28 C
Panjim
Monday, March 1, 2021

मामाचं पत्रं आणि लांडग्याची स्टोरी..!

  •  प्रा. जयप्रभू कांबळे

हातोहात माणसाला फसवणारी, माणसाला उघडंं करणारी, सहज माणसाला लुटणारी ही शिकलेली अवलाद या काळाची देणच आहे. त्याला आपण रोखू शकतो. पण ज्यांना माहीत नाही त्या माणसांनी काय करायचं. गोड बोलून काळीज काढून घेणारी ही बांडगुळं अशी अवतीभोवती वाढतच चाललेली.

लहानपणी पोस्टमनभोवती मुलांची गर्दी व्हायची. मुलांचा घोळका पोस्टमनच्या मागून फिरायचा. या घोळक्यातला त्याचा आवाज त्याच्या कानावर आला. ‘‘मामाचं पत्र आलंय का?’’ पत्राच्या पेटीबद्दल त्याला कुतूहल वाटायचं. कुणाचंतरी पत्र पेटीत टाकून झालं की मग त्याच्यात आणि दोस्तांच्यात चर्चेला उधाण यायचं. पत्र टाकल्याबरोबर पोहोचलं असेल, असं त्याला वाटायचं. पत्र गेलं आणि एसटीडी, कॉईन बॉक्स आणि माणसांची रांग त्याच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. कॉईन बॉक्सवर जाणार्‍या माणसांचा चिल्लरने फुगलेला खिसा आणि फोन कट होऊ नये म्हणून त्यांची होणारी धडपड त्याच्या मनात रेंगाळू लागली. मग गल्लीत कुणीतरी ‘फोन’ घेतला. बाळाचा पाळणा जसा सजवला जातो, तसा मेकअप त्या फोनचा केला जायचा. फोन असलेल्या घराच्या बाहेर पोरांची गर्दी थांबायची. त्यांच्यात स्पर्धा लागायची. फोनची रिंग वाजली रे वाजली की पोरं, ज्याचा फोन आलेला आहे, त्याला हाताला धरून फोनकडे घेऊन यायची. शेण काढताना गोठ्यातूनच ‘‘हॅल्लो, हॅल्लो!’’ असा आवाज करत.. ‘‘रेंज नाही ओ..’’ म्हणणारी शेवताअक्का त्याच्या डोळ्यांसमोरून गेल्याचा भास त्याला झाला. एकदा त्याने मावशीला फोन केला होता.

‘‘मी कबीर बोलतोय, आमची मावशी आहे का?’’
‘‘कुठून बोलत्यासा?’’ पलीकडच्या माणसाचा आवाज.
‘‘मी अमूक-तमूक नगरातून बोलतोय.’’ कबीर म्हणाला.
‘‘तुला काय अक्कल-बिक्कल हाय का नाही, येळ काळ हाय का नाही फोन करायला?’’
‘‘अहो जरा बोलायचं होतं मावशीबरोबर’’.
‘‘काय गडी हा का तुझा?’’
‘‘अहो, जरा बघा’’, कबीर म्हणाला.
‘‘लय शाना हाईस. झोप गपगुमान….’’ आणि फोन कट झाल्याचा टिक, टिक, टिक आवाज त्याच्या कानाभोवती गुंजू लागला. कबीरला खूप वाईट वाटले.
त्याची मावशी एकटीच राबायची. शेतात कामाला गेली तरच चूल पेटायची. परत पोराचं आणि पोरीचं शिक्षण. आणि नवर्‍याच्या गोळ्या. तिच्या नवर्‍याला भाईरचा नाद. घरात नसायचाच. मग कुठलातरी रोग झाला. नुस्ता हाडाचा सापळा. अगदी पार भुईला टेकला. मग काही दिवसानं नुस्ता हातरूणातून उठायचा. खुरपं घ्यायचा आणि दिसल ती झाडं तोंडून टाकायचा. मावशीच्या घरात कुणी जायला तयार नसायचं. माणसं बोलायची नाहीत. बोलली तरी तेवढ्यापुरतंच. पण गावातला माणूस कधीपासून वेळकाळ पाळायला लागला, कबीरला कळेना. नेमकं काय झालंय त्याच्या लक्ष्यात येईना.

