खास चित्रशैलीतून गोमंतकीय संस्कृती जगभर
पोहोचवणाऱ्या मारिओ मिरांडा यांची आज जन्मशताब्दी
गोव्याच्या संस्कृतीला, जीवनशैलीला आणि सामान्य माणसांच्या दैनंदिन आयुष्याला आपल्या खास शैलीत जगासमोर मांडणाऱ्या मारिओ मिरांडा यांची आज (दि. 2 मे) जन्मशताब्दी. 2 मे 1926 रोजी लोटली गावात जन्मलेल्या मारिओ मिरांडांनी त्यांच्या चित्रांमधून गोव्याचे सुसंस्कृत, आनंदी आणि सुशेगाद जीवन रेखाटले. बाजारपेठा, कॅफे, समुद्रकिनारे, गावातील लोक, संगीत आणि उत्सव हे त्यांच्या चित्रांचे प्रमुख विषय होते. त्यांच्या चित्रशैलीत विनोद, निरीक्षणशक्ती आणि मानवी स्वभावाचे सुंदर चित्रण दिसते. मारिओ मिरांडांच्या जन्मशताब्दीच्या पार्श्वभूमीवर काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना दिग्गज चित्रकारांनी आपल्या प्रतिक्रिया आणि आठवणींना उजाळा दिला. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे गोमंतकीय चित्रकार व व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा म्हणजे गोमंतभूमीतील एक हिराच, अशा शब्दात गोमंतकीय चित्रकार संजय हरमलकर यांनी प्रतिक्रिया दिली.
मारिओ मिरांडा यांचे पूर्ण नाव मारिओ जोआओ कार्लोस दो रोझारिओ दे ब्रिटो मिरांडा असे होते. त्यांच्या चित्रांना भारतासह जगभरात मोठी लोकप्रियता मिळाली. त्यांनी अनेक पुस्तकेही चित्रित केली. पद्मश्री (1988) आणि पद्मभूषण (2002) भारत सरकारने त्यांच्या कला आणि योगदानाचा गौरव केला होता.
जन्मशताब्दीचा सरकारला
विसर पडू नये : हरमलकर
मारिओ मिरांडा यांच्याविषयी पुढे बोलताना हरमलकर हे म्हणाले की मिरांडा यांच्या जन्मशताब्दीचा गोवा सरकारला विसर पडता कामा नये. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावलेले एक फार मोठे चित्रकार होत. चित्रे काढण्याची त्यांची स्वत:ची अशी एक फार सुंदर अशी शैली होती. ती जेवढी सुंदर तेवढीच मोहक व आकर्षक अशी होती. त्यामुळे लोक त्यांच्या चित्रांच्या प्रेमात पडायचे. त्यांची चित्रेही मनमोहक अशी होती. त्या चित्रांत एक वेगळाच ग्लॅमर होता.
वर्षभर विविध कार्यक्रम व्हावेत
गोमंतकाच्या ह्या थोर व दिग्गज अशा सुपुत्राच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोवा सरकारने वर्षभर विविध अशा कार्यक्रमांचे आयोजन करावे. सरकारने त्यानिमित्त त्यांच्या चित्रांचा एक मोठा खजिनाच लोकांसमोर आणून त्यांचे चित्र प्रदर्शन भरवावे. त्यांच्या चित्रांवर तसेच व्यंगचित्रांवर चर्चेच्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जावे. विद्यार्थ्यांसाठी चित्रकला शिबिरांचे आयोजन केले जावे. वर्षभर भरगच्च असे कार्यक्रम आयोजित केले जावेत व त्यासाठी गोवा सरकारने कला व संस्कृती खाते, गोवा कला अकादमी व आयएमबी या संस्थांची मदत घ्यावी, असे हरमलकर म्हणाले.
चित्रकार-व्यंगचित्रकार
हा भेद चुकीचा : केरकर
गोव्याने जगाला दिलेल्या तीन मोठ्या चित्रकारांमध्ये मारिओ मिरांडा, एफ. एम. सौझा व वासुदेव गायतोंडे यांचा समावेश करावा लागेल, असे ख्यातनाम चित्रकार व शिल्पकार सुबोध केरकर यांनी काल दै. ‘नवप्रभा’शी बोलताना सांगितले. बरेच जण मारिओ मिरांडा यांचा उल्लेख हा व्यंगचित्रकार असा करतात; पण असा भेद करणे हे योग्य नसल्याचे सांगून मिरांडा हे एक फार मोठे चित्रकार होते हे विसरता कामा नये, असे केरकर म्हणाले.
मिरांडांसोबत पहिली भेट
घडली ‘नवहिंद भवन’मध्ये
मारिओ मिरांडा हा थोर कलाकाराशी आपली पहिली भेट ही दै. ‘नवप्रभा’ व ‘नवहिंद टाइम्स’च्या कार्यालयात झाल्याचे सुबोध केरकर म्हणाले. नवहिंद टाइम्सचे तत्कालीन संपादक एस. के. मेनन यांना आपण भेटायला आलो असता तेथे आपली मिरांडा यांच्याशी भेट झाल्याचे केरकर म्हणाले. नंतर कित्येकदा त्यांच्याशी भेट व्हायची आणि गप्पांच्या ओघात ते खूप गोष्टी सांगायचे. गोव्यात मारिओ मिरांडा यांचे एक मोठे स्मारक होण्याची गरज असल्याचे मतही केरकर यांनी
मांडले.
सरकारला जन्मशताब्दी वर्षाचा विसर : युरी आलेमाव
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव हे मारिया मिरांडा यांच्याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मारिया मिरांडा हे गोव्याने जगाला दिलेले एक दिग्गज चित्रकार होते. त्यांनी आपल्या चित्रांतून निसर्ग सौंदर्याने ओथंबून वाहणाऱ्या गोव्याचा आत्मा रंगवला. मात्र, या अशा कलाकाराच्या जन्मशताब्दी दिनाचा राज्य सरकारला विसर पडावा हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून त्याविषयी त्यांनी खंत व्यक्त केली. त्यांचा वारसा पुढे नेला जावा यासाठी आपण गोवा विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती, असे आलेमाव म्हणाले.
गोव्याचे नाव मोठे केले : सदानंद शेट तानावडे
मारिओ मिरांडा यांनी आपल्या चित्रांद्वारे आणि व्यंगचित्रांद्वारे जगभरात कीर्ती मिळवली आणि गोव्याचे नाव मोठे केले. गोव्याला त्यांचा सार्थ अभिमान आहे. त्यांची चित्रे जगभरात पोचली असून त्यांच्या चाहत्यांची संख्या ही लाखोंच्या घरात आहे. असा चित्रकार गोव्यात जन्माला आला हे आमचे भाग्यच म्हणावे लागेल, अशी प्रतिक्रिया गोव्याचे राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांनी दिली.