– नितीन कोरगावकर
मा. दत्ताराम स्मृती नाट्यमहोत्सवात गोमंतकीय रसिकांना ‘कौंतेय’, ‘शिवाजी अंडरग्राउंड…’, ‘तक्षकयाग’ यासारख्या वेगळ्या नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. त्यादृष्टीने हा महोत्सव रसिकांना पर्वणी ठरला. ‘नाट्यशुभांगी’ प्रस्तुत ‘इथे ओशाळला मृत्यू’चा प्रयोगही देखणा ठरला. ‘चौकट’ वसई – मुंबई निर्मित वि. वा. शिरवाडकर लिखित व ज्या नाटकात मा. दत्ताराम यांनी कर्णाची केलेली भूमिका अजरामर ठरली ते ‘कौंतेय’ नाटक मा. दत्ताराम महोत्सवात पहिल्या दिवशी सादर झाले. त्या प्रयोगाने रसिक भारावून गेले.
……..
कला अकादमीने मा. दत्ताराम यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित केलेल्या मा. दत्ताराम स्मृती नाट्यमहोत्सवात गोमंतकीय रसिकांना ‘कौंतेय’, ‘शिवाजी अंडरग्राउंड…’, ‘तक्षकयाग’ यासारख्या वेगळ्या नाटकांचा आस्वाद घेण्याची संधी मिळाली. त्यादृष्टीने हा महोत्सव रसिकांना पर्वणी ठरला. ‘नाट्यशुभांगी’ प्रस्तुत ‘इथे ओशाळला मृत्यू’चा प्रयोगही देखणा ठरला.
‘चौकट’ वसई – मुंबई निर्मित वि. वा. शिरवाडकर लिखित व ज्या नाटकात मा. दत्ताराम यांनी कर्णाची केलेली भूमिका अजरामर ठरली ते कौंतेय नाटक मा. दत्ताराम महोत्सवात पहिल्या दिवशी सादर झाले. त्या प्रयोगाने रसिक भारावून गेले. मा. दत्ताराम यांनी केलेली कर्णाची भूमिका कुठल्याही नटाला आव्हानच. प्रदीर्घ काव्यमय संवादांच्या माध्यमातून भावोत्कट कर्ण सादर करणे ही भल्या भल्या नटांची दमछाक करणारी गोष्ट. मात्र मा. दत्ताराम यांचे चिरंजीव नाना वळवईकर यांनी आपल्या वाचिक आणि कायिक अभिनयावरील प्रभुत्वाद्वारे हे शिवधनुष्य लीलया पेलले. त्यांना कुंतीच्या भूमिकेत सुमित्रा देवधर यांनी तितकीच तोलामोलाची साथ दिली. भावपूर्ण आवाजातील संवादफेक आणि तितकाच भावपूर्ण मुद्राभिनय याद्वारे त्यांनी यथार्थपणे कुंती साकारली.
नैसर्गिक हालचाली आणि रजनांद्वारे नाटकातील दृष्यबंधांचे आरेखन करण्यात आले आहे. त्याला सूचक नेपथ्य आणि प्रकाशयोजनेची साथ मिळाली आहे. या नाटकाच्या सादरीकरणात वेशभूषेचाही मोठा वाटा आहे. शिरवाडकरांचे काव्यमय भाषेतील प्रदीर्घ, पल्लेदार संवाद हे या नाटकाचे बलस्थान आहे. रंगावृत्ती संपादनात अनेक प्रसंगांना कात्री लागली असली तरी या नाटकात एकही बाहेरचा शब्द वापरण्यात आलेला नाही. मूळ नाटकात गीते नव्हती; परंतु कर्ण आणि कुंती यांची मनोवस्था अधोरेखित करण्यासाठी कवी कुसुमाग्रजांच्या कवितांचा गीते म्हणून समावेश करण्यात आला आहे. ही गीते नाटकातील विरामांच्या आणि काळोखाच्या जागा अर्थपूर्ण करतात.