त्याच्या लहानपणीच्या काळात… ‘हे पत्र अमूक-तमूक २१ लोकांना पाठवा मग तुम्हाला लॉटरी लागेल, पैसा येईल, गाडी येईल, आनंदाची बातमी कळेल आणि नाही पाठवला तर मग अमूक-तमूक गावातल्या शंकर पाटलाने दुर्लक्ष केले, आणि त्याचे घर जळाले. अमूक-तमूक गावातल्या हौसाबाईने पत्र न वाचताच ठेवले तर तिचा नवरा दोन दिवसांत मेला…’ अशी भीती त्या पत्रातून अगदी काळजापर्यंत थेट पोहोचेल असा मजकूर असायचा. मग पत्राची जागा झेरॉकस केलेल्या कागदांनी घेतली आणि आज कबीर म्हणाला नुस्ता ‘एस्‌एम्‌एस्’चा पूर वाहतोय व्हॉट्‌सऍपवरनं. बरं पाठवणार्‍याला अक्कल नाही म्हणजेे वाचणार्‍याला पण नाही का? माणसाला सहज उल्लू बनवणार्‍या माणसांच्या या काळात जगताना सगळ्या खाणाखुणा लक्ष्यात ठेवायला हव्यात. ‘‘हे नारायणा अशा नंग्यांच्या दुनियेत चालायची वाट, लक्ष्यात ठेव सार्‍या खाणाखुणा’’ या सुर्व्यांच्या ओळीत आपणच असल्याचा जोरदार फिल त्याला आला.
एकदा कबीरचा बाप फोनवरती बोलत होता. पलीकडून गोड गळ्याची मुलगी बोलत होती. त्याच्या बापाला काही कळेना, म्हणून त्याने फोन कबीरच्या हातात दिला.
‘‘सर मै खुराना बोल रही हँ, एटीएम सर्व्हिसिंग के बारे मे फोन किया है, क्या मै जान सकती हूँ आपका अकाउँट किस बँक का है?’’
कबीरच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. त्याने तिच्या खानदानाचा जोरदार उद्धार केला तसा पलीकडचा आवाज थंडगार झाला.

‘‘पप्पा परत जर कुठल्या बाईचा नाहीतर बापयाचा फोन आला तर डायरेक्ट कट करायचा… जास्त वाडाचार लावायचा नाही,’’
‘‘आरं काय झालाय, सांगशील काय नाही?’’
‘‘अख्खा लुटला असता तुला…..’’ कबीर म्हणाला
‘‘ते रं कसं काय’’.
‘‘तसंच हाय, कुणाला एटीएमचा नंबर आणि पासवर्ड सांगशील बघ? मलाबी सांगू नकोस. सगळं पैसे काढून घेत्यात’’.
हातोहात माणसाला फसवणारी, माणसाला उघडंं करणारी, सहज माणसाला लुटणारी ही शिकलेली अवलाद या काळाची देणच आहे. त्याला आपण रोखू शकतो. पण ज्यांना माहीत नाही, त्या माणसांनी काय करायचं. गोड बोलून काळीज काढून घेणारी ही बांडगुळं अशी अवतीभोवती वाढतच चाललेली.

