पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कालचा श्रीनगर दौरा ऐतिहासिक महत्त्वाचा आणि अभूतपूर्व स्वरूपाचा म्हणावा लागेल. खरे म्हणजे मोदींची ही काही पहिली श्रीनगर भेट नव्हे. परंतु भारतीय संविधानाच्या 370 व्या कलमाला संपुष्टात आणल्यानंतरची त्यांची ही पहिली भेट होती आणि ज्या उदंड उत्साहात पंतप्रधानांचे तेथे स्वागत झाले, जो प्रचंड प्रतिसाद त्यांच्या सभेला लाभला आणि ज्या निर्भयतेने जम्मू काश्मीरची जनता व्यक्त झाली, हा चमत्कार खरोखर पाहण्या – अनुभवण्यासारखा होता. जम्मू काश्मीर हा आपला परिवारच असल्याची ग्वाही पंतप्रधानांनी ह्या सभेमध्ये दिली आणि जम्मू काश्मीरवासी आपल्या मनात आणि ह्रदयात कायम वसत असल्याचे आवर्जून नमूद केले. हा दौरा आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होता, त्यामुळे त्या अनुषंगाने आपल्या सरकारची कामगिरी अधोरेखित करण्यासाठी ही ‘विकसित भारत विकसित जम्मू काश्मीर’ सभा आयोजित करण्यात आली होती हे जरी खरे असले, तरी ह्या निमित्ताने बदलत्या काश्मीरचे जे दर्शन जगाला घडले ते निश्चितच सुखावणारे आहे. आज काश्मीरमध्ये दगडफेक करणारे तरूण दिसत नाहीत, उठता बसता हरताळ पाळले जात नाहीत. एकेकाळी जिथे भारताचा तिरंगा फडकवणे अशक्यप्राय ठरत होते, तेथे आज काश्मिरी तरूणच भारतीय तिरंगा मिरवत आहेत, ‘हम हिंदुस्थानी, हिंदोस्ताँ हमारा है’ च्या घोषणा देत आहेत, हा बदल निश्चितपणे फार मोठा आणि महत्त्वाचा आहे आणि आता तरी तो जगाचे डोळे उघडील अशी अपेक्षा आहे. दहशतवादाच्या नाकावर टिच्चून ही सभा श्रीनगरमध्ये काल झाली. गेल्यावेळी मोदी श्रीनगरला गेले होते, तेव्हा दल सरोवराच्या काठी असलेल्या शेर ए कश्मीर इंटरनॅशनल कन्वेंशन सेंटरमध्ये बंद सभागृहात त्यांची सभा झाली होती, परंतु यावेळची सभा कडेकोट सुरक्षेत, परंतु खुल्या बक्षी स्टेडियममध्ये होती हा बदल ह्या काळात घडलेला आहे. गेल्यावेळी दल सरोवरात पंतप्रधानांनी सफर केली तेव्हा ते तेथे कडेकोट सुरक्षेत एकटेच होते. कालच्या सभेमध्ये हजारोंचा जनसमुदाय त्यांच्यापुढे उपस्थित होता आणि आणखी एक लाख लोक जम्मू काश्मीरच्या 285 ब्लॉकमधून ऑनलाइन सहभागी झाले होते. काश्मीरच्या जनतेच्या आशाआकांक्षा कालच्या कार्यक्रमात अभिव्यक्त झाल्या. इतरांना आदर्श घालून देतील अशी उदाहरणे काश्मिरी युवकांपुढे मांडली गेली. दहशतवादाच्या मार्गाने जाल तर शेवटी विनाशच नशिबी येईल, परंतु सरकारने देऊ केलेला हात स्वीकारण्यास पुढे याल तर विकास आणि प्रगतीच्या वाटेवरून चालू लागाल आणि स्वउत्कर्ष करून घ्याल हा संदेश कालच्या सभेने काश्मिरींना दिला आहे. दोन आठवड्यांपूर्वी जम्मूमध्ये पंतप्रधानांनी बत्तीस हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली होती. काल पुन्हा काश्मीरसाठी पाच हजार कोटींचे पॅकेज घोषित झाले. फलोत्पादन, शेती आणि पशुसंवर्धन क्षेत्रापासून पर्यटनापर्यंतच्या विविध क्षेत्रांसाठी नानाविध योजना घेऊन केंद्र सरकार आम काश्मिरी जनतेचा विश्वास प्राप्त करण्यास पुढे सरसावले आहे आणि त्याला भरभरून प्रतिसादही मिळतो आहे. काश्मिरी जनता बुद्धिमान आहे. उद्यमी आहे. फक्त आजवर तिला दहशतवादाच्या धाकात ठेवण्यात आले. फुटिरतेचे विष सातत्याने तिच्या मनात कालवले गेले. शिक्षण, उद्योग, विकास यापासून वंचित ठेवणारे आणि जनतेला जवळजवळ वेठीला धरणारे स्वार्थी राजकारण स्थानिक राजकारण्यांनी केले. आज त्यापासून मुक्ततेचा क्षण त्या प्रदेशात आलेला आहे आणि त्यामुळेच आम जनता ह्या नव्या बदलांकडे मोठ्या आशेने आणि अपेक्षेने पाहते आहे. पंतप्रधानांच्या कालच्या सभेला बारामुल्लापासून बांदिपुरापर्यंतचे लोक दूरदूरून हजर होते. स्वखुशीने आणि निर्भयपणे गाड्या भरभरून येऊन हे लोक सभेत सहभागी झाले होते. राज्यामध्ये घडणारा बदल ही जनता पाहते आहे. युवा, महिला, निर्वासित, अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय, पहाडी आणि इतर जनजातींना मिळणाऱ्या सोयीसुविधा अनुभवते आहे. साहजिकच स्वविकासाच्या नानाविध संधी पुढे उभ्या आहेत हे जाणवलेली काश्मिरी जनता मुख्य प्रवाहात सामील होण्यासाठी पुढे सरसावली आहे. फुटिरतावाद्यांनी आजवर चालवलेला अपप्रचार ऐकण्याच्या मनःस्थितीत ती नाही. खोऱ्यातील देशद्रोही शक्तींच्या सर्व नाड्या राष्ट्रीय तपास संस्थेने आणि लष्कराने व्यवस्थित आवळून धरल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उपद्रव राहिलेला नसल्याने जनतेच्या आशाआकांक्षा मुखर होऊ लागल्या आहेत आणि हीच बदलत्या काश्मीरची खूण आहे. पंतप्रधानांच्या ह्या मिशन कश्मीरला केवळ राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहिले जाऊ नये, राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने पाहिले जावे. बदलू लागलेले काश्मीर शांतता आणि विकासाच्या वाटेवर परतावे हीच इच्छा.