कै. वि. वा. शिरवाडकर यांचे कौंतेय हे नाटक महारथी कर्णाचे आहे, तसेच ते त्याला पुत्र म्हणून नाकारणार्या त्याच्या मातेचे, म्हणजेच पांडवांची माता कुंतीचेही आहे. परंतु शिरवाडकरांनी लोकांना ज्ञात असलेली कर्ण-कुंतीची सर्वश्रुत कहाणी न मांडता, या व्यक्तिरेखांच्या मनोव्यापाराचे मनोज्ञ चित्रण या नाटकात केले आहे. सुमारे साठ वर्षांपूर्वी तत्कालीन नाट्यसंकेतानुसार लिहिलेल्या या नाटकात एका महान शोकांतिकेची बीजे आहेत. या नाटकात नाटककाराने कर्ण आणि कुंती यांची कर्तव्य, निष्ठा यांच्या चौकटीत त्यांच्या नाट्याची होणारी कुचंबणा, त्यांची भावनिक घालमेल आणि त्यांच्या परिपक्व मनुष्यत्वाचे दर्शन घडविले आहे. म्हणूनच या नाटकाचा शोकांत मन विदीर्ण करणारा आहे. कौंतेयची रंगावृत्ती व दिग्दर्शन विलास पागार यांचे होते. संदीप फाटक यांचे संगीत, निळू प्रभू यांचे नेपथ्य, स्वप्नाली वळवईकर यांची वेशभूषा, सदानंद कोरगावकर यांचे ध्वनिसंयोजन, श्रद्धा प्रभू व प्रसाद रानडे यांचे पार्श्वगायन हे सर्वच नाटकाला उठाव देणारे होते.
अंतर्मुख करणारे ‘शिवाजी अंडरग्राउंड…’
‘पब्लिक ओपिनियन प्रॉडक्शन’ निर्मित व अद्वैत थिएटर प्रकाशित बहुचर्चित अशा ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाने तर रसिकांना अंतर्मुख केले. शिवाजी महाराजांविषयीचा इतिहास व त्यांचा विचार याच्यापलीकडे जाऊन शिवाजी महाराजांचा मानवताधर्म खर्या अर्थाने रुजला असता. त्यांना धर्माच्या चौकटीत बंदिस्त करून विकृतपणाने इतिहास सांगितला गेला या सर्वांचे मर्मभेदी चित्र उभे करणारे व दांभिकपणावर प्रहार करणारे हे नाटक प्रायोगिकस्वरूपाचे वाटत असले तरी त्यात विनोद, पोवाडे, शाहिरी यांच्या माध्यमातून रंजकता निर्माण केल्याने प्रयोग अफलातून झाला आहे. ‘‘कल्पनारंजक इतिहास लिहून इतिहासाचे पुराण करून ठेवले आहे. शिवाजी महाराजांच्या किल्ले, तोरणे यावर बोलण्यापेक्षा धोरणांवर बोला…’’ अशी अनेक वाक्ये, मार्मिक संवाद या प्रयोगात टाळ्या घेऊन जातात.
विद्रोही शाहीर संभाजी भगत यांची संकल्पना, गीते व संगीत असलेले हे नाटक राजकुमार तांगडे यांनी अभ्यासपूर्णरित्या लिहिले आहे. नंदू माधव त्याचे निर्माते व दिग्दर्शक आहेत. त्यांनी हे नाटक अत्यंत प्रवाही केले आहे. प्रत्येक पात्राकडून त्यांनी करून घेतलेला अभिनय सहज सुंदर असाच आहे आणि प्रत्येक पात्राने जीव ओतून त्यात काम केले आहे. कैलास वाघमारे (मिलिंद कांबळे), मिनाक्षी राठोड (सावित्री), संभाजी तांगडे (धर्मा शाहीर), प्रवीण डाळींबकर (यम आणि यमाजी), राजू सावंत (पाशा), आश्विनी भालेकर (अक्का), गणेश शिंदे (दादा), वसुंधरा (वैशाली), राजकुमार तांगडे (वसळुकर), अनिल वाघमारे व नारायण वाघमारे (गोट्या व लोट्या) यांनी आपापल्या भूमिका उत्कृष्ट वठविल्या आहेत. यम व यमाजी झालेले डाळींबकर यांनी आपल्या अभिनयातून आविष्कृत केलेले विनोद लाजवाब होते.
