माध्यमांकडून वक्तव्याचा विपर्यास : गावडे

0
14

>> मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केला नसल्याचाही दावा

फोंडा येथे आयोजित सरकारी पातळीवरील प्रेरणा दिन सोहळ्यात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही. आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला. काही जणांना आपली ॲलर्जी झालेली आहे, असा दावा मंत्री गोविंद गावडे यांनी पर्वरी येथे पत्रकारांशी बोलताना
काल केला.

गोविंद गावडे यांच्या प्रेरणा दिन कार्यक्रमातील भाषणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आणि खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावडे यांच्या वक्तव्याची दखल घेतल्याचे सांगून लवकरच कारवाई करण्यात येईल, असे सांगितले होते.
फोंडा येथे प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर गोविंद गावडे परराज्यात रवाना झाले होते. काल सकाळी ते राज्यात परतले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी त्यांनी पत्रकारांशी पर्वरी येथे संवाद साधला. प्रेरणा दिन कार्यक्रमात आपण मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचा आरोप केलेला नाही. आपल्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास केला. मुख्यमंत्र्यांशी आपले चांगले संबंध आहेत. गेली पाच वर्षे एकत्र काम करीत आहोत, असे गावडे म्हणाले.
आपण आदिवासी कल्याण खात्याच्या प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत भाष्य केले होते. मुख्यमंत्र्यांनी भ्रष्टाचार केला आहे, असे वक्तव्य केले नाही. तथापि, आपल्या वक्तव्याचा मीडियाने विपर्यास केला. आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन वक्तव्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी आपल्याबाबत जे वक्तव्य केले, त्यावर आपण भाष्य करू शकत नाही, असे गावडे यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले.

आदिवासी कल्याण खात्याच्या कामगिरीची
माहिती भाजपकडून सोशल मीडियावर प्रसिद्ध

गोविंद गावडे यांनी प्रेरणा दिन कार्यक्रमात आदिवासी कल्याण खाते निष्क्रिय असल्याच्या आरोपानंतर आता, भाजप गोवाने राज्य सरकारच्या आदिवासी कल्याण खात्याच्या कामगिरीची माहिती समाज माध्यमावर काल जारी केली. राज्यातील आदिवासींना मूळ प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांमार्फत 21 हजारांहून अधिक लाभार्थ्यांना 46 कोटी रुपयांचा थेट लाभ मिळाल्याचे म्हटले आहे. तसेच अन्य काही योजनांद्वारे आदिवासींना मिळालेल्या लाभाचा त्यात उल्लेख आहे. विद्या लक्ष्मी योजनेखाली 611 मुलांनी शिक्षणासाठी थेट मदत, उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहन, आत्मनिर्भर होण्यासाठी मदत, दुर्गम भागात शैक्षणिक क्रांती करण्यात आली आहे. आदिवासी समाजासाठी स्वयंरोजगार व कौशल्य विकास कार्यक्रमात व्यवसाय प्रशिक्षणासाठी मदत, महिला बचत गटांना आर्थिक पाठबळ, उत्पन्नवाढीसाठी तंत्रशुद्ध प्रशिक्षण कार्यक्रम, पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यावर भर देण्यात आला आहे, असे म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य टाळले
मंत्री गोविंद गावडे यांनी बुधवारी आपली भेट घेऊन वादग्रस्त वक्तव्याबाबत आपणाशी चर्चा केली आहे. त्या भेटीत काय झाले, ते त्यांनाच विचारा, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर व्यक्त करून त्याबाबत अधिक बोलण्याचे टाळले.

गोविंद गावडे आज प्रदेशाध्यक्षांसमोर हजर
भाजपच्या केंद्रीय नेत्यांना मंत्री गोविंद गावडे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत अहवाल पाठविला आहे. तसेच गोविंद गावडे यांची बाजू गुरुवार दि. 29 मे रोजी ऐकून घेतली जाणार आहे, अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिली. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष आणि भाजप काही ज्येष्ठ नेते एकत्र बसून त्यांनी केलेल्या आरोपांबाबत चर्चा करणार आहे. त्यानंतर त्यांच्यावरील कारवाईबाबत पुढील दिशा निश्चित केली जाणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.

गावडेंना मंत्रिपदावरून हटवल्यास…
गोविंद गावडे यांना मंत्रिपदावरून हटवल्यास संपूर्ण गोव्यात वणवा पेटेल, अशा इशारा त्यांच्या समर्थकांकडून समाज माध्यमावर दिला जात आहे. दरम्यान, मंत्री गावडे यांना उटा या संघटनेने यापूर्वीच आपला पाठिंबा जाहीर केला आहे.