मायकल लोबो यांचा कळंगुट पोलीस स्थानकावर मोर्चा

0
103
कळंगुट पोलीस स्थानकाचे निरीक्षक राजेशकुमार यांच्याशी चर्चा करताना आमदार मायकल लोबो. (छाया : प्रणव फोटो)

युवकाला मारहाण करणार्‍या पोलिसांवर कारवाईची मागणी
गेल्या आठवड्यात जॉन फर्नांडिस या युवकाला अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणी आणि कळंगुट पोलिसांनी ज्या पोलिसांनी मारहाण केली त्यांच्यावर कोणतीच कारवाई केली नसल्याच्या विरोधात काल सकाळी कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक लोकांनी मोठ्या संख्येने कळंगुट पोलीस स्थानकावर मोर्चा नेऊन पोलीस निरीक्षक राजेशकुमार यांना निवेदन सादर करून पोलिसांवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी उपस्थित लोकांनी निरीक्षक कुमार यांना सांगितले की, जॉन फर्नांडिस या युवकास पोलिसांनी नाहक मारहाण केली आहे. याप्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. जे पोलीस या मारहाणीत आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी. यावेळी बोलताना स्थानिक आमदार मायकल लोबो म्हणाले की, कळंगुट पोलीस गुन्हेगारांना आश्रय देत आहेत. त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने कळंगुट भागात अमली पदार्थ व्यवहारात अनेकजण गुंतलेले आहेत. पण कळंगुट पोलीस त्यांना अभय देत आहेत. ड्रग्जसाठी पैसे मिळत नसल्याने स्थानिकच पर्यटकांच्या खोलीत घुसतात आणि चोर्‍या करतात. पोलीस स्थानकात तक्रार नोंद करण्यास गेल्यास कळंगुट पोलीस एनसी म्हणून तक्रार नोंदवून घेतात, मात्र ती नोंद करीत नाहीत. त्यामुळे चोरी करणार्‍यांना रान मोकळे झाले असल्याचा आरोप आमदार लोबो यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
कळंगुट, बागा, कांदोळी, सिकेरी या भागात अमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. पण याकडेही कळंगुट पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने ड्रग्ससाठी पैसे नसतात त्यावेळी स्थानिकच पर्यटकांच्या खोल्यात घुसतात आणि चोर्‍या करतात. यापूर्वी आपण ड्रग्स व्यवहारात मोठ्या प्रमाणात युवक गुंतलेले असल्याने आवाज उठविला होता. त्यावेळी पोलिसांनी कारवाईचे नाटक केले होते. आता कोणतीच कारवाई होत नसल्याने हा ड्रग्स व्यवसाय परत फोफावला असल्याचा आरोप आमदार लोबो यांनी बोलताना केला.