– सौ. पौर्णिमा केरकर
‘आमच्या एका भावाने आत्महत्या केली आहे, त्यामुळे आमच्या घरी सुतक चालू आहे. कृपया शांतता राखा!’ सोलापुरातील ‘अंकोली’ या खेडेगावातील विज्ञानग्रामात प्रवेश करतेवेळीच प्रवेशद्वारावरील ही पाटी नजरेस पडते आणि इतक्या लांबपर्यंत आपण आलो ते ‘विज्ञानग्राम’ आता पाहायला मिळणार नाही याची खंत वाटते. हा असा विचार मनात येतो न येतो तोच पुढचे अनेक फलक, त्यांवरील सूचना वाचायला सुरुवात होते आणि इथं काहीतरी वेगळंच आहे, हे वेगळेपण कोणतं याचा शोध घेण्याची तयारी सुरू होते. प्रवेशद्वारापासून विज्ञानग्रामात जाईपर्यंतच्या प्रवासातील सारेच फलक आपल्याला विचार करायला लावणारे- स्वतःच्याच विचारक्षमतेला अधिक सक्षम करायला लावणारे. असे हे फलक अनुभवण्याचा, वाचण्याचा आमचा हा पहिलाच अनुभव. त्यामुळे आपण इथे काहीतरी वेगळं शिकण्यासाठी आलो आहोत याची जाणीव तीव्रतेने झाली.
विज्ञानग्राम, सोला(र)पूर, अंकोलीचे अरुण देशपांडे- सुमंगल देशपांडे हे दांपत्य मोहोलला डॉ. अनिल अवचट बाबांच्या सत्कार सोहळ्याला प्रत्यक्ष भेटले. एरव्ही त्यांच्याविषयी, त्यांच्या शेतीविषयक प्रयोगांविषयी एकले होते, पण तिथपर्यंत जाण्याचा योग आला नव्हता. अरविंद मोटे हे आमचे पत्रकार स्नेही- त्यांनीच हा योग घडवून आणला आणि एका अपरिचित जगाची अनोखी ओळख घडली. मानवी जीवन जगण्यासाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या नाहीत यांकडे डोळसपणे पाहता आले.
१९७६ ते १९८० या चार वर्षांच्या कालखंडात त्यांचा बाबा आमटे यांच्याशी संपर्क आला. त्यांच्या सहवासात त्यांनी ही वर्षे घालवली. त्यांचे काम जवळून पाहिले. त्यापासूनच प्रेरणा घेऊन त्यांनी आपल्याला अशा तर्हेच्या उपक्रमात सहभागी करून घेतले. त्यांचे बोलणे, कृती आणि प्रत्यक्षातले जगणे यातील प्रामाणिकपणाच आपल्याला अधिक अंतर्मुख करतो आणि आपण जगताना असंख्य गोष्टींचा वापर गरज नसतानाही करत जातो याचा साधा विचारही डोक्यात येत नाही. त्यांचे वडील प्रो. आर. पी. देशपांडे हे सॉईल सायन्टिस्ट होते. आय.आय.टी.सारखे उच्चशिक्षण घेऊन फक्त पैसाच मिळवायचा हे स्वप्न त्यांनी कधीच बघितले नाही. उलट जगण्यासाठी पैशांची गरज असतेच कोठे? जो काही गरजेपुरता हवा असेल तो कमविण्यासाठी काही जिवाचा आटापिटा करावा लागतच नाही. निसर्गनिर्मित सार्या गरजेच्या वस्तू तर आपल्याला फुकटातच मिळत असतात. पण त्याची निर्मलता टिकवून ती स्वीकारण्याची मानसिकतासुद्धा माणसांनी ठेवलेली नाही.
माणसाला जगण्यासाठी खरं तर ‘हवा’ अतिमहत्त्वाची. ती आपल्याला हा निसर्ग देतो. पाण्याच्या बाबतीतही तेच आहे. पण त्यांचे संवर्धन करण्याविषयीची अनास्था आपल्याला नडते. विज्ञान सांगते- प्रत्येक माणसाला त्याने एक तास जरी काम केले तरी उच्चवर्गीय जीवनमान प्राप्त होऊ शकते. आपला देश श्रीमंत आहे. परंतु या देशाची श्रीमंती आपल्याला माहीतच नाही. पेट्रोल-डिझेलवरती आज आपली जीवनपद्धती सुरू आहे. पण हे सारे कितपत टिकणार आहे? आपली मूळ संस्कृती शेती आहे. ‘अन्नदाता भव’ असे म्हणून एका बाजूला बळीराजाचे गोडवे गायचे, परंतु महागाईच्या नावावर मात्र त्याची पुरती छळवणूक करायची. हवा, पाणी, अन्न हे महत्त्वाचे घटक आपल्याला जगवतात. परंतु तमाम मानवजातीला अन्न पुरविणारा शेतकरी आज दुय्यम ठरलेला आहे. बाजारातून टॉमॅटो, कांदे अल्प दरात स्वीकारताना शेतकर्याला किती वेदना झाल्या असतील, हे सर्व पिकवताना त्याला आपण कष्टाचा योग्य मोबदला देतो का? हा साधा विचारही आपण करत नाही. याच विचाराने विज्ञानग्रामाच्या दर्शनीच जी पाटी लावलेली आहे त्यावर ‘आमच्या भावाने आत्महत्या केलेली आहे’ असे लिहिलेले आहे.
हे भाऊ म्हणजे असे शेतकरी जे कष्ट करून आपले सर्वस्व संपवायचे. पण त्याच्या बदल्यात त्यांना काहीच मिळत नाही. कर्जाचा डोंगर- मग जगायचे कसे? कुटुंबाला पोसायचे कसे? हा त्यांच्यासमोर जटिल प्रश्न. त्यासाठी मग पर्याय आत्महत्येचा! अशा कितीतरी शेतकर्यांनी देशभरात, प्रामुख्याने महाराष्ट्रात आत्महत्या करून स्वतःला संपवून टाकले. त्यांच्यामागे त्यांच्या कुटुंबीयांचे काय झाले? याविषयीची अनुकंपा आपल्या मनात कधी दाटून येत नाही. त्यांची कुटुंबे कशी जगत असावीत? हा साधा विचारही आपल्या डोक्यात येत नाही. कांदे, टॉमॅटो महाग झाले म्हणून घासाघिस चालू असते, परंतु पेट्रोल-डिझेलचा मात्र मुकेपणानेच स्वीकार करतो. आपले शरीर, आपले आरोग्य निरोगी राहते ते सकस अन्नावर; पेट्रोल, डिझेल किंवा अन्य प्रतिष्ठेच्या वस्तूंमुळे नाही! परंतु हा साधा विचारही आपण करत नाही. बळीराजा वेदनेत पिचून जात असता आपण मात्र भौतिक सुख-समृद्धीचे गोडवे गात असतो. प्रत्येकाने कष्ट करून जर स्वतःपुरते पिकविले तर प्रत्येक कुटुंब, समाज स्वावलंबी होऊ शकतो. त्यातूनच स्वाभिमानी वृत्ती अंगी बाणवली जाते. अरुण देशपांडे यांनी स्वतः ही सारी धडपड केलेली आहे. ही कामे करणे म्हणजे आपण कोठेतरी इतरांपेक्षा कमी आहोत ही भावना मनात निर्माण होते म्हणून आपण अशा कामाकडे वळत नाही. कितीतरी ऊर्जा आपल्यात असते. कलात्मकता अंगी बाणवलेली असते, पण आपण आपले चौकोनातच राहणे पसंत करीत असल्याने मोठे होत नाही.
