Home बातम्या माहिती आयुक्तांची नावे २९ रोजी जाहीर

माहिती आयुक्तांची नावे २९ रोजी जाहीर

0

ज्या ज्या उमेदवारांनी वरील पदांसाठी अर्ज केले होते त्या सर्वांची नावे वेबसाईटवर टाकली जावीत ही गोवा आरटीआय फोरमने केलेली मागणीही मुख्यमंत्र्यानी मान्य केली.

सगळ्या उमेदवारांची नावे वेबसाईटवर टाकण्यात येतील, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले की माहिती हक्क कायद्याचा आपण एक खंदा समर्थक आहे. काही लोक या कायद्याचा दुरुपयोग करतात ही गोष्टही खरी असल्याचे ते म्हणाले. आरटीआयद्वारे माहिती मिळवून मिळवलेल्या माहितीपैकी आपणाला सोयीची आहे अशीच माहिती जनतेपुढे आणणारे महाभागही कमी नसल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले.

दोन्ही पदांपैकी एका पदावर महिलेची नियुक्ती केली जावी ही गोवा आरटीआय फोरमची जी मागणी आहे त्यासंबंधी बोलताना ते म्हणाले की, आपलीही तशीच इच्छा आहे. मात्र, त्यासंबंधी अंतिम निर्णय निवड समिती घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हीच समिती येत्या २९ रोजी दोन्ही पदांसाठीच्या व्यक्तींची नावे जाहीर करणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

वरील प्रश्‍नावरून आपण उपोषणाला बसत असल्याचा एसएमएस राजन घाटे यांनी आपणाला पाठवला होता. मात्र, तो आपणाला एका दिवसाने उशिरा मिळाला. आपणाला तो मिळाला तेव्हा राजन घाटे उपोषणावर बसला होता. तो एसएमएस उपोषणाला बसण्यापूर्वी मिळाला असता तर आपण त्याला उपोषणाला न बसण्याचा सल्ला दिला असता, असे ते म्हणाले. दरम्यान, उपोषण सोडल्यावर बोलताना घाटे म्हणाले की, २९ रोजी नावे जाहीर करण्यात आली नाहीत तर आपण पुन्हा उपोषणावर बसेन. वरील दोन्ही पदांवर पात्र व त्या पदांना न्याय देऊ शकतील अशाच उमेदवारांची निवड केली जावी.

घाटे यानी उपोषण सोडल्यावर गोवा आरटीआय फोरमच्या पदाधिकार्‍यांनी राजन घाटे जिंदाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर आमदार विष्णू सूर्या वाघ हेही उपस्थित होते.