कुठल्याही धर्माला ‘टार्गेट’ केलेलं नाही : तांगडे
लेखक राजकुमार तांगडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, या नाटकाची संकल्पना विद्रोही शाहीर संभाजी भगत यांची आहे. मी यापूर्वी शेतकर्यांच्या वीज समस्यांवर ‘आकडा’ नाटक लिहिले होते, त्याचे दोनशे प्रयोग झाले. ‘शिवाजी अंडरग्राउंड…’ हे नाटक उभे केलेले आम्ही बहुतेक सर्व शेतकरी. आम्ही व्यावसायिक कलाकार नव्हे. महाराष्ट्रात जेवढ्या जाती आहेत त्या सर्व जातीमधील आमच्या नाटकात कलाकार आहेत. एका विचाराने एकत्र आलो. महाराष्ट्रातलं राजकारण शिवाजी महाराजांभोवती फिरणारं. अशावेळी त्यांचा विचार घेऊन पुढे जायचे तर विकृतीकडेच जास्त कल! अशावेळी शिवाजी महाराजांचा समाजाला दिशा देणारा विचार पुढे नेण्यासाठी या प्रयोगाचे प्रयोजन होते. यात आम्ही कुठल्याही धर्माला ‘टार्गेट’ केलेलं नाही.
प्रयोगात विरोध अपेक्षित होता; परंतु महाराष्ट्रात कुठेही झाला नाही. महाराष्ट्र आता बर्यापैकी पुरोगामी झालाय. खरं म्हणजे या संहितेला हात घालणे धाडसाचे होते; परंतु शिवाजी महाराजांचा मानवता धर्माचा विचार आजच्या परिस्थिती या माध्यमातून पोचवायचा होता. संहिता लेखनासाठी मी गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता?’ चंद्रशेखर शिखरे यांचे प्रतीइतिहास, शरद पाटील यांचे ‘शिवाजीचे शत्रू मोहम्मदी की ब्राह्मण’ अशी पुस्तके वाचल्याची माहिती तांगडे यांनी दिली. या नाटकाचे २१० प्रयोग झालेत. २० मे २०१२ ला रंगमंचावर आलेल्या या नाटकासाठी १४५ दिवस निवासी तालमी कलाकारांनी घेतल्या. कला अकादमीत हा प्रयोग रसिकांनी उचलून धरला. कलाकारांना प्रयोग संपताच उभं राहून मानवंदना दिली.
राष्ट्रधर्माला साद घालणारं ‘तक्षकयाग’
या महोत्सवात ऐश्वर्या नारकर प्रस्तुत व ऐश्वर्या आर्टस एन थिएटर्स निर्मित राष्ट्रधर्मास साद घालणारे ‘तक्षकयाग’ हे सादर झालेले नाटक असेच अंतर्मुख व्हायला लावणारे होते. प्रथितयश अभिनेता अविनाश नारकर यांच्या शैलीदार वाचिक आणि कायिक अभिनयाने रसिकांना खिळवून ठेवणारे हे नाटक त्यांनीच दिग्दर्शित केले होते. आपण जितके वैश्विक होऊ पाहतो आहोत, तितकेच दिवसेंदिवस स्वार्थी व संकुचितही बनत चाललो आहोत. विश्वमानवतेची संकल्पना माणसांच्या मनात रुजण्याऐवजी धर्म, जाती, वंश, वर्ण यांचीच विषवल्ली सर्वदूर फैलावताना दिसते आहे. म्हणजेच निव्वळ भौतिक सुखसुविधांचा उपभोग घेण्यापुरतेच आपण वैश्विक आहोत का? बाकी मग आपण आपल्या जातीचे, धर्माचे, वर्ण-वंशाचे असतो. त्यातून उरलो सुरलो तर देशाचे असतो! एकीकडे आर्थिक उदारीकरणाची रसाळ फळे चाखत असताना माणसे जाती-धर्माच्या नावाने एकमेकांचे गळे घोटायलाही कमी करीत नाहीत, मग आपण सुसंस्कृत, प्रगल्भ झालो आहोत, या म्हणण्याला आधार काय?
