गोव्याचे ५५ टक्के आमदार कोट्यधीश
बहुजन समाज पक्षाच्या नेत्या व उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती या देशातील सध्याच्या सर्वांत श्रीमंत मुख्यमंत्री ठरल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती देशातील इतर प्रमुख १० मुख्यमंत्र्यांच्या एकूण संपत्तीहूनही जास्त आहे. मायावती यांनी आपली संपत्ती ८७ कोटी २७ लाख रुपये असल्याचे जाहीर केले असून आपल्याला ही सर्व संपत्ती आपल्या अनुयायांनी दान केलेली असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
देशातील इतर नऊ प्रमुख मुख्यमंत्र्यांची मिळून एकूण संपत्ती ७९ कोटी पन्नास लाख रुपयांची आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या स्वयंसेवी संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार गोव्यातील ५५ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. तामीळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांची संपत्ती ५१ कोटींची असून त्या देशातील दुसर्या सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. गेल्या पाच वर्षांत आपल्या संपत्तीत कोणतीही भर पडली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री किरण रेड्डी तिसर्या व चौथ्या स्थानावर असून त्यांची मालमत्ता अनुक्रमे ९ कोटी आणि आठ कोटी १० लाख रुपये आहे. बादल यांच्यापूर्वी मुख्यमंत्री असलेले कॉंग्रेस नेते अमरिंदरसिंग यांची संपत्ती मात्र ३८ कोटींची आहे. इतर कोणत्याही मुख्यमंत्र्याची घोषित संपत्ती पाच कोटींहून अधिक नाही. ओरिसाच्या मुख्यमंत्र्यांची संपत्ती चार कोटी सत्तर लाख रुपये असून हरियाणाचे मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हूडा यांची मालमत्ता ३ कोटी ७४ लाख रूपये आहे. उमर अब्दुल्ला यांची संपत्ती दोन कोटी रूपये, तर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची संपत्ती सर्वांत कमी म्हणजे एक कोटी ७८ लाख रुपये आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांची संपत्ती एक कोटी नव्वद लाख रुपये आहे.
विधानसभा निवडणूक तोंडावर असलेल्या पाच राज्यांपैकी मणिपूरचे मुख्यमंत्री ओक्रम इबोबी सिंग हे सर्वांत ‘गरीब’ मुख्यमंत्री असून त्यांची संपत्ती केवळ सहा लाख रुपये आहे. संपत्तीच्या यादीत अग्रस्थानी असलेल्या मायावतींची बहुतेक संपत्ती ही त्यांच्या जन्मभूमीत दिल्लीत असून त्यात ओखला येथील व्यावसायिक केंद्र, सरदार पटेल मार्गावरील ५४ कोटी रुपयांचे भूखंड आणि ९० लाख रुपयांच्या दागिन्यांचा त्यात समावेश आहे. या स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार उत्तर प्रदेशचे ३२ टक्के आमदार कोट्यधीश असून पंजाबचे ६७ टक्के आमदार कोट्यधीश आहेत. गोव्यातील ५५ टक्के आमदारांपाशी एक कोटीहून अधिक संपत्ती असून दिल्लीत ४० टक्के आमदार कोट्यधीश आहेत.