Home बातम्या माणसं रंग का बदलतात?

माणसं रंग का बदलतात?

0

– दासू शिरोडकर

राजेश खन्ना चित्रपटसृष्टीतला एकेकाळचा सुपरस्टार! त्या काळात चित्रपट रसिकांना त्यांनी वेड लावले होते. तरूणाईच्या गळ्यातला तर तो ताईत! हसतमुख चेहरा, त्याच्या केसांची स्टाइल, त्याची अदाकारी, त्याची शब्द फेक, त्याचं चालणं, बोलणं सारंच अगम्य आणि मोहमयी असायचं. त्याचा तो सहजसुंदर अभिनय, गाणं गाताना फारसा धांगडधिंगा न घालताही केवळ शरीराची कमनीय हालचाल, मान आणि हात हलविण्याची ती विशिष्ट लकब आणि चेहर्‍यावरील हावभाव… सारं काही स्वप्नवत असायचं. रसिकांच्या मनाला मोहिनी घालणारं असायचं. तसा मी काही मोठा सिनेशौकीन नाही. तरूणपणीही नव्हतो. तरीही काही आर्ट फिल्म आणि हृदयाला भिडणारे चित्रपट व नाटकं मी पाहतो. तसा सिनेमापेक्षा मला नाटकाचा अधिक छंद. तरीही राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन ह्या दोन कलाकारांचे हीट आणि सुपरहीट चित्रपट मी पाहिले आहेत.

मला आठवतं, राजेश खन्नाचा मी पाहिलेला पहिला चित्रपट होता ‘राज.’ तसा तो मोठा हीट पिक्चर नव्हता. तरी त्या चित्रपटातच मला त्याचे पाळण्यातले पाय दिसले होते. ‘इसमे दम है!’, हे त्याचवेळी मला वाटून गेलं होतं. त्याप्रमाणे त्यानंतरची काही वर्षे बॉलिवूडवर त्याचं राज्य होतं. राजेश खन्ना ‘करील ती पूर्व दिशा’ अशी चित्रपटसृष्टीची अवस्था होती. त्या काळात तरूणाईवर तर त्याने जणू गारूड केलं होतं, त्याची हेअर स्टाइल, त्याची कपड्यांची स्टाइल लगेच तरूण पिढीत उतरायची. त्याची गाणी, त्याचे डायलॉग तरूणाईच्या ओठांवर घोळायचे. तरूणींच्या तर तो ‘दिलका टुकडा’ हो गया था. सारी तरूणाई त्याच्यामागे धावत होती.

यशाच्या शिखरावर असताना त्यावेळी नुकतीच चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेली ‘बाबी’ फेम टीन एज गर्ल डिंपल कापडिया राजेश खन्नाच्या जीवनात आली. पुढे त्याने तिच्याशी विवाह केला – लव्ह मॅरेज! त्याच्या जीवनात तो परमोच्च बिंदू असावा. मात्र त्यानंतर काही वर्षांनी त्याच्या कारकिर्दीला आणि जीवनालाही उतरती कळा लागली. लग्नाच्या वेळी त्याच्या आणि डिंपलच्या वयात बरंच अंतर होतं म्हणून पुढे मतभेद होण्यात हेही एक कारण असावं. दुर्दैवाने नंतरच्या काळात त्यांच्यातील मतभेद विकोपाला गेले आणि डिंपल त्याला सोडून गेली. मला वाटतं, हाच राजेशच्या जीवनातील मोठा टर्निंग पॉइंट असावा. डिंपलचं जाणं त्याच्या मनावर आघात करून केलं. तो एकाकी पडला आणि दुर्दैवाच्या गर्तेत सापडून दारूच्या आहारी गेला.

हे सारं आठवण्याचं कारण म्हणजे, बर्‍याच काळानंतर काही दिवसांपूर्वी एका टी.व्ही चॅनेलवर एका पंख्याच्या जाहिरातीमध्ये राजेश खन्नाची छबी दिसली. ओळख न पटण्याइतपत त्याच्या शरीराचं झालेलं चिपाड बघून मनाला यातना झाल्या. ‘फॅन्स क्या होते है, ये मुझसे पूछो!’ एक छोटासा डायलॉग. परंतु राजेश खन्नाच्या जीवनाशी निगडीत असलेला त्याच्यातला भावार्थ मनाला स्पर्शून गेला. किती खोल अर्थ भरलाय ह्या छोट्याशा डायलॉगमध्ये. तो डायलॉग हेच सांगतोय की चित्रपटसृष्टीवर राज्य करीत असताना त्यांचे जे फॅन्स होते, त्यांची मोजदाद कुणीही करू शकणार नाही. मात्र आज हा डायलॉग बोलताना त्यांच्या आवाजात ती लकीर असली, तरी जात नव्हती. त्या आवाजात त्या सार्‍या राजेश खन्नाची जादू नव्हती. ह्याच दरम्यान तब्येत अधिक बिघडल्यामुळे त्यांना मुंबईच्या लीलावती हॉस्पिटलमध्ये दखल करावं लागलं होतं. चांगले १५ दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागलं. ह्या दरम्यान म्हणे डिंपल त्यांच्या शेजारी होती. त्यांची देखभाल करीत होती. ही उपरती म्हणावी का? तशी ती झाली असेल, तर मला वाटतं, त्याला फार उशीर झाला.

काही टी.व्ही. चॅनेलवरून दाखविण्यात येणारी राजेश खन्नाची छबी, तसंच त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांचे काही ‘प्रोमोज’ बघून माझा एक मित्र म्हणाला – ‘राजेश खन्नाची शेवटी काय अवस्था झाली रे? पाहवत नव्हती. बायको सोडून गेल्यामुळेच तो शेवटी असा झाला ना? डिंपलवर खूप प्रेम होतं ना त्याचं?’ मी म्हटलं – ‘हो. त्यांचं ते लव्ह मॅरेज होतं.’

‘म्हणजे तिचंही त्यांच्यावर प्रेम होतं. मग का सोडून गेली ती त्याला?’

या प्रश्‍नाचं उत्तर काही माझ्याजवळ नव्हतं. म्हणून तोच पुढे म्हणाला – ‘का अशा वागतात रे या बायका? हल्ली असले प्रकार फार व्हायला लागलेत. का अशी वागतात माणसं?’

मी म्हटलं – ‘मी त्याच उत्तराच्या शोधात आहे. सरड्याप्रमाणे रंग का बदलतात माणसं? आणि रंग बदलून दु:खाला निमंत्रण का देतात?’

माणसाचं मन हे अगम्य अद्भुत अफाट सागरासारखं आहे. त्याच्या अंत-रंगात काय काय दडलंय, ह्याचा पूर्णत: शोध लागणं कठीण आहे. कधी तो शांत असतो तर कधी त्यावर हिंदोळ्यासारगे असंख्य तरंग उठतात. कधी त्याला भरतीचा उन्माद चढतो, तर कधी ओहटीच्या रूपात मृतप्राय होऊन तो निपचीत पडून राहतो. कधी तो रौद्ररूप धारण करून महाकाय लाटांनी प्रलय आणि विद्ध्वंस घडवून आणतो, तर कधी शांत शीतल हळवा होऊन माणसांना, जिवांना, होड्यांना आपल्या अंगा-खांद्यांवर हळूवार अलगद झेलून खेळवीत असतो. अशी त्याची विविध रूपं पाहून त्याच्या अंतरंगाचा ठाव लागणं कठीण वाटतं. तरी कