येथील गोवा शिपयार्डजवळ मारुती व्हॅनने गोवा शिपयार्डच्या एका कंत्राटी कामगाराला ठोकल्याने सदर कामगार जागीच ठार झाला. त्याचे नाव बिभीषण शेषराव सोमवंशी (३२) असे असून तो मूळ बिहारचा रहिवाशी होता. ही घटना दुपारी सव्वा बाराच्या सु’ारास घडली.मयत बिभीषण गोवा शिपयार्डमध्ये युनिव्हर्सला मरीन या कंत्राटी कंपनीत पेंटर म्हणून काम करीत होता. नेहमीप्रमाणे दुपारी १२ वा. जेवणाच्या वेळेला गेटबाहेर आला होता. सव्वाबाराच्या सुमारास मुख्य रस्ता ओलांडून पुन्हा कामावर परतण्याच्या तयारीत असताना वास्कोहून सुसाट वेगाने आलेल्या एका मारुती व्हॅनने थेट बिभीषणला जोरदार धडक दिली. त्यानंतर सदर व्हॅनने रस्त्याच्या कडेला असलेल्या वीज खांबाला व अन्य दोन दुचाक्यांना धडक दिली. या अपघातानंतर व्हॅनच्या चालकाने तशीच गाडी सुसाट वेगाने नेऊन घटना स्थळाहून पोबारा केला.
दरम्यान, कामगाराच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला मारुती व्हॅनचा चालक नवेवाडे येथील असून त्याचे नाव फिरोज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार सदर फिरोजला अधूनमधून फीट येते. यापूर्वीही त्याच्याकडून ४ ते ५ अपघात झाल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली आहे. वाहतूक खात्याने त्याचा परवाना रद्द करावा अशी मागणीही यापूर्वी लोकांनी केली होती, असे कळते. पण याकडे दुर्लक्ष झाल्याने काल एका निष्पाप कामगाराला प्राण गमवावा लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त होत आहेत.