‘‘अजून उजेड गवसला नाही. मी काळाचा गळा चिरावा म्हणतोय. बाराबोड्याचा झालाय प्रत्येक दिवस. मी अंधाराला जवळ करावसं म्हणतोय. कोठून आली ही टोळधाड. कुठून आलं हे तणकट… हे आतबाहेरून वाढतंय कॉंग्रेसी गवत. कुठली फवारणी करायची या माणसांच्या मनावर. ना आयभनीची वळख ना नात्यागोत्याची वळख….’’ कबीर बडबडत होता… त्याचा आतला आवाज त्याला सांगू पाहत होता. त्याला कंटाळा आला. कंटाळा वाढत गेला. मग कंटाळा अंगभर पसरला. मग त्याने गाडी बाहेर काढली तर त्याला एका पंपावर भली मोठी रांग दिसली. मग त्याने व्हाट्‌सऍप उघडले. तर शेजारच्या राज्यात महापूर आल्याने गाड्या येणार नसल्याचा मेसेज सगळ्या ग्रुपवर फिरत होता. मग त्याला रांगेचे गणित कळले. तो जेव्हा पहिलीत होता तेव्हा त्याच्या मराठीच्या बुकात एक गोष्ट होती. ती त्याला पाठ झाली होती आणि त्याची पाठ सोडत नव्हती. गोष्ट होती लांडगा आला रे लांडगा आला…! हा गोष्टीतला मुलगा रस्त्यावरून, मोबाईलमधून फिरत आहे. त्याचा वावर, रूबाब वाढतो आहे. हा मुलगा लाडावतो आहे. तो हट्टी झालेला आहे. त्याचा कान धरायला हवा…. नाहीतर माणसांच्या शेळ्या-मेंढ्या व्हायला वेळ लागणार नाही….

STAY CONNECTED

845FansLike
8,000SubscribersSubscribe

TOP STORIES TODAY

आगामी विधानसभा निवडणुकांचे पडघम

दत्ता भि. नाईक आगामी मार्च-एप्रिलच्या काळात आसाम, प. बंगाल, तामिळनाडू व पुदुचेरी अशा तीन राज्यांत व एका छोट्याशा...

‘एलआयसी’ अंतर्बाह्य कशी आहे?

शशांक मो. गुळगुळे आतापर्यंत खाजगी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीपेक्षा सरकारी कंपन्यांच्या भागभांडवल विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि या...

खांडेकर-कुसुमाग्रज-बोरकर अनोखा त्रिवेणी संगम

राम देशपांडे भाऊंनी पन्नास वर्षांहून अधिक काळ मराठी साहित्याच्या क्षेत्रावर अधिराज्य केले. स्वतःचा असा एक वेगळा ठसा मराठी मनावर...

अस्त

अंजली आमोणकर देहोपनिषद सिद्ध झालं म्हणजे देहकथा पूर्ण झाली. विसर्जनाची वेळ झाली. गीतेत म्हटले आहे- ‘तू त्रिगुणातीत हो!’...

फुटीच्या दिशेने?

कॉंग्रेस पक्षामधील असंतोष पुन्हा खदखदू लागला आहे. शनिवारी जम्मूमध्ये गुलाम नबी आझाद यांच्या राज्यसभेतील निवृत्तीच्या निमित्ताने आयोजित ‘शांती संमेलना’तील ज्येष्ठ कॉंग्रेस नेते...

ALSO IN THIS SECTION

विज्ञान सर्वांपर्यंत पोहोचावे

श्रेया काळे(पर्वरी) समस्या आहेत, आव्हानेही अनेक आहेत, पुढेही असतील पण विज्ञानाच्या आधारावर त्यावर मात करून आपले राष्ट्रवैभव टिकवू...

‘‘एक धागा सुखाचा…

ज. अ. रेडकर(सांताक्रूझ) संपतराव आणि शारदाबाई यांना कर्ते-सवरते दोन पुत्र असताना आयुष्याच्या संध्यासमयी दुर्दैवाचे असे कठोर आघात सहन...

‘माझी रक्षा सिंधूत टाका…’

प्रा. रमेश सप्रे त्यांना स्पष्ट दिसत होतं एक काळ असा उगवेल ज्यावेळी संपूर्ण सिंधू नदी- जिच्या काठावर आपली...

स्वराज्यरक्षक राजा… राजा शिवछत्रपती

पल्लवी दि. भांडणकर प्रजेचा विश्वास जिंकून मावळ्यांना एकत्र आणणारे राजे आज आपल्या देशाला हवे आहेत. मग बाजीप्रभूसारखे सैनिक...

दुभंगलेली मने, तुटलेली नाती

ज. अ. रेडकर.सांताक्रूझ मुलाने मख्खपणे सगळे ऐकून घेतले पण त्याच्यावर कोणताच परिणाम झाला नाही आणि तो माघारी बंगळूरूला निघून गेला. निदान.. बाबा...