सर्वोच्च न्यायालयाने संजयला ठोठावलेल्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर राजकारणी व न्यायाधीशांनीही त्याला माफी मिळावी यासाठी वक्तव्ये केली होती. त्यामुळे हा चर्चेचा विषय झाला होता. मात्र काल संजयने पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील तर्क-वितर्कांवर पडदा टाकला आहे.
संजय प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला, या क्षणी मी उद्ध्वस्त मनःस्थितीत आहे. माझे कुटुंबही उद्ध्वस्त मनःस्थितीत आहे. या क्षणी मी तुम्हाला एकच सांगू शकतो की मी क्षमा याचनेसाठी अर्ज केलेला नाही, असे अनेकजण आहेत की जे माफीसाठी योग्य आहेत. आणि सर्व देशवासियांना हात जोडून सांगू इच्छितो की, मी माफी याचना करणार नाही आणि त्याबाबत कोणताही वाद नाही.
सर्वोच्च न्यायालयाने आपल्याला वेळ दिलेला आहे आणि त्या वेळेत आपण न्यायालयाला शरण जाणार आहे, असे भावविवश झालेला संजय म्हणाला, शस्त्रास्त्र कायद्याचा भंग करून बेकायदेशीरपणे शस्त्रे बाळगल्याप्रकरणी दोषी सिद्ध झाल्याने त्याला ५ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे.
आपल्याला माफी मिळावी यासाठी चाललेल्या प्रचाराशी आपला संबंध नसल्याचे सांगून आपण केवळ आपले काम व कुटुंब यावरच लक्ष केंद्रित करीत असल्याचे तो म्हणाला. प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष निवृत्त न्या. मार्कंडेय काटजू यांनी संजयच्या माफीसाठी मतप्रदर्शन करून या प्रकरणाला वादाचा विषय बनवले होते. विशेष म्हणजे संजयच्या कालच्या घोषणेनंतरही काटजू यांनी आपल्या भूमिकेत बदल केलेला नाही. ‘तो माफी मागणार नसला तरी सुद्धा आपण त्याच्यासाठी व झैबुनिसा काझी यांच्या माफीसाठी प्रयत्न करणार’ असे वक्तव्य काटजू यांनी केले आहे.
संजयने आपण आपल्या राहिलेल्या कामांवर लक्ष केंद्रित करणार असल्याचे स्पष्ट केले. ‘मी हात जोडून सर्वांना विनंती करतो की ही कामे करीपर्यंत मला शांती मिळू द्यावी’ असे तो म्हणाला.

