निवडणूक आयोगाच्या फर्मानानुसार कार्यवाही सुरू
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री मायावती यांनी सरकारी पैशातून उभारलेले स्वतःचे तसेच बहुजन समाज पक्षाचे पुतळे निवडणूक काळात झाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले असले, तरी केवळ हे पुतळे झाकण्यासाठी तब्बल एक कोटी रुपये खर्च येणार आहे.
लखनौ आणि नोयडा येथे मायावतींनी उभारलेल्या या पुतळ्यांना झाकण्यासाठी तब्बल दीड कि. मी. लांबीचे गुलाबी रंगाचे पॉलिथिन खरेदी केले जात असून ११ जानेवारीपर्यंत हे पुतळे झाकण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. पॉलिथिनचा रंगही गुलाबी निवडण्यामागे तो कोणत्याही पक्षाचा रंग नाही हेच आहे. मात्र, उल्लेखनीय बाब म्हणजे मायावती यांचा आवडता रंग गुलाबी असून अनेक सार्वजनिक समारंभांमध्ये ते गुलाबी कपडेच घालत असतात.
लखनौ येथील गोमतीनगर येथील बाबासाहेब आंबेडकर सामाजिक परिवर्तनस्थल आणि नोयडा येथील राष्ट्रीय दलित प्रेरणा स्थल येथील पुतळे झाकण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. लखनौमध्ये मायावती यांचे नऊ पुतळे असून १५६ हत्तींचे पुतळे आहेत. नोयडामध्ये मायावती यांचे दोन पुतळे तर हत्तींचे ५२ पुतळे आहेत. हे सर्व पूर्णाकृती पुतळे असल्याने ते झाकण्यासाठी कापडही मोठ्या प्रमाणावर लागणार आहे. या पुतळ्यांबरोबरच हत्तीच्या आकारातील दारांची हँडल्स, कारंजी, स्तंभ व चक्रेही आच्छादन टाकून जनतेच्या नजरेस पडणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे. हे पुतळे झाकणे हे जिकिरीचे काम आहे. काल सकाळी कामगारांनी लखनौतील गोमतीनगरमधील आंबेडकर परिवर्तन स्थळातील पुतळे झाकण्यासाठी तेथील भव्य हत्तींभोवती लोखंडी खांब उभारून त्यावर पॉलिथीन आच्छादण्यास प्रारंभ केला. मायावती यांचे पुतळे कापडाने झाकले जाणार असून बादलपूर गाव व गौतम बुद्ध विद्यापीठ येथील पुतळेही अशाच प्रकारे झाकले गेले आहेत. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या आदेशाविरुद्ध एक जनहित याचिका अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल झाली आहे. हत्ती हे हिंदूंचे दैवत श्रीगणेशाचे पवित्र प्रतीक असून ते झाकल्याने धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप या याचिकेत करण्यात आला आहे.