मास्टरमाईंड कोण?

0
10

प्राणघातक हल्ल्यातून केवळ नशीब बलवत्तर म्हणून सुखरूप बचावलेले सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांना अखेर तब्बल चोवीस दिवसांनंतर इस्पितळातून घरी परतता आले. इस्पितळातून बाहेर येताच त्यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे बोलताना काही प्रश्न उपस्थित केले, जे खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. रामा यांनी पत्रकारांना जे सांगितले, त्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि पक्षपाती भूमिकेवर बोट ठेवले आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्यावरील हल्ल्याचा मास्टरमाईंड गोवा मंत्रिमंडळातील एक मंत्री असल्याचे आपण जबानीत सांगूनही पोलिसांनी ते नाव नोंदवून घेतले नसल्याचे त्यांनी उघड केले आहे. आता ह्या आरोपांच्या सत्यासत्यतेविषयी पाहू. आपण पोलिसांना इस्पितळात दिलेला जबाब व्हायरल कसा झाला हा रामा काणकोणकर यांचा सवाल आहे आणि तो अगदी बिनतोड आहे. पोलिसांनी त्यांची जबानी ठराविक पत्रकारांकडे उघड केली. न्यायालयात सादर करायचा जबाब पत्रकारांकडे कसा पोहोचला ह्याची चौकशी झाली पाहिजे. एरवी कोणत्याही महत्त्वाच्या प्रकरणात ताकास तूर लागू न देणारे वरिष्ठ पोलीस अधिकारी ह्या प्रकरणात मात्र सुरवातीला हा हल्ला केवळ पूर्ववैमनस्यातून झाल्याचे आणि जणू काही गुंडांच्या दोन टोळ्यांतील हा संघर्ष असल्यागत वक्तव्ये देत होते. परंतु विरोधकांनी हा विषय लावून धरला आणि मुख्य म्हणजे रामा काणकोणकर यांच्या पाठीशी त्यांचा एस. टी. समाज उभा राहिला. आणि केवळ नैतिक पाठिंबा देऊन उभा राहिला नाही, तर राजधानी पणजीत येऊन धडकला. त्यामुळे पोलिसांना ह्या प्रकरणात पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा आपला सिद्धान्त मुकाट गिळावा लागला. मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्याच्या कार्यक्षमतेवरच ह्या हल्ल्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याने त्यांनी दिलेल्या निर्देशांमुळे ह्या प्रकरणातील सर्व हल्लेखोर झपाट्याने गजांआड झाले. पण हल्ल्याचे स्वरूप प्राणघातक स्वरूपाचे असूनही आणि ते रामा काणकोणकर यांचा जीव घेण्यास कारणीभूत ठरले असते हे दिसत असूनही पोलीस अशा गुन्हेगारांना सहसा घेतला जाणारा चौदा दिवसांचा पोलीस रिमांड घेऊ शकले नाही. तशी मागणीच जोरकसपणे न्यायालयापुढे झाली नाही. खरे म्हणजे अशा प्रकारचा प्राणघातक हल्ला सुपारी देऊन जेव्हा झाल्याचे दिसते, तेव्हा त्या हल्ल्यामागील मास्टरमाईंड कोण आहे ह्याचा शोध घेण्यासाठी, अधिक चौकशी करण्यासाठी अशा प्रकारचा प्रदीर्घ पोलीस रिमांड मिळवणे गरजेचे होते. परंतु तो घेतला गेला नाही. न्यायालयाने केवळ दोन दिवसांचा पोलीस रिमांड सुरूवातीला दिला. मुख्य म्हणजे ह्या प्रकरणी चौकशी करणाऱ्यांना ह्या हल्ल्यासंदर्भातील महत्त्वाचे पुरावेच ‘सापडू’ शकलेले नाहीत. ज्या सीसीटीव्हीवर हल्ल्याचे दृश्य चित्रीत झाले, ते गायब झाले. ज्या महिलेने प्रत्यक्ष हल्ला होताना पाहिले, तिने कानावर हात ठेवले, आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ह्या गुन्हेगारांनी हल्ल्यात वापरली गेलेली शस्त्रे आणि मोबाईल फोन पोलिसांना अजूनही सापडलेले नाहीत असे रामा काणकोणकर सांगत आहेत. हे जर खरे असेल तर ह्या प्रकरणास न्यायालयात बळकटी देईल असा तपास काय झाला? राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्याने ह्या हल्ल्याची सुपारी देणाऱ्या सांताक्रुझच्या कुख्यात गुंडाला अटक झाली. पण तो ज्या राजकारण्याच्या भावासाठी काम करतो त्याला किंवा ह्या हल्ल्याप्रकरणी रामा काणकोणकर यांनी ज्या राजकारण्याचे नाव घेतले, त्याला पोलिसांनी चौकशीसाठी बोलावणे तर दूरच, त्याचे नावही जबानीत नोंदवले गेलेले नाही. हा प्राणघातक हल्ला जणू काही दोन गटांतील मारामारी असल्याचे क्षुल्लक रूप ह्या घटनेला देण्याचा प्रयत्न स्पष्ट दिसला. एक म्हणजे रामा यांनी पोलिसांना दिलेली जबानी काही प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत सोईस्कर स्वरूपात पोहोचवली गेलीच कशी व ती कोणी का पोहोचवली हे जनतेला कळायला हवे. दुसरे म्हणजे ह्या हल्ल्यात वापरला गेलेला सर्व मुद्देमाल कसून शोधला गेला पाहिजे आणि गुन्ह्यात सामील झालेल्यांच्या तत्पूर्वीच्या हालचाली आणि कॉल रेकॉर्डस्‌्‌‍ तपासले गेले पाहिजेत. मुळात ह्या हल्ल्याचा खरा मास्टरमाईंड कोण आणि हल्ल्याचे कारण काय हे शोधले गेले पाहिजे. कोणत्या राजकारण्याच्या हितसंबंधांना काणकोणकर यांच्यामुळे बाधा पोहोचत होती हे शोधले गेले पाहिजे. ह्या हल्ल्यासंदर्भात काणकोणकर यांनी मंत्रिमंडळातील एका मंत्र्यावर प्रामुख्याने ठपका ठेवला आहे. त्याची पाठराखण होत असल्याचे दिसल्याने त्यांनी मुख्यमंत्र्यांचेही नाव गोवले. डॉ. प्रमोद सावंत यांचे राजकारण अशा प्रकारच्या धाकदपटशाचे, गुंडगिरीचे नाही. त्यांनी ह्या घटनेचे राजकारण केले जात असल्याचा पलटवारही केला आहे. परंतु ह्या हल्ल्याचा खरा सूत्रधार कोण हे शोधणे आणि तो मंत्री असल्याचे सिद्ध झाल्यास त्याला आपल्या मंत्रिमंडळातून काढण्याची हिंमत त्यांना दाखवावी लागेल. शेवटी राज्यातील वाढत्या गुन्हेगारीमुळे मंत्र्याची नव्हे, त्यांच्या सरकारची प्रतिमा मलीन होत आहे.