कु. वेदा लक्ष्मण पत्की
(जी.व्ही.एम.एस.एन.जे.ए.
विद्यालय, फर्मागुडी, फोंडा)
माझा मराठाचि बोलु कौतुकें।
परि अमृतातेंहि पैजां जिंके।
ऐसीं अक्षरें रसिकें। मेळवीन॥
संत ज्ञानेश्वर माउली आपल्या भाषेची तुलना करतात ती अमृतासोबत. आज मी इथे माझे विचार मांडते आहे ते कशामुळे? ज्ञानेश्वर माउलींनी आपले विचार मांडले, संत-कवींनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्या कशाच्या जोरावर? माणसाला जर बोलण्याची संधीच मिळाली नाही तर तो वेडाही होऊ शकतो. या सगळ्या गोष्टींचा स्वतंत्र विचार करायला गेलो तर आपल्या लक्षात येते की, ‘भाषा’ हा विषय किती खोल आहे! मातृभाषेचे महत्त्व कळण्यासाठी आम्हाला पहिले कळले पाहिजे की ‘मातृभाषा म्हणजे काय?’ आपल्या संस्कृतीत आपण सगळ्या गोष्टींचा आदर करतो. याच आदरातून जन्माला आलेला हा शब्द.
एका शब्दाचे हवे तसे आणि तेवढे अर्थ आपण घेऊ शकतो. माझ्या मते, मातृभाषा ती भाषा आहे जी आपल्या माते समान असते. आपली आई कोणती गोष्ट शिकवत नाही आम्हाला? तिला सगळं येत असतं. माझी आई मला अन्नाचे घास भरवते, तर माझी मातृभाषा शहाणपणाचे धडे शिकवते. माझी मतं मांडायला सांगते. आजच्या काळात आवाज बंद करणारे कितीही लोक असले तरी माझ्या विचारांना आवाज देणारी ती माझी मातृभाषा. आजच्या काळातला गैरसमज आहे की आपलं मूल इंग्रजीत शिकलं नाही तर ते आयुष्याच्या प्रतियोगितेत मागे राहणार. आयुष्यात काही करायचं असेल तर इंग्रजी पहिली यायला पाहिजे. माझा प्रश्न आहे- ‘कशाला?’ जर फक्त इंग्रजीनेच यश मिळतं तर मराठी माध्यमातून शिकलेल्या आंबेडकरांना आज पूर्ण देश मान नाही का देत? मराठी मुलखाचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांवर विश्वभर अभ्यास चालू आहे…
आयुष्यातील यश हे भाषेवर ठरत नाहीच, तर मग का देऊ नये आपल्या भाषेला मान? का अभिमानाने सांगू नये की ‘मी मराठी आहे!’ पु.ल. सांगून गेलेत की जगातल्या सगळ्या भाषांवर तीच व्यक्ती प्रेम करू शकते जिचं आधी स्वतःच्या भाषेवर प्रेम आहे.
मातृभाषेतूनच आपण आपली संस्कृती आणि परंपरा जपत असतो. माझी भाषा जर मुघल व इंग्रज यांच्या संकटातूनसुद्धा जराही धक्का न लागता बाहेर आली, तर या ‘इंग्रजी’च्या फेडाने तिला धक्का बसलेला आपण कोणीच सहन करू नये. आपली भाषा आपणच टिकवली पाहिजे!