मासळी मार्केट बंद यशस्वी

0
59

डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रीय, मच्छिमारी महासंघाने पुकारलेल्या मच्छिमारी मार्केट बंदास गोव्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काल पणजीतील मासळी मार्केटमध्येही सामसूम होती. दक्षिणेत मडगावसह फोंडा, केपे, वास्को येथील मार्केटमध्येही मासळी विक्री पूर्णपणे बंद राहिली.

ट्रॉलरवाल्यांनी पुकारलेल्या बंदचा परिणाम काणकोण तालुक्यातील मासळी मार्केटांवरही झाली. चावडीवरील मासळी मार्केटात शुकशुकाट, तर शेळेर, श्रीस्थळ, पैंगीण, चाररस्ता, भाटपाल, माशे या भागातील मासे विक्री बंद होती. या तालुक्यात मडगाव आणि कारवार या भागातून मासळी आयात केली जाते. ताजी मासळी नसल्यामुळे काही मार्केटात सुकी मासळी विक्रीसाठी ठेवण्यात आली होती.

ट्रॉलर मालकांच्या बंदचा मडगाव बाजारावर परिणाम

डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ मच्छीमारी ट्रॉलर मालकांनी बेमुदत बंद पुकारल्याने त्याचा परिणाम गोव्याची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मडगाव घाऊक तसेच किरकोळ मासळी बाजारावर झाला. सोमवारी एसजीपीडीए बाजारातील किरकोळ मासळी विक्री बाजार बंद होता व काल घाऊक बाजार बंद झाल्याने येथून वास्को, सांगे, केपे, काणकोण तसेच उत्तर गोवा व सावंतवाडीपर्यंत मासळीचा पुरवठा होऊ शकला नाही. डिझेलचे दर वाढल्याने मासळी नेहमीच्या दरात विक्री करण्यास परवडत नाही व या व्यवसायासाठी डिझेलवर आर्थिक अनुदान द्यावे अशी मागणी मच्छीमारी ट्रालर संघटनेने केली होती. घाऊक बाजारात आज फेरफटका मारला असता फक्त रिकाम्या पेट्यांशिवाय तेथे काहीच नव्हते. पहाटे चारपासून तेथे मासळीसाठी कित्येक वाहने व शेकडो लोकांनी गजबजलेले असते. त्याशिवाय किरकोळ मासळी विक्रेते, फळभाज्या विक्रेते, खाद्यपदार्थ विक्रेते तेथे असतात. या घाऊक बाजारात कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ व आंध्र प्रदेशातून दररोज पहाटे २ पासून सकाळी ९ पर्यंत मासळी वाहक वाहने येत असतात. या मोसमात किमान ३ कोटी रुपयांची उलाढाल होत असते. याच घाऊक बाजारातून सर्वत्र मासळी नेली जाते. तारांकित हॉटेले, मध्यमवर्गीय हॉटेलांना येथूनच पुरवठा केला जातो. किरकोळ बाजार बंद असल्याने त्याचा परिणाम फळभाज्या विक्रेत्यांवर झाला व लोकांना चिकन व अंडी विकत घ्यावी लागली. ट्रॉलर मालक संघटनेचे शिष्टमंडळ केंद्रीय मंत्री शरद पवार यांना भेटण्यासाठी दिल्लीला गेले होते. त्यांची बोलणी यशस्वी झाल्यास आजपासून ट्रालर पुन्हा सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.