मालीचे संरक्षण मंत्री सादियो कॅमारा यांचा बंडखोरांनी त्यांच्या घरावर केलेल्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे. हा हल्ला एवढा भीषण होता की या हल्ल्यात सादियो यांच्यासह त्यांची पत्नी आणि दोन नातवंडांचा देखील मृत्यू झाला आहे. या घटनेला सादियो यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांकडून दुजोरा देण्यात आला आहे. मालीमध्ये सध्या गृहयुद्ध चांगलंच पेटलं आहे. मालीची राजधानी बमाकोमध्ये सैन्य आणि बंडखोर यांच्यामध्ये लढाई सुरू आहे. याचदरम्यान बमाकोमध्ये काही बंडखोरांकडून सादियो कॅमारा यांच्या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला, एका कार स्फोटामध्ये सादियो कॅमारा त्यांची दुसरी पत्नी आणि त्यांच्या दोन नातवंडाचा मृत्यू झाला आहे. बंडखोरांकडून मालीच्या इतर शहरांनादेखील निशाणा बनवण्यात येत असून सध्या देशात अराजक निर्माण झाले आहे. बंडखोरांकडून मालीच्या अनेक सैन्य ठिकाणांवर देखील हल्ला करण्यात आला आहे, सैन्यांवर करण्यात आलेल्या हल्ल्यांची जबाबदारी या बंडखोरांनी घेतली आहे.

