा. आपापसातले तंटे विसरून गरीब-श्रीमंत, जात-पात या भेदभावांना यांना इथे थारा न देता एकदिलाने कसे नांदावे याचा वस्तुपाठच घालून देतात. मानवजातीच्या एकोप्याचा धडा गिरवावा तो इथेच! मानवतेचं केवढं मोठं शिक्षण माणसांना इथं मिळतं. मग या आषाढमासाला मूठभर मांस चढले तर त्यात नवल ते काय?
जाता जाता एवढंच सांगतो की सृष्टीत नवनिर्मिती करणार्‍या, वैशाखतप्त झालेल्या निसर्गाला, मानवाला, पशुपक्ष्यांना आपल्या अमृतधाराच्या वर्षावाने शांत करणार्‍या या माझ्या सखीची- आषाढसरींची सर अन्य कोणत्याही मासातल्या सरींना थोडीच येईल!

STAY CONNECTED

847FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

हाहाकार

गोव्याच्या बर्‍याच भागांमध्ये पुराने काल हाहाकार माजविला. गेले काही दिवस सतत अविश्रांत कोसळणार्‍या मुसळधार पावसामुळे धरणे पूर्ण क्षमतेने भरल्याने ही वेळ ओढवणार...

राज्यात पुरामुळे हाहाकार

>> कोट्यवधी रुपयांचे नुकसान >> आज व उद्या सतर्कतेचा इशारा >> २० रेल्वे रद्द

दूधसागर येथे दरड कोसळून रेल्वेचे डबे रुळावरून घसरले

राज्यात कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा फटका रेल्वे सेवेलाही बसला. शुक्रवारी दूधसागरजवळ मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. दरड कोसळल्यामुळे एका प्रवासी गाडीचे दोन डबे...

सुपाची पूड, हरवळेत ३० जणांना वाचवले

सुपाची पूड हरवळे येथील सुमारे तीन कुटूंबांतील ३० लोक दीड मीटर पाण्यात अडकून पडले होते. या सर्वांची डिचोली अग्निशामक दलाचे अधिकारी श्रीपाद...

गोपाळराव मयेकर यांना अखेरचा निरोप

गोव्याचे माजी शिक्षणमंत्री, माजी खासदार, ज्ञानेश्‍वरीचे गाढे अभ्यासक गोपाळराव मयेकर यांच्या पार्थिवावर काल शुक्रवारी म्हापसा येथील वैकुंठधाम स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. गोपाळराव...

ALSO IN THIS SECTION

समान नागरी कायदा काळाची गरज

दत्ता भि. नाईक दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश न्यायमूर्ती प्रतिभा सिंह यांनी संपूर्ण देशाला एक समान नागरी कायदा असावा...

गुंतवणूकदारांसाठी ‘आरईआयटी’त बदल

शशांक मो. गुळगुळे ‘सेबी’ने नुकतेच ‘रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेन्ट ट्रस्ट’च्या नियमावलीत बदल केले. बांधकाम उद्योगाला निधीचा पुरवठा व्हावा या...

डबुलं

डॉ. आरती दिनकर हाय रे देवा! मला ते दागिन्यांचं गाठोडं कुठेच दिसेना. मग रडूच यायला लागलं. मी आणि...

विलक्षण

गिरिजा मुरगोडी कधी देवराईत, कधी दाट वनात, कधी घनगर्द पण छान अशा जंगलात काहीतरी वेगळं जाणवत राहातं. भारून...

आषाढ महिमा वर्णावा किती…

डॉ. गोविंद काळे झपाट्याने बदलणार्‍या वेगवान काळाच्या ओघात कितीतरी गोष्टी कालबाह्य बनल्या. आषाढ आणि आषाढवारी त्याला अपवाद. माणसा-माणसांतील...