Home बातम्या माध्यम प्रश्नाचे पडसाद आता उमटणार रंगभूमीवर

माध्यम प्रश्नाचे पडसाद आता उमटणार रंगभूमीवर

0

पुंडलिक नाईक लिखित फिर्गी फक्सगणेशोत्सवासाठी सज्ज

प्राथमिक शिक्षणात इंग्रजी माध्यमाला सरकारी अनुदान देण्याच्या विषयावरून गेले तीन महिने गोव्यात प्रचंड लोकक्षोभ उसळला आहे. बंद, मोर्चे, निदर्शने, धरणे, पथनाट्य, मेळावे, महामेळावे, महादिंडी अशा विविध मार्गांनी हे आंदोलन भारतीय भाषा सुरक्षा मंचाच्या वतीने चालवले गेले. आता हा प्रश्न थेट गोव्याच्या रंगभूमीवर प्रकटणार असून नामवंत गोमंतकीय साहित्यिक व भाषा सुरक्षा मंचाचे एक नेते पुंडलिक नारायण नाईक यांनी माध्यम प्रश्नावर लिहिलेले फिर्ंगी फक्सहे कोकणी नाटक या चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते व नाट्यलेखक, दिग्दर्शक प्रशांत म्हार्दोळकर रंगभूमीवर आणणार आहेत. गोव्याच्या कोकणी रंगभूमीवर शतकवीरम्हणून नावलौकीक जोडलेले व सध्याच्या माध्यमप्रश्नावरील आंदोलनात युवकांना नेतृत्व देणारे राजदीप नाईक यांच्या कलाचेतना, वळवईया संस्थेद्वारे हे नाटक सार्वजनिक गणेशोत्सवात गावोगावी सादर केले जाणार आहे.

युवा संगीतकार अक्षय नाईक यांनी या नाटकाला संगीत दिले असून गीते गायिली आहेत, तर पार्श्वसंगीताची बाजू सचिन चौगुले सांभाळत आहेत. संगीत संयोजन खेमराज नाईक यांचे आहे. नेपथ्य हेमंत कासार यांचे आहे. नाटकाची निर्मिती संकल्पना व वेशभूषा सुचिता नार्वेकर यांची आहे. या नाटकात राजदीप नाईक यांच्या सोबत कु. प्रतिका गावस, दीपिका करिशेट्टी व सौरभ कारखानीस हे प्रमुख कलाकार असून त्यांच्यासोबत बाबलो शिलकर, उमेश नाईक, प्रशांत नाईक, मयूर नाईक, अनंतदास नाईक व लक्ष्मीदास नाईक हे सहकलाकार काम करणार आहेत.

फिर्ंगी फक्सनाटकाचा मुहूर्त म्हार्दोळ ग्रामपंचायतीचे पंचसदस्य व नाट्यकलाकार सतीश मडकईकर यांच्या हस्ते गेल्या महिन्यात झाला होता. या नाटकाचा शुभारंभी प्रयोग ३ सप्टेंबर रोजी कुंडई येथील सार्वजनिक गणेशोत्सवात होणार आहे. ४ रोजी कोळंब रिवण, दि. ६ रोजी उसगाव, ७ रोजी साखळी, ८ रोजी डिचोली, १० रोजी वाडी कुर्डी आणि १९ रोजी नेरुल येथे हे नाटक सादर होईल. दिग्दर्शकाने लोकधर्मी मुक्तशैलीचा वापर करून ही नाट्यनिर्मिती केली आहे.