आपला देश आज असंख्य व्याधींनी ग्रस्त आहे. सार्वत्रिक भ्रष्टाचार, महाकाय आर्थिक घोटाळे, संकुचित प्रांतवाद, जातीपाती आणि धर्मांधतेचे क्षुद्र राजकारण, वाढती गुन्हेगारी, समाजात चाललेला पराकोटीचा स्वार्थ या सगळ्याला तोंड देता देता आपण त्याचाच एक भाग बनत आहोत. एक सुजाण, सजग नागरिक म्हणून आपली कर्तव्यं मात्र आपण साफ विसरलो आहोत. देश, देशाभिमान या गोष्टींशी तर आपल्याला देणे-घेणंच नाही. आपण आपल्या व्यक्तिगत स्वार्थात एवढे गुरफटलो आहोत, की देशाप्रती असलेल्या जबाबदार्यांची आपल्याला जाणीवच उरलेली नाही. म्हणूनच अविनाश नारकर यांना राष्ट्रधर्मास साद घालणारं ‘तक्षकयाग’ नाटक करण्याची निवड भासली असावी यात दुमत नाही.
मुळात हे नाटक फाळणीपूर्व आणि फाळणीउत्तर भारताची व्यथा-वेदना मांडणारे नाटक आहे. ‘तक्षकयाग’मध्ये महाकाल आणि हब्बाल या दोन धर्मांचे नेते अखंड भगीरथ देशाच्या फाळणीची बोलणी करत असताना महाकालांच्या धर्मपीठाचे महागुरु या फाळणीस कडाडून विरोध करतात. परंतु फुटीरतावादी हब्बाल नेते कौसर आणि महाकालांचे शांतवादी नेते राजे मलयकेतू फाळणीस मान्यता देतात. भगीरथ देशाचे तुकडे होऊन हब्बालांचे स्वतंत्र हब्बालस्तान व महाकालांचे भगीरथ निर्माण होते. फाळणीत दोन्हीकडील हजारो लोक मारले जातात, अगणित निर्वासित होतात. कौसर यांच्या इच्छेनुसार स्वतंत्र हब्बालस्तान निर्माण होतो खरा; परंतु अल्पावधीतच ते हब्बालस्तानमधील लष्करशहांना नकोसे होतात आणि कौसर यांचा भ्रमनिरास होतो. फाळणीनंतरही हे लष्करशहा भगीरथ देशाची सतत कुरापत काढीत राहतात, हस्तकांकरवी दहशतवादी हल्ले करीत राहतात. राजे मलयकेतू मात्र त्यांना जशास तसे प्रत्युत्तर देण्याऐवजी शांतता व अलिप्तवादाची कास धरून शुभ्र कबुतरे तेवढी हवेत सोडत राहतात.
त्यांच्या कणाहीन नीतीपायी शोक संतप्त झालेले महागुरु मलयकेतू विरोधात बंड करतात. त्यांना अटक करून बंदिवासात टाकतात आणि त्यांचा धडाडीच्या शूर पुत्र कुणाल याला गादीवर बसवतात. तो हब्बालांच्या कन्येवर कुणालाचे प्रेम असतं. तो तिच्याशी विवाहबद्ध होऊ इच्छित असतो; परंतु महागुरु त्याला राजकीय गरजेपोटी वृषाली ऐवजी बलाढ्य शेजारी राष्ट्राच्या राजकन्येशी विवाह करण्याचा सल्ला देतात. मात्र, कुणाल त्यास राजी होत नाही. व्यक्तिगत भावनांपेक्षा राष्ट्रधर्म महत्त्वाचा, हे त्याला पटवू पाहतात पण त्याला ते पटत नाही. वृषालीला मात्र महागुरुंचे म्हणणे पटते. राष्ट्रधर्मासाठी ती आपल्या प्रेमाचं आणि मग प्राणांचेही बलिदान करते.
नाटककार प्र. ल. मयेकर यांनी ‘तक्षकयाग’मध्ये केलेली राष्ट्रधर्माबद्दलची मांडणी कालातीत आहे. हे नाटक नव्याने रंगमंचावर आणताना त्यांनी त्यांच्या मूळ संहितेत सद्य:परिस्थितीची नव्याने भर घालून प्रयोगाला समकालीन मूल्य प्राप्त करून दिलीत. नाटकातला आशय वर्तमानाशी जोडण्यात दिग्दर्शक अविनाश नारकर यांनी आपल्या धर्मगुरू या भूमिकेचे सोने केले आहे. राष्ट्रधर्माबद्दलची आंतरिक तळमळ, त्यामागचा व्यापक विचार त्यांच्या नसानसांतून वाहत असल्याचे जाणवते. मिलिंद सफई (कौसर), कुणाल लिमये (मलयकेतू), ललित प्रभाकर (कुणाल), मयुरा जोशी (वृषाली), सुनील मोहन (आलोम), महेश सुभेदार (देवदत्त) कपिल सुर्वे (विशाखादत्त), दीपक जायदे (सोल्दाद), स्मित कांबळे (प्रतिहारी) यांनीही आपापल्या भूमिका यथायोग्य वठविल्यात. मयुरा जोशी यांनी वृषालीचा समंजसपणा व राष्ट्रधर्माकरता प्रेमाचं बलिदान करण्याची उदात्त भावना उत्कटतेने व्यक्त केलीय. ललित प्रभाकरने कुणालची तडफ, वृषावरील उत्कट प्रेम या भावना छान आविष्कृत केल्यात. महेश सुभेदार (देवदत्त), कपिल सुर्वे (विशाखादत्त), दीपक जायदे (सोल्दाद), स्मित कांबळे (प्रतिहारी) यांनी आपली कामं व्यवस्थित केली आहेत.
‘इथं ओशाळला मृत्यू’ने रसिकांची मने जिंकली
‘नाट्यशुभांगी’ जयसिंगपूर निर्मित व डॉ. दयानंद नाईक दिग्दर्शित कै. प्रा. वसंत कानेटकर यांचे ‘इथे ओशाळला मृत्यू’ हे नाटक रसिकांची मने जिंकून गेले. औरंगझेबाच्या पाच लाख फौजेशी सलग आठ वर्षे कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती संभाजी राजे, ज्याने वयाच्या बत्तिसाव्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले. सर्वस्वाचे बलिदान केले. पण शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही महत्त्वपूर्ण किल्ला किंवा आपल्या आरमारातील एकही जहाज गमावले नाही. या विचारी, कवी, राज्यकर्त्याच्या आणि महापराक्रमी सेनानीच्या बलिदानाने महाराष्ट्र पेटून उठला. छत्रपती धर्मवीर संभाजी महाराजांच्या तेजस्वी कर्तृत्वाचे दर्शन घडविणारे हे नाटक!
नाट्यशुभांगीच्या कलाकारांनी ‘इथे ओशाळला मृत्यूचा’ प्रयोग नीट-नेटकेपणाने आणि प्रभावीपणे सादर केला. दिग्दर्शन, अभिनय, तांत्रिक अंग अशा सर्वदृष्ट्या प्रयोग दिलखेचक झाला. डॉ. दयानंद नाईक यांनी दिग्दर्शनाची बाजू उत्कृष्ट सांभाळली होती. प्रसंगानुरूप पात्रांकडून त्यांनी कायिक आणि वाचिक अभिनय उत्तमरीत्या करून घेतला आहे. बाळ टाकळीकर यांनी औरंगझेबाची भूमिका सहज-सुंदर, शैलीदारपणे करून रसिकांना प्रभावित केले. त्यांच्या अनेक लकबी, संवादफेक लाजवाब होती. कु. शब्दा कुंभार यांनी येसूबाईच्या भूमिकेत रंग भरला तो आपल्या लक्षवेधी अभिनयाने. त्यांची उत्कृष्ट संवादफेक, रंगमंचावरील नजाकतदार वावर, चेहर्यावरील भावाविष्कार उत्तम होता. संतोष कोळी ऊर्फ बाळ महाराज यांनी संभाजीच्या भूमिकेतील तडफ, हिंदवी स्वराज्याप्रतीची निष्ठा, करारीवृत्ती, निर्धार या सर्व भावना यथायोग्यपणे प्रकट केल्या. वतनदारीसाठी फितुरी करणार्या गणोजी शिर्केंची भूमिका शिरीष कुलकर्णी यांनी तडफेने सादर केली. मराठ्यांचे सेनापती मल्होजी झालेले कुमार हतळगे, अजित बिडकर (मौलमी), शिरीष यादव (आसदखान), कुणाल वैद्य (संताजी), अमोल वाळवेकर (धनाजी), विश्वास माळी (शेख निजाम), निखिल अणेगिरीकर (कवी कलश), रमेश यळगुडकर (प्रल्हाद निराजी) यांनीही आपल्या भूमिका समजून-उमजून सादर केल्याने भट्टी चांगली जमली होती.
मुकुंद पटवर्धन, विलास जाधव, रवींद्र ताडे, उमेश कानडे व भरत पाटील यांचे नेपथ्य, प्रसाद गद्रे, शिवराज पाटील, कुलसेन चौगुले यांची रंगभूषा, राजेश पाटील, सुनील पाटील, राजेंद्र हावळ यांची प्रकाशयोजना, राजेश जाधव, लक्ष्मण पाटील, भरत खिचडे यांचे पार्श्वसंगीत, नंदकिशोर मनियार, ऍड. राजेंद्र माने, सदाशिव कांबळे यांची वेशभूषा यांच्या तांत्रिक बाजू प्रयोग उत्कृष्ट होण्याच्या दृष्टीने पुरक होत्या. या समारोपाच्या प्रयोगाला पावसाचा जोर असूनही रसिकांनी गर्दी केली होती. शेवटपर्यंत रसिकांनी नाटकाचा आनंद लुटला. एक चांगला प्रयोग पाहिल्याचा आनंद रसिकांना निश्चितच मिळाला.
‘रायगड’ संकलित स्वरूपात
शिवगोमंतक प्रतिष्ठान, फोंडा निर्मित ‘रायगड’ हे एकमेव गोव्याचे नाटक या महोत्सवात होते. ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ या नाटकाचे संकलन करून ते सादर करण्यात आले. गोव्यातील सुपरिचित रंगकर्मी प्रशांत म्हार्दोळकर यांनी त्याचे संकलन व दिग्दर्शन केले होते. त्यांनी स्वत: त्यात शिवाजीची भूमिकाही वठविली होती. शिवाजी आणि संभाजी यांच्यामधील संघर्ष दाखविण्यात दिग्दर्शक या नात्याने ते यशस्वी झाले. त्यांनी दिग्दर्शक व अभिनेता म्हणून आपली कामगिरी चांगली बजावली होती. वर्धन कामत यांनी संभाजीची भूमिका तडफदारपणे सादर केली. विश्वजित फडते हंबीररावाच्या भूमिकेत शोभून दिसले. त्यांचा खणखणीत आवाज, संवादफेक भूमिकेला पुरक होती. गौरीश कोलवेकर (अण्णाजी दत्तो) व मंगेश कुंडईकर (मोरोपंत) आपापल्या भूमिकेत शोभून दिसले. राधा म्हार्दोळकर येसूबाईच्या भूमिकेत थोडी बालिश वाटली. त्यामुळे कणखरपणा जाणवला नाही. पण तिने धिटाईने भूमिका केली. नीता म्हार्दोळकर (सोयराबाई) व निहाल पारकर (राजाराम) यांच्या भूमिका ठीक होत्या. किरण नाईक (नेपथ्य), संजीवनी पेडणेकर (वेशभूषा), श्रीनिवास उसगावकर (प्रकाशयोजना), एकनाथ नाईक (वेशभूषा) यांच्या तांत्रिक बाजू प्रयोगास अनुसरून होत्या.
…………