मावजो प्रकरणात मराठीप्रेमींची एकजूट

0
10

>> दामोदर मावजो माफी मागा; म्हापशातील निदर्शनावेळी मागणी

>> विविध संस्थांकडून राज्यभरात निषेध सभा, बैठकांचे आयोजन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आणि कोकणी लेखक दामोदर मावजोंच्या भाषाद्वेषी विधानाचा निषेध करण्यासाठी सर्व मराठीप्रेमी एकटवले असून, काल मराठीप्रेमींनी म्हापशातील निदर्शनांवेळी निषेध केला. भाषाद्वेषी विधानाप्रकरणी दामोदर मावजोंनी मराठीप्रेमी जनतेची माफी मागावी; अन्यथा मराठीप्रेमी जनता आक्रमक होऊन त्यांना त्यांची जागा दाखवेल, असा इशारा निदर्शनांवेळी दिला. याशिवाय मराठी चळवळीतील कार्यकर्ते आणि गोमंतक साहित्य सेवक मंडळ, गोवा मराठी पत्रकार संघ व अन्य संस्थांकडून त्यांच्या विधानाचा निषेध होत आहे. तसेच विविध संस्थांनी पुढील काही दिवसांत निषेध सभा व बैठकांचे आयोजन केले आहे. फोंडा येथे रविवार दि. 1 सप्टेंबरला चार संस्थांनी मराठीप्रेमींची सभा बोलावली आहे.

दामोदर मावजो यांनी राजभाषा कायद्यातून मराठीला वगळण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीचा निषेध करण्यासाठी म्हापशातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ निदर्शने करण्यात आली. यावेळी निमंत्रक तथा माजी नगरसेवक व मराठी कार्यकर्ते तुषार टोपले, ॲड. महेश राणे, गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष व प्राचार्य अनिल सामंत, गोमंतक मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रदीप घाडी अमोणकर, ‘मराठी असे आमुची मायबोली’चे प्रकाश भगत, शिवसेना माजी राज्यप्रमुख रमेश नाईक, मगो केंद्रीय समिती सदस्य श्रीपाद येंडे, शिवसेना नेते राजेश मराठे, पत्रकार प्रकाश धुमाळ, प्रसाद दळवी, नारायण राटवड, अरुण नाईक, काशिनाथ आर्लेकर, बाबलो कांदोळकर, अर्जुन उगवेकर, सुरेंद्र शेट्ये, एकनाथ म्हापसेकर, नितीन कोरगावकर, सुजन नाईक आदी मराठीप्रेमी
उपस्थित होते.

केवळ मराठीप्रेमी नव्हे, तर सर्व भारतीय भाषाप्रेमींच्या वतीने आपण दामोदर मावजोंच्या विधानाचा निषेध करतो, असे प्रा. अनिल सामंत यांनी सांगितले. मावजो जे काही बरळले आहेत, त्याबद्दल राज्यातील तमाम मराठीप्रेमी कडक भाषेत उत्तर देऊ शकतात; मात्र त्यांची कीव करावीशी वाटते, असेही सामंत म्हणाले.
मराठीला राजभाषेचे स्थान द्या : सामंत
दामोदर मावजोंनी राजभाषा कायद्यात दुरुस्तीची मागणी केली आहे. आमचे म्हणणेही तेच आहे; पण मराठीला जे सहराजभाषेचे स्थान दिले आहे, त्याऐवजी राजभाषेचे स्थान द्यावे, अशी आमची मागणी आहे. मराठीप्रेमींबरोबरच कोकणीप्रेमी आणि अन्य सर्व भारतीय भाषाप्रेमींनी त्यासाठी पाठिंबा द्यावा, असेही अनिल सामंत म्हणाले.

मावजो हे भाषाद्वेष ओकणारे पहिले ज्ञानपीठ विजेते : सामंत
भारतात ज्यांना ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, त्या सगळ्या लेखकांनी कधी अन्य भाषांचा द्वेष केला नाही. मात्र संपूर्ण भारतीय साहित्य इतिहासात भाषाद्वेष करणारे दामोदर मावजो हे पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील. मावजोंनी पुस्तके खूप लिहिली असतील, पण आपल्या वाणीतून भारतीय भाषांचा द्वेष कसा करावा, याचे विष ओकणारे ते ज्ञानपीठ विजेते असतील, अशी टीका प्रा. अनिल सामंत यांनी केली.

फोंड्यात 1 सप्टेंबरला मराठीप्रेमींची सभा
आमदार विजय सरदेसाई व कोकणी साहित्यिक दामोदर मावजो यांच्या विधानांच्या पार्श्वभूमीवर, विचारविनिमय व पुढील रणनीती ठरवण्यासाठी मराठी राजभाषा समिती गोवा, प्रागतिक विचार मंच गोवा, गोमंतक मराठी भाषा परिषद, प्रतिभा फ्रेंड सर्कल बोरी, या संस्थांतर्फे रविवार दि. 1 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता किड्स नेस्ट हायस्कूल विद्यावृद्धी संकुल शांतीनगर फोंडा येथे सर्व गोमंतकीय मराठी भाषकांची सभा बोलावण्यात आली आहे.