खरे तर विज्ञानग्रामाच्या दर्शनी भागात असलेल्या फलकावरील सूचना वाचूनच आत प्रवेश मिळतो. सूचना मान्य होत नसतील तर आत येऊन प्रकल्प बघायचा. बघायलाच हवा अशीही सक्ती नाही. अनुभवायचे ते मात्र प्रामाणिकपणाने. शेती करण्यासाठी आपलं योगदान देणारी माणसं इथे महत्त्वाची मानली जातात. पुरुषाबरोबरीने निम्म्या महिला एका गटामध्ये असायला हव्यात. त्यांच्यासाठी, विद्यार्थी समूहासाठी इथे प्रशिक्षण दिले जाते. कोणीतरी संस्था एखादा गट प्रशिक्षणासाठी पाठवते. त्यांना काहीच माहिती नसते. पुढे जाऊन त्यांना शेतीत राबावेसे वाटत नाही. मौज करण्याच्या वृत्तीतून जे येथे येतात त्यांच्यासाठी हे पर्यटनस्थळ नाही. त्यांना तसे स्पष्ट शब्दांत सांगताना सरळ परतीचा मार्ग दाखविला जातो. प्रामाणिक वृत्तीला, सचोटीला येथे सन्मानीत केले जाते. येथे शनिवार- रविवार आणि सुट्टीच्या दिवशी प्रकल्प पाहावयास मिळत नाही. तुमच्या सुट्टीत आणि फावल्या वेळेत येण्याचे हे ठिकाण नाही. फलकावर पुढे असेही लिहिलेले आहे की, ‘पिकनिक किंवा सहलीचे हे ठिकाण नसून स्वावलंबी शेतकरी, वैज्ञानिक आणि प्रयोगवीरांची ‘रूरबन’ (रूरल+अर्बन) वसाहत आहे. येथील पर्यावरण शिक्षा अतिशय कडक आहे याची कृपया नोंद घ्यावी.’ येथे भेट देणार्यांना महात्मा गांधी, म. ज्योतीराव फुले हे कोण आहेत आणि त्यांनी शेतकर्यांसाठी कोणती कामं केलीत याची जाणीव असायला हवी. प्रवेश शुल्क म्हणून शारीरिक श्रम करणे महत्त्वाचे मानले गेले आहे. हे जमत नसेल तर आठवड्याचे वेतन. जे कोणी प्रशिक्षणासाठी येतात त्यांनी स्वतःच स्वतःचे घर बांधायचे. ते म्हणतात, येथे पक्के घर असावे अशा तर्हेचा पाऊसच पडत नाही. त्यामुळे एखाद्या झाडाखालीसुद्धा आपण सहज राहू शकतो. हे घर उभारणे म्हणजे अवतीभोवतीच्या निसर्गातील वस्तू मिळवून त्याच्या जोडीने ते करणे. फलक वाचत असताना आपल्याला यात काहीतरी वेगळे आहे असे वाटेल, पण आपली कृती ही आपल्यासाठी आनंदमयीच ठरेल!
