माता न तू वैरिणी…

0
12
  • प्रा. रमेश सप्रे

चौदा वर्षांचा वनवास संपल्याशिवाय अयोध्येत न परतण्याचा निर्धार व्यक्त करणारा राम जसा महान आहे तसाच चौदा वर्षं अयोध्येत प्रवेश न करणारा संन्यस्त वृत्तीचा भरतही महान आहे. भरताचा निग्रह रामापेक्षा काकणभर सरसच आहे, कारण तोही रामासारखा तापस व्रताचं पालन करत राहिला.

गीत रामायणातील हे काहीसे वेगळे गीत. ‘धिःकार’ हा जर नवरसातला रस असता तर हे गीत नक्की त्या रसातले असते. नाहीतरी बीभत्स म्हणजे किळस आणणारा रस आहेच ना? असो.
भरताने आपली माता कैकेयीला उद्देशून हे गीत (?) म्हटलेय. त्यात क्रोध, निषेध, धिःकार असे नकारात्मक भाव व्यक्त झाले आहेत. असे म्हणतात की हे गीत गायल्यावर त्यातील आवेग नि उद्वेग यामुळे गायक सुधीर फडके मंचावर काही वेळ पडून राहायचे. त्यापूर्वी समोरचा पडदा अर्थात पाडलेला असायचा. खूप ऊर्जा वापरल्याशिवाय स्वरातील चढ-उतार, शब्दातील तुच्छता, द्वेषभावना व्यक्त करणे (एका अर्थाने जिवंत करणे) ही सोपी गोष्ट नव्हती. असो.
चित्रकूट पर्वताकडे निघण्यापूर्वी भरताला अयोध्येत जो अनुभव आला तो लक्षात घेण्यासारखा आहे. आपल्या आईचे आपल्यावरच्या स्वार्थी, संकुचित प्रेमातून केले गेलेले दुष्ट कारस्थान लक्षात आल्यावर एरव्ही शांत स्वभाव असलेल्या भरताच्या मनाचा तोल गेला. त्याच्या तोंडून जे भयंकर उद्गार बाहेर पडले त्यात माता कैकेयीबद्दलचा प्रचंड राग होता त्याहीपेक्षा रामाला अन्यायाने वनवासात पाठवल्याबद्दलचे दुःखही होते.

तशी या संपूर्ण प्रसंगाची सुरुवात खूप पूर्वीपासून झाली होती. दशरथाच्या मनात श्रावणकुमाराच्या अंध मातापित्यांनी कळवळून दिलेला शाप घर करून राहिला होता. त्याचबरोबर राज्यशुल्का (म्हणजे मुलाला सिंहासनावर बसवण्याच्या, राज्य देण्याच्या वचनानंतर दिली गेलेली) कैकेयीच्या विवाहप्रसंगी तिचे पिताश्री केकय देशाचे राजे अश्वपती नि भाऊ युधाजित यांना दिलेल्या वचनानुसार भरताला प्रथम यौवराज्याभिषेक आणि नंतर राज्याभिषेक करणे आवश्यक होते याचेही स्मरण दशरथाला होते, म्हणून तो अस्वस्थ होता. त्याने मनातल्या मनात एक योजना तयार केली. त्यानुसार भरताला त्याच्या आजोळी पाठवून दिले. बरोबर अर्थातच शत्रुघ्नही गेला.
त्यानंतर अतिशय वेगाने हालचाली करून वसिष्ठ, इतर मंत्री, अमात्य, प्रतिष्ठित प्रजाजन यांची संमती घेऊन रामाचा यौवराज्याभिषेक करण्याचे दशरथाने ठरवले. सर्व राजांना निमंत्रणे पाठवली. केकय देशाच्या राजाला म्हणजे कैकेयीच्या पिताश्रींना मात्र मुद्दाम निमंत्रण धाडले नव्हते. अशा प्रकारे श्रावणकुमाराच्या मातापित्यांचा शाप, केकयाधीश अश्वपती राजाला दिलेले वचन अशा दुहेरी कात्रीत अडकल्यामुळे दशरथ अत्यंत अस्वस्थ होता. त्याचा सद्सद्विवेक त्याला बोचत होता.
पण अटळ नियतीला हे मान्य नव्हते. राम आपल्यापासून दूर जाण्यापेक्षा आपणच रामाला अयोध्येच्या राज्यावर बसवून राण्यांसह वानप्रस्थाश्रमात यायचे हा दशरथाचा विचार खरे तर योग्य होता. पण याच्या मुळाशी कपट होते.

