माहिती आयोगाचे कामकाज मार्चपासून ठप्प

0
10

माहिती आयुक्तांची दोन्ही पदे रिक्तच; पदे लवकरच भरण्याची मागणी

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त ही पदे मार्च 2024 पासून रिक्त आहेत. त्यामुळे मागील तीन महिन्यांपासून माहिती आयोगाचे कामकाज ठप्प झालेे आहे.

राज्य सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याने मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त पदासाठी गेल्या जानेवारी 2024 मध्ये जाहिरात प्रसिद्ध केली होती; मात्र लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेमुळे नव्या मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांची अजूनपर्यंत नियुक्ती होऊ शकलेली नाही. आता, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता मागे घेण्यात आल्याने दोन्ही पदे लवकरात लवकर भरली जातील, अशी अपेक्षा नागरिक बाळगून आहेत.

माजी राज्य मुख्य माहिती आयुक्त विश्वास सतरकर आणि माजी राज्य माहिती आयुक्त संजय ढवळीकर यांचा कार्यकाळ मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपुष्टात आला. राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त यांच्या रिक्त पदांमुळे प्रलंबित माहिती अधिकार प्रकरणांच्या वाढत्या अनुशेषाला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनातील गैरप्रकार उघडकीस आणण्यासाठी आणि कामकाजातील पारदर्शकता जाणण्यासाठी माहिती मागणाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

माहिती हक्क कार्यकर्ते आणि संबंधित नागरिक मागितलेली माहिती जन माहिती अधिकाऱ्यांकडून वेळेवर न मिळाल्यानंतर, ते अपूर्ण माहिती असल्यास प्रथम अपील प्राधिकरणाकडे दाद मागू शकतात. त्याठिकाणी निर्धारित वेळेत माहिती न मिळाल्यास राज्य माहिती आयोगाकडे अर्ज दाखल करून माहितीचा पाठपुरावा करू शकतात. आरटीआय कायद्याच्या योग्य अंमलबजावणीसाठी आयोगाची पदे वेळीच भरण्याची गरज आहे, असे आरटीआय कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. आयोगाची पदे रिक्त असल्याने प्रकरणे निकाली काढण्यास होत असलेला विलंब म्हणजे आवश्यक ती माहिती मिळविण्यात आपला बहुमोल वेळ वाया जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.