– डॉ. राजेंद्र रामचंद्र साखरदांडे
एकाएकी दवाखान्याबाहेर मोठमोठे आवाज ऐकू येऊ लागले. दारावरची बेल जोराने वाजू लागली. म्हणता म्हणता हसण्याचा आवाज येऊ लागला. कुणीतरी दरवाज्याबाहेर जोरजोराने हंसत होते. मी धावतच दार उघडले. दोन बायका एका बाईला पकडून आत आणत होत्या. बरोबर चार-पाच पुरुषगडी होते. ती बाई जोरजोरात हसत होती… हसता हसता रडत पण होती. ती शीला होती.
शीला जवळच्याच वाड्यावर राहायची. चार वर्षांपूर्वी तिचे लग्न झाले होते. घरात फक्त तिघेच – ती, तिचा नवरा व तिची सासू. कितीतरी विश्वासाने, मनात आपल्या पुढील आयुष्याची स्वप्ने घेऊन ती नवर्याच्या घरी आली होती. ती दहावी पास होती. नवरा पदवीधर, सरकारी नोकरी करत होता. आल्या आल्या घरचा ताबा तिने घेतला. ती सुंदर होती. सडपातळ, कुठलाच दिमाख, तोरा नव्हता. मोठ्या आशा, अपेक्षाही बाळगल्या नव्हत्या. सगळे काही सुरळीत चालले होते. सासू व सुनेचे चांगले पटत पण होते. साहजिकच वाड्यावरच्या बायकांच्या भुवया वरती गेल्या होत्या. पण, तिला त्याची पर्वा नव्हती. ती आपल्या कुटुंबात सुखी होती.
लग्नाला वर्ष उलटून गेले होते. सकाळी सकाळी शीलाला चक्कर येत होती. उलट्या पण होत होत्या. लक्षणे चांगली होती. सासू, नवरा चांगली खुशीत होती. सासू म्हणाल्या, ‘‘अरे, तिला डॉक्टरकडे घेऊन जा.’’ तिची पाळी चुकली होती. बाळाचे आगमन होणार म्हणायचे!!
शीला नवर्याबरोबर तपासायला आली. सर्व काही ठिक वाटत होते. महिन्याची पहिलीच तारीख चुकली होती. मनात शंका राहायला नको म्हणून काही टेस्ट करायला लावल्या. औषधे दिली. ती निघून गेली. चार दिवसांनी नवरा तिला घेऊन परत आला. दोघांचेही चेहरे पडलेले. रिपोर्ट निगेटिव्ह होता. ती गरोदर नव्हती. जेव्हा स्त्रिला आई होण्याची जबरदस्त इच्छा होते, तेव्हा गरोदरपणाची सगळी लक्षणे दिसू लागतात. तिच्याहीबाबत तेच घडले होते. नवर्याला तर धक्काच बसला होता. शीला गर्भगळीत झाली होती. आपण आता आई होणार, या आनंदात ती रमली होती. तिची आशा विफल ठरली होती. मी तिच्या नवर्याला स्पेशालिस्टला दाखवायला सांगितले. पण त्याने हुं की चु केले नाही. तिचे डोळे त्याला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करीत होते. नवर्यासमोर ती काहीही बोलू शकली नव्हती. मीही तिच्या मनातले समजू शकलो नव्हतो.
तिच्या घराशेजारी हल्ली एक बिर्हाड रहायला आले होते. नवरा-बायको व त्याचे तान्हेले मुल. शीलाचे त्या कुटुंबाशी चांगले जमले होते. मुलाला घेऊन खेळताना तिचा वेळ कसा जायचा तिला समजतच नव्हते. त्या मुलांत ती एवढी गुंतलेली होती की तिला स्वत:चे भान पण नव्हते. दिवस जात होते. शीलाच्या नवर्याने तिला स्त्रीरोगतज्ज्ञाला दाखवले नाही की स्वत:चीही तपासणी करून घेतली नव्हती.
शीलाला घेऊन तिचा नवरा परत माझ्याकडे आला. ती आजारी होती. तिला झोप लागत नव्हती. पोटाची जळजळ वाढली होती. वजनही कमी झालेले. कारण स्पष्ट होते. शेजारी राहायला आलेले बिर्हाड नुकतेच आपल्या गावी निघून गेले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे ते मूलही. मला लक्षण ठिक वाटत नव्हते. आज शीलाला कुणीतरी सावरायला हवे. नाहीतर…!
आज शीला हसत होती… रडत पण होती. मी तिला झोपेचे इंजेक्शन दिले. मी तिला मानसोपचार इस्पितळात पाठवली. तिचे ते भकास डोळे…. अस्थावस्त कपडे मला बेचैन करून गेले. काही दिवसांनी तिचा नवरा भेटला. शीला आता बरी होती. डॉक्टरांनी तिच्या आजाराचे निदान केले होते. सध्या ती बाहुली बरोबर खेळत होती. तिथले डॉक्टर तिच्या नवर्याबरोबर तिच्या आजाराविषयी बोलले. तिला मूल हवे होते. तिच्या आजाराचे तेच कारण होते. नवरा तयार झाला. ती आजारातून उठल्यावर तिला तो डॉक्टरकडे घेऊन गेला. तिच्यात काही दोष नव्हता… दोष फक्त त्यांच्यात होता. शीलाला तिच्या नवर्यापासून मुल होणार नव्हते. नवर्यासमोर प्रश्नचिन्ह उभे होते.
दिवस गेले. महिने गेले… शीला, तिचा नवरा मला काही भेटली नव्हती. त्या दिवशी दारावरची घंटा वाजली. मुलाला घेऊन जोडपे आले होते. मुलाला ताप होता. मी दवाखान्याचा दरवाजा उघडला. समोर पूर्वीचीच शीला… टवटवीत, हासरी, फुललेल्या चेहर्याची शीला कवेत मुलाला घट्ट पकडून घेऊन आली होती. नवराही बरोबर होता. मी मनातल्या मनात जोराने हसलो. मला त्यांच्याहीपेक्षा जास्त आनंद झाला होता. त्या जोडप्याने मुलाला दत्तक घेतला होता. आपल्याला मुल होणार नाही हे सत्य तिच्या नवर्याला पटले होते. शीला त्याला हवी होती. तिच्यावर त्याचे फार प्रेम होते. तिच्यावरच्या प्रेमापोटी त्या मुलाला त्याने आपले मानले होते.
शीला आज खुश होती. तिचे सुख तिच्यापासून कुणीही हिरावू शकत नव्हते. उगाचच डोळ्यांसमोर कितीतरी बायकांचे चेहरे नाचत होते. ती माया, ती जानकी, ती रेवती… त्यांच्याही नवर्यांनी आपल्या बायकांना समजून घेतले असते तर…!! मी उगाचच माझ्या रुग्णांना स्वत:ला गुंतवून घेत होतो. ‘‘अरे, तू डॉक्टर आहेस… तुझ्याकडे पेशंट येतच राहतील… त्या प्रत्येकांत तू स्वत:ला गुंतवून घेणार आहेस का?’’ डोळ्यासमोर ‘खामोशी’तल्या वहिदा रहेमानचा चेहरा भलतेच काही सांगून गेला. झटक्यात मी भानावर आलो. समोर बसलेली स्त्री पेशंट मला सांगत होती, ‘‘डॉक्टर, मला हल्ली झोप येत नाही… पोटात जळजळ फार होते… उलट्यघ पण वरचेवर होतात. ह्या महिन्याची पाळी पण आलेली नाही.’’ तिच्याबरोबर तिचा नवरा पण आला होता. ही…. परत…. दुसरी शीला तर नसेल…!!
……………