भरताला याची काहीही कल्पना नव्हती. अचानक अयोध्येला नेण्यासाठी रथ आल्यामुळे त्याला आश्चर्यच वाटले. वाटेवर अनेक प्रश्न विचारूनही सारथ्याने एकही उत्तर दिले नव्हते. अयोध्येत पोचल्यावर साऱ्या नगरीवर शोककळा पसरल्याचे त्याला जाणवले. राजवाड्यात प्रवेश केल्यावरही कुणी काही बोलेना तेव्हा तो माता कैकयीकडे गेला. तिने राजा दशरथाच्या निधनाची वार्ता सांगितली, नंतर काहीशा उत्साहाने आता तू राजा होणार हेही सांगितले.
भरताच्या उद्रेकाची ही सारी पार्श्वभूमी होती. राजा दशरथाने दिलेल्या वरांच्या कार्यवाहीचा भाग म्हणून राम चौदा वर्षांच्या वनवासासाठी निघून गेला होता. त्याच्याबरोबर अर्धांगिनी सीता नि लक्ष्मण हेही वनात गेले होते. हे समजल्यावर तर भरताला दुःखाचा आवेग आवरता आला नाही. पण तितकाच राग आपल्या आईचाही आला. त्याच्या शब्दबाणांनी कैकेयी अतिशय घायाळ झाली होती. तो कैकेयीला खूप काही धिःकारपूर्वक बोलतो. फक्त एकाच गोष्टीबद्दल तिचे आभार मानतो. ती गोष्ट म्हणजे, तिच्या पोटी जन्माला आल्यामुळे रामासारखा आदर्श भाऊ त्याला मिळाला होता.

त्याकाळच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारे काही प्रश्न भरत कैकेयीला रामाच्या वनवासासंदर्भात विचारतो-

  • रामाने कोणत्याही कारणाने ज्ञानी, विद्वान ब्राह्मणांचे धन अन्यायपूर्वक हरण केले होते का?
  • रामाने कोणा गरीब, धनहीन व्यक्तीची अकारण हत्या केली होती का?
  • रामाच्या मनात परस्त्रीबद्दल अभिलाषा निर्माण झाली होती का?
  • रामाच्या हातून कळत-नकळत कोणता भ्रष्टाचार झाला होता का?
    या साऱ्या प्रश्नांची उत्तरे नकारात्मक होती. तरीही भरताच्या या प्रश्नांतून त्यावेळी राजाच्या वर्तनाबद्दल, चारित्र्याबद्दल प्रजेच्या (समाजाच्या) अपेक्षांची कल्पना येते.
    यात जे संस्कार दडलेले आहेत तो रामायणाचा प्राण आहे. पित्याच्या वचनपूर्तीसाठी अरण्यात जाणारा राम जसा श्रेष्ठ आहे, तसाच सर्व दृष्टींनी राजा बनण्यास योग्य अशा ज्येष्ठ नि श्रेष्ठ रामासाठी अयोध्येच्या सिंहासनाची विश्वस्त (ट्रस्टी) म्हणून सेवा करणारा भरतही श्रेष्ठ आहे. चौदा वर्षांचा वनवास संपल्याशिवाय अयोध्येत न परतण्याचा निर्धार व्यक्त करणारा नि त्यानुसार जगणारा राम जसा महान आहे तसाच चौदा वर्षं अयोध्येत प्रवेश न करणारा संन्यस्त वृत्तीचा भरतही महान आहे. भरताचा निग्रह रामापेक्षा काकणभर सरसच आहे, कारण तोही रामासारखा तापस व्रताचं पालन करत राहिला. राम परतला नसता तर त्यानं अग्निप्रवेश करून जीवन संपवण्याचा निर्धारही केला होता. इतकेच नव्हे तर रामाला राज्याभिषेक झाला तेव्हा लक्ष्मणाला यौवराज्याभिषेक केला गेला. कारण भरत आपल्या ‘वैरिणी मातेचं’ स्वप्न कधीही साकार होऊ देणार नव्हता.