एखादी व्यक्ती आपल्या विचारांच्या दिशेवरच आपल्या स्वतःच्या जगण्यात बदल घडविते, परंतु इतर अनेक पिढ्यांसाठी ती दिशादर्शकाचे काम करत असते. यात फार मोठी सामाजिक बांधिलकी असते. अरुण देशपांडे हे शेतकी अभियंता. सुरुवातीला बँक ऑफिसर म्हणून त्यांनी नोकरी केली. पदव्युत्तर शिक्षण ‘वॉटर ऍण्ड लँड मॅनेजमेंट’मधून झाले. पुण्यात टेम्पो सर्विस केली, हमाल-ड्रायव्हर-टेम्पोचालकांची युनियन बांधली. इंडस्ट्रियल कन्सलटन्ट म्हणून काम केले. १९७३ मध्ये त्यांनी बँकांवरतीच चारशे वीस खटले भरले. बाबा आमटेंशी त्यांचा परिचय झाला. महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा मिळाली. शामबहादूर मम्र हे मध्य प्रदेशमधील हिंदी कवी. त्यांच्या ‘नाव’ या कवितेमुळे देशपांडे यांचे जीवन आमूलाग्र बदलले. भारत जनविज्ञान जथ्यात ते सामावले आणि त्यामुळे भारताचा कानाकोपरा हिंडायला त्यांना मिळाला. ते सांगतात की, ‘‘सायकल जवळ बाळगून अवजारांना धार लावण्याचे काम केले. त्यामुळे मी उत्कृष्ट धार लावणारा म्हणून ओळखला जाऊ लागलो. १९८५ च्या दरम्यान धार लावण्याचे काम केले, आज अडुसष्ठव्या वर्षीही मी उत्कृष्ट धार लावू शकतो. अनेकांनी शिक्षण परिस्थितीमुळे, कंटाळ्यामुळे अर्धवट सोडलेले असते. ते सर्वच माझ्याभोवती जमा व्हायचे. जगामध्ये पैसे मिळविणे सोपे असते. जगण्यासाठी फार पैसे लागत नाहीत. शाळेपासून जी मुले तुटलेली असतात त्यांच्यात जगण्याचे शहाणपण असते आणि तीच मुले हुशार असतात. हा आपला विकासाचा मार्ग चुकलेला आहे. जास्तीत जास्त शहरे पेट्रोलियमवर निर्भर आहेत. उद्या पेट्रोल संपले म्हणजे काय? आपण किती खुळचट वागतो. प्रगतीच्या आपल्या संकल्पना किती चुकीच्या आहेत. आपल्या पूर्वजांपेक्षा म्हणूनच आपण पंचवीसपट मूर्ख आहोत असेच समजायचे. मानवी गरजा भागविण्यासाठी अक्कल व शहाणपणा लागतो. हवा, पाणी, अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शिक्षण, मनोरंजन, संपर्क, संरक्षण, न्याय, प्रतिष्ठा, आत्मसन्मान, शांतता, हव्यासापासून मुक्ती या आपल्या गरजा आहेत. सर्वसामान्यांना आणि तथाकथित लक्ष्मीपुत्रांना आपला बँक बँलन्स कोट्यवधी रुपयांचा आहे याचा सार्थ अभिमान असतो. त्याचा संग्रह करताना ताण-तणाव, चिंता, भ्रष्टाचार यांची सोबत तो करतो. परंतु अरुण देशपांडे हे पाच हजार कोटी लिटर पाण्याचे मालक आहेत. त्यांची ‘पाणी बँक’ एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी साठवते.
‘अरुण देशपांडे आणि त्यांचे प्रयोग’ हा विषय तर कितीतरी मोठा आहे. त्यासाठी लिहिणे आणखी वेगळे. ज्यांच्या जगण्याच्या कृतिशीलतेमधून प्रेरणा घ्यावी अशी माणसे विरळाच. संपूर्ण स्क्रॅप मालातून साकारलेले त्यांचे घर पाहताना घरांची आपली स्वप्ने, संकल्पना, पैशांचे अवास्तव स्तोम- सारेच गळून पडते. आपलीच आपल्याला नव्याने जाणीव होते. त्यांच्या घरात अशा वस्तू ज्या पैसे देऊन विकत आणलेल्या आहेत- अभावानेच दिसतील. विजेचा वापर कमीत कमी. फक्त एकच बल्ब. त्याच्या उजेडात सारी कामे. चार्ज करायचे असेल तर सायकल स्टार्ट करायची ऊर्जाप्राप्तीसाठी- आपल्या जगण्यालाच ऊर्जा प्राप्त होते. एकूण बावन्न एकर परिसरात असलेला हा विज्ञानग्राम प्रकल्प म्हणजे नवविचारांची इथल्या भूमिपुत्रांना वाचविण्यासाठी केलेली चळवळ आहे. एवढे सारे मानसन्मान, धनदौलत, ऐषोआरामी जीवन दिमतीला असताना ते सारे त्यागून हा सच्चा भूमिपुत्र व त्याला त्याच्या प्रत्येक विचारात सोबत करणारी त्याची पत्नी सुमंगल यांच्याविषयी तर बोलावे तेवढे कमीच आहे.
