मिरामार-दोनापावल रस्त्याविरोधात जनहित याचिका

0
68
गेल्या जानेवारी महिन्यात १.३ कोटी रु. खर्च करून हॉट मिक्स डांबरीकरण करण्यात आलेल्या मिरामार-दोनापावला रस्त्याचे ६६ कोटी रु. खर्चून कॉंक्रिटीकरण करण्याचा गोवा सरकारने जो निर्णय घेतलेला आहे त्याला विरोध करीत ऍड. आयरीश रॉड्रिग्ज यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. सदर याचिका सोमवार दि. ५ मे रोजी सुनावणीस येणार आहे.

सदर रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम त्वरित थांबवावे व या बेकायदा कामामुळे सरकारी तिजोरीचे झालेले नुकसान व खर्च संबंधित अधिकार्‍यांकडून वसूल करून घ्यावा, अशी मागणी ऍड. रॉड्रिग्ज यांनी याचिकेतून केली आहे.
जानेवारी २०१४ ला मिरामार दोनापावला रस्त्याच्या मधोमध गटार लाईन टाकल्यानंतर रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात आले होते व आता त्याच रस्त्याचे तब्बल ६६ कोटी रु. खर्चून कॉंक्रिटीकरण करण्यासाठी रस्त्याचे खोदकाम चालले आहे याकडे आयरिश यांनी जनहित याचिकेतून लक्ष वेधले आहे.
रस्त्याच्या मधोमध असलेल्या गटार लाईनमध्ये जर काही बिघाड झाला तर कॉंक्रिटीकरण केलेल्या रस्त्याचे खोदकाम करावे लागणार असल्याचेही ऍड. रॉड्रिग्ज यांनी याचिकेतून नजरेत आणून दिले आहे. १.३ कोटी रु. खर्चून केलेले हॉटमिक्सिंग पुन्हा खोदून ६६ कोटी रु. खर्च करून या रस्त्याचे कॉंक्रिटीकरण करण्याची आवश्यकता नसल्याचेही त्यांनी जनहित याचिकेतून नजरेत आणून दिले आहे.