तीन दिवसांच्या विलंबानंतरही वेगाने घोडदौड
काल रविवारी 7 जूनपर्यंत मान्सूनने एकूण 12 राज्यांत धडक मारली आहे. काल त्रिपुरा, नागालँड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश या आणखी चार राज्यांमध्ये मान्सून पोहोचला. गोव्यासह महाराष्ट्रात मान्सून केवळ दक्षिण कोकणापर्यंतच पुढे सरकला. यामुळे 9 जूनपर्यंत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मात्र, पुढील आठवड्यापर्यंत राज्यात पावसाचा जोर कमी राहण्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
मान्सूनमुळे केरळम, कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडूतील अनेक जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत आहे. मात्र, तामिळनाडूची राजधानी चेन्नईमध्ये सलग पाचव्या दिवशी पारा 40 अंशच्या पुढे गेला. देशात गुजरात वगळता इतर सर्व राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेशसह ईशान्येकडील राज्यांमध्ये शनिवारी जोरदार पाऊस झाला. मध्य प्रदेशात भोपाळसह 4 जिल्ह्यांमध्ये 50 किमी प्रतितास वेगाने वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. राजस्थानमधील बिकानेरमध्ये पावसासोबत गारपीट झाली. उत्तर प्रदेशातील मऊ आणि गाझीपूरमध्येही शनिवारी पाऊस झाला.
मान्सूनची घोडदौड
तीन दिवसांच्या विलंबाने दाखल झाल्यानंतर मान्सूनने वेग पकडला आहे. 4 दिवसांत त्याने 7 राज्यांना व्यापले. शनिवारी मान्सूनने आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मिझोराम आणि मणिपूरमध्ये प्रवेश केला. त्यापूर्वी शुक्रवारी तो कर्नाटक, तामिळनाडू आणि गोव्यात पोहोचला होता.
केरळममध्ये मान्सून 4 जून रोजी पोहोचला होता. हवामन खात्यानुसार, पुढील तीन दिवसांत मान्सून ईशान्येकडील सर्व राज्यांमध्ये आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे.
गोव्यात जोरदार पावसाची शक्यता
राज्यात चोवीस तासांत मान्सून सामान्य होता. राज्यात काही ठिकाणी मध्यम, काही ठिकाणी तुरळक पावसाची नोंद झाली आहे. येत्या 11 जूनपर्यंत जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली असून येलो अलर्ट जारी केला आहे. चोवीस तासांत एकूण 0.79 इंच पावसाची नोंद झाली असून काणकोण येथे सर्वाधिक 2.17 इंच, म्हापसा येथे 1.58 इंच, मुरगाव येथे 1.46 इंच, मडगाव येथे 1.11 इंच, साखळी येथे 0.91 इंच, पणजी येथे 0.62 इंच, जुने गोवा येथे 0.59 इंच, दाबोळी येथे 0.48 इंच नोंद झाली आहे.

