Home बातम्या मिरामार चोरी – २७ लाखांचे दागिने चालकाकडून हस्तगत

मिरामार चोरी – २७ लाखांचे दागिने चालकाकडून हस्तगत

0

मिरामार येथील समीर गुरुदास दुकळे या बिल्डराच्या सदनिकेतून चोरून नेलेले २७ लाख रु. चे दागिने त्यांचाच चालक लियोकार्डिओ फ्रान्सिस फर्नांडिस (सांतइनेज) याच्याकडून हस्तगत करण्यात आल्याची माहिती पणजीचे उपविभागीय अधिकारी देऊ बाणावलीकर यांनी दिली.

आरोपीने सदर दागिने पर्वरी येथे पिऊन टाकलेल्या शहाळ्यांच्या ढिगार्‍याखाली लपवून ठेवले होते. आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर ते हस्तगत करण्यात आल्याचे बाणावलीकर यांनी सांगितले. तक्रारदार दुकळे यांनी चोरी विषयीची तक्रार देताना १९ लाख २० हजार रु. एवढ्या किमतीचे दागिने चोरीस गेल्याचे म्हटले होते. मात्र, आरोपीच्या पत्नीने नंतर आणखी ८ लाख रु.चेही दागिने चोरीस गेलेले असून त्यात २ मोत्यांच्या बांगड्या, दोन पिड्डुकांच्या बांगड्या, दोन ब्रेसलेट, एक अंगठी, क्रिस्टल स्टोनची एक अंगठी, हिर्‍यांच्या कर्णफुलांचा एक जोड व एक कडा यांचा त्यात समावेश असल्याचे म्हटले होते. फ्लॅटचे दार न फोडता ही चोरी झाल्याचे आढळून आल्याने संशयाची सुई दुकळे यांच्या चालकाकडे वळल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. नंतर त्याने चोरीची कबुली दिली.