मायकल लोबो प्रवीण झांटये यांचा भाजपाला रामराम

0
36

>> पक्ष सदस्यत्वासह आमदारकीचा राजीनामा; झांट्ये यांचा आज मगो प्रवेश; लोबोंचे तळ्यात-मळ्यात

मंत्री मायकल लोबो यांनी काल भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देण्यापूर्वी आपल्या मंत्रिपदाचा व आमदारकीचा राजीनामा दिला. भाजपने आपणाबरोबरच आपल्या पत्नीलाही उमेदवारी द्यावी, असा हट्ट लोबो यांनी गेल्या काही महिन्यांपासून पक्षाकडे धरला होता; मात्र आपली ही मागणी मान्य होत नसल्याचे पाहून त्यांनी पक्षाशी एका प्रकारे फारकतच घेतली होती. लोबो हे लवकरच कॉंग्रेस पक्षात प्रवेश करण्याची शक्यता आहे.

भाजपने हल्लीच प्रेमेंद्र शेट यांना पक्षात प्रवेश दिला असून, त्यांना मये मतदारसंघातून उमेदवारी दिली जाणार आहे. मयेतून उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्याने आमदार प्रवीण झांट्ये यांनी सुद्धा भाजपच्या आमदारकीचा काल राजीनामा दिला. ते मंगळवारी सायंकाळी मगो पक्षात प्रवेश करणार आहेत.

मायकल लोबो हे गेल्या १५ वर्षांपासून भाजपसोबत होते. राजीनाम्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. भाजपने तळागाळातील कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केल्याने पक्ष कार्यकर्ते नाराज झाले आहेत. पक्षात येणार्‍या नव्या नेत्यांना विशेष वागणूक दिली जाते. याविषयी आपण बर्‍याच काळापासून आपण आवाज उठवूनही कुणीही आपल्या म्हणण्याकडे लक्ष दिले नाही. परिणामी आपण कंटाळून राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे लोबो म्हणाले.

मायकल लोबो व प्रवीण झांट्ये यांनी काल आमदारकीचा व भाजप सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने आतापर्यंत आमदारकीचा व पक्षाचा राजीनामा दिलेल्या भाजप आमदारांची संख्या ४ एवढी झाली आहे. यापूर्वी कुठ्ठाळीच्या आमदार एलिना सल्ढाणा व वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली होती.

मये मतदारसंघाचा म्हणावा तसा विकास झाला नाही, युवकांना नोकर्‍या मिळाल्या नाहीत. सरकार आणि पक्षाकडून आवश्यक ते सहकार्यही मिळाले नाही. त्यामुळे भाजप पक्ष सोडला असून, मगोत प्रवेश करणार आहे. प्रवीण झांट्ये, माजी आमदार

भाजपला आपल्यासारखा नेता नको होता. त्यामुळे पक्षाने आपल्याला बाहेर काढण्याऐवजी स्वत:च बाहेर पडणे केव्हाही चांगले. अपक्ष निवडणूक लढावी की कॉंग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढावी, याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. मायकल लोबो, माजी आमदार

स्वार्थासाठी भाजपला सोडचिठ्ठी : मुख्यमंत्री
भाजप सोडून आतापर्यंत जे जे नेते गेले आहेत, ते सगळे स्वार्थी नेते आहेत. या नेत्यांनी केवळ आपल्या स्वार्थापोटी भाजप सोडल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल केला.

पक्षावर काहीही परिणाम नाही : सदानंद तानावडे
एक-दोन नेते पक्ष सोडून गेले, म्हणून भाजपसारख्या मोठ्या पक्षावर काहीही परिणाम होणार नसल्याची प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी काल दिली.