मानव ठक्कर नंबर १

0
258

आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस महासंघाच्या जागतिक ज्युनियर सर्किट क्रमवारीत पहिला क्रमांक मिळविणारा पहिला भारतीय खेळाडू होण्याचा मान मानव ठक्कर याला मिळाला आहे. बेलग्रेड येथील स्पर्धेतील घवघवीत यशानंतर त्याने अव्वल स्थानी झेप घेतली.

ठक्कर यापूर्वी पाचव्या स्थानी होता. परंतु, सर्बियन ज्युनियर व कॅटेड ओपनमधील उपविजेतेपदानंतर त्याने मुसंडी मारत पहिल्या स्थानापर्यंत मजल मारली. मानवच्या खात्यात सध्या ३४५५ गुण आहेत. भारतीय वंशाचा अमेरिकेचा खेळाडू कनक झा २९५० गुणांसह दुसर्‍या तर अर्जेंटिनाचा फ्रान्सिस्को सांची २८९५ गुण घेत तिसर्‍या स्थानी आहे. यानंतर फ्रान्सच्या बास्टियन रेंबार्ट (२८८०) व तैवानच्या फेंग यी सिन (२७०६) यांचा क्रमांक लागतो. अव्वल स्थानासह मानवने पुढील वर्षी लक्झमबर्ग येथे फेब्रुवारी महिन्यात होणार्‍या आयटीटीएफ जागतिक सर्किट फायनल्ससाठी पात्रता देखील मिळविली. इजिप्त ओपन जिंकल्यानंतर भारताच्या सेलेनादीप्ती सेल्वाकुमार हिने मुलींच्या क्रमवारीत ३१व्या क्रमांकावरून थेट पाचवे स्थान मिळवत आपली गुणसंख्या २३५० केली आहे.