विज्ञानग्राम सोला(र)पूर अंकोली येथे विकसित झालेल्या १०० कुटुंबासाठी अत्यावश्यक पायाभूत सोयी, पतपेढ्या, वॉटर बँक, सॉईल बँक, शेल्टर बँक, साहित्य बँक, एनर्जी बँक, स्क्रॅप बँक, नर्सरी, ऍनिमल बँक, टूल्स बँक, फूड बँक, विजडम बँक ही अशी नावे जरी असली तरी त्यामागची कल्पकता अफलातूनच आहे. घर बांधायला पैसे नव्हे तर अक्कल लागते. एक वॉटर बँक केली तर ६०० चौरस फुटांची ४० मातीची घरे तयार होतात. त्यांचे स्वतःचे घर म्हणजे तर एक संपूर्ण नवा विषयच व्हावा अशाच तर्हेचे! ज्यांना शेतकर्याच्या कष्टाची किंमत कळत नाही त्याच्याशी आमचे काहीच नाते नाही. महागाई कोठे झालेली आहे? उलट महागाईच्या नावावर शेतकर्याची पिळवणूक वाढलेली आहे. शेतकरी नवरा म्हणून हवा आहे असे ज्या मुलीला मनःपूर्वक वाटते, तिला या ग्रामात सहज प्रवेश आहे. खूप खूप गोष्टी शिकण्यासारख्या… त्यांच्याशी तासन्तास बोलतच राहावे. त्यांच्या कल्पकतेतून आपणही काही विचार घेऊन आपले, आपल्या परिसराचे जीवन समृद्ध करावे असे मनोमन वाटून गेले.
आपला जीवनप्रवास समृद्ध दिशेने व्हावा असे खूप जणांना वाटते. परंतु योग्य मार्ग सापडत नाही. असे काही विचार, अनुभव, वेगळ्या आडवळणाच्या वाटा स्वीकारून आपले जीवन व्यतित करणारी व्यक्तिमत्त्वे आपल्याला अनुभवता आली तर जगण्याची उंची प्राप्त होते. सर्वच गोष्टी आपल्या ठायी असताना आपली धाव मात्र पूर्णपणे वेगळ्या दिशेने होते व आयुष्याचे गणितच चुकते. विज्ञानग्राम प्रकल्पात विद्यार्थ्यांसाठी, सामाजिक संघटनांना, इतर शिकायला येणार्या अनेक समूहांना प्रशिक्षण दिले जाते. त्यात स्वावलंबन, स्वाभिमानाची दिशा असतेच, त्याच बरोबरीने शेतकर्याविषयीची प्रामाणिक भावना बाळगण्याची प्रेरणा मिळते. अन्नदाता किती महत्त्वाचा आहे हे जे सर्वांच्याच विस्मृतीत गेलेले आहे, त्याची जाणीव येथे होते. प्रतिष्ठा, पैसा, दौलत, श्रीमंती यांची सारीच समीकरणे गळून पडतात. दिवसाला लाखो रुपये कमविण्याची क्षमता असलेल्या, अनेक मोठमोठ्या मानसन्मानांनी आपल्या कार्याची पावती दिलेल्या अरुण देशपांडे- सुमंगल देशपांडे यांचे सहजीवन जगण्याकडे- जीवनाकडे निःसंग वृत्तीने पाहायला शिकवते आणि आपल्यातील खुजेपणाची आपल्याला चाहूल लागते. आपल्याला शिकायचे, आपल्या मातीप्रती इमान राखायचे, शेतकर्याविषयीची कृतज्ञता जागवायचीय तर सोलापूर जिल्ह्यातील अंकोली गावातील ‘विज्ञानग्राम’ प्रकल्प अनुभवायलाच हवा!