वाद मिटवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
येथील मासळी बाजारात घाऊक मासळी विक्रेते व किरकोळ विक्रेते यांच्यात काल वादाची ठिणगी पेटल्यानंतर आमदार विष्णू वाघ यांनी मासळी बाजारात जाऊन मासळी विक्रेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांच्यातील वाद मिटवण्यासाठी आपण आज मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व येत्या दोन आठवड्यांत महापौर सुरेंद्र फुर्तादो यांची भेट घेणार असल्याचे नंतर पत्रकारांना सांगितले.
घाऊक मासळी विक्रेते हे मासळी मार्केटच्या बाहेर बसून मासेविक्री करीत असल्याने ग्राहक मार्केटात आत न येता बाहेर त्यांच्याकडूनच मासळी घेऊन निघून जात असतात. परिणामी आपली मासळी पडून राहत असल्याचे किरकोळ मासळी विक्रेत्यांचे म्हणणे असल्याचे वाघ म्हणाले. किरकोळ मासळी विक्री मार्केटबाहेर घाऊक मासळी विकेत्यांना अशा प्रकारे बसू देणे म्हणजे किरकोळ मासळी विक्रेत्यांवर अन्याय असल्याचे वाघ म्हणाले व आपण लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही बाब त्यांच्या कानावर घालणार असल्याचे त्यांनी सांगितले. दोन आठवड्यात या संदर्भात महापौर सुरेंद्र फुर्तादो यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पणजी मासळी मार्केटात किरकोळ मासळी विक्री करणार्या विक्रेत्यांत आपल्या गोवा वेल्हा मतदारसंघातील महिलांचा जास्त भरणा असून आपण त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नसल्याचे वाघ यांनी सांगितले.