Home बातम्या मिर्ची कसा मिळणार?

मिर्ची कसा मिळणार?

0

दाऊद इब्राहिमचा तथाकथित ‘उजवा हात’ महंमद इक्बाल मेमन ऊर्फ इक्बाल मिर्ची याला लंडनमध्ये अटक झाली असली तरी त्याच्यासंदर्भातील पूर्वीचा अनुभव लक्षात घेता त्याचा ताबा भारताला मिळणे आणि त्याच्या माध्यमातून त्याचा कर्ता करविता असलेल्या दाऊदपर्यंत पोहोचणे ही फार कठीण व जवळजवळ दुरापास्त अशी कामगिरी आहे. भारतीय तपास यंत्रणांना त्यात यश येईल का हा मोठा सवाल आहे. मिर्ची पकडला जाण्याची ही काही पहिली वेळ नव्हे. ९४ साली जेव्हा त्याने आपल्या इंग्लंडमधील तांदळाच्या गिरणीचा व्यवस्थापक अमर सुवर्णा याचा मुंबईत काळा घोडा परिसरात ‘गेम’ केला होता, तेव्हा त्या खुनाच्या गुन्ह्यात त्याला इंग्लंडमध्ये अटक झाली होती. परंतु तेव्हा त्याचा ताबा मिळवण्यात भारतीय यंत्रणा अपयशी ठरल्या. ‘तांत्रिक कारणा’ंवरून भारताची त्याच्या हस्तांतरासंबंधीची याचिका फेटाळली गेली आणि पुढे स्कॉटलंड यार्डनेही त्याला खुनाच्या आरोपातून दोषमुक्त करून टाकले.

त्यामुळे आजतागायत तो ब्रिटनमधल्या एसेक्स काऊंटीमध्ये हॉर्नचर्चला सुखाने राहात आला आहे. त्याचे तेथे आलिशान हॉटेल आहे, तांदळाच्या गिरणीचा दिखाऊ व्यापार आहे. यावेळी इंटरपोलच्या रेड कॉर्नर नोटिशीमुळे इक्बाल मिर्चीचे हात अडकले असले, तरी त्याच्या हस्तांतरणासंदर्भात अनंत अडचणी उद्भवणार आहेत. ब्रिटनशी भारताचा गुन्हेगारांच्या हस्तांतरणासंबंधी करार असला, तरीदेखील ती प्रक्रिया पार पाडण्यासाठी सबळ पुरावे असावे लागतात, त्या गुन्हेगाराचे भारतीय नागरिकत्व सिद्ध करावे लागते. पुराव्यांचा डोंगर उभा करावा लागतो. त्यात अनेकदा सहेतुक वा अहेतुक अपयश येण्याचे प्रकार घडले आहेत. काही वेळा ज्या देशांशी आपला हस्तांतरणाचा करारदेखील नाही अशा देशातून गुन्हेगारांचे हस्तांतरण सबळ पुराव्यांमुळे शक्य झाले आहे, तर काही वेळा वैध करार असूनही पुराव्यांअभावी हातातोंडाशी आलेले गुन्हेगार निसटले आहेत. एकेकाळी बबलू श्रीवास्तव या गुंडाला सिंगापूरमध्ये पकडले गेले तेव्हा त्याच्यापाशी नेपाळी पासपोर्ट होता. परंतु तरीही भारतीय अधिकार्‍यांनी सबळ पुरावे उभे करून सिंगापूरशी हस्तांतरण करार झालेला नसताना त्याचा ताबा मिळवला होता. पण मिर्चीविरुद्ध सबळ पुरावे असून व भारताचा हस्तांतरण करार असूनही ब्रिटनने त्याचा ताबा देण्यास नकार दिला होता. या स्थितीमध्ये इक्बाल मिर्चीच्या गुन्हेगारीच्या इतिहासाचे सबळ पुरावे आता भारतीय तपास यंत्रणांना गोळा करावे लागतील. एकेकाळी मुंबईत ‘गोदी का चोर’ म्हणूनच ओळखल्या जाणार्‍या इक्बाल मेमनने आजचे एवढे मोठे आंतरराष्ट्रीय साम्राज्य कसे उभे केले, कोणत्या पैशावर उभे केले त्याची संगती तपास यंत्रणांना लावावी लागेल. तो दाऊदच्या अंमली पदार्थांच्या तस्करीचा म्होरक्या आहे असे म्हटले जाते. ‘मँड्रेक्स’ गोळ्यांचा कारखानाच त्याने मुंबईजवळ वाशीत एकेकाळी उभारला होता. ऐंशी लाख गोळ्यांचा ‘माल’ एकदा पकडला गेला आणि मिर्चीच्या या काळ्या कारवायांचे बिंग फुटले. पण तो भारतातून फरार झाला आणि ब्रिटनमध्ये त्याने तळ ठोकला. तेथील कायद्याच्या कचाट्यात न सापडता वैध व्यवसायांच्या आडून त्याने आपले गैर धंदे चालवले हे उघड आहे. दाऊद टोळीच्या कार्यपद्धतीत गेल्या काही वर्षांमध्ये मोठा बदल दिसून येतो आहे. एकेकाळी खंडणीखोरी हेच या टोळीच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते, परंतु गतवर्षीे मुंबईत खंडणीच्या आरोपावरून जे १६० गुन्हेगार पकडले गेले, त्यापैकी एकही दाऊद टोळीतला नव्हता. जे होते ते एक तर छोटा राजनच्या किंवा भरत नेपाळीच्या टोळीतले होते. म्हणजेच दाऊद टोळीच्या उत्पन्नाचे स्त्रोत बदलले आहेत. त्यांच्या उपद्व्यापांची व्याप्ती वाढली आहे. पाकिस्तानची आयएसआय दाऊदची भारताविरुद्धच्या दहशतवादी कारवायांत मदत घेते हे उघड झालेले आहे. कुप्रसिद्ध ‘कराची प्रोजेक्ट’ दाऊदच्या मदतीनेच चालवला गेला असे म्हटले जाते. त्याशिवाय अंमली पदार्थ तस्करीचे आंतरराष्ट्रीय जाळे दाऊद टोळीने विणले आहे असे म्हणतात. इक्बाल मिर्ची हा या व्यवहारातला महत्त्वाचा दुवा आहे. तो भारताच्या ताब्यात आला तर दाऊदच्या व्यवहारांचा पोपटासारखा पाढा वाचेल. पण त्यासाठी तो ताब्यात कसा येईल हेच आधी पाहावे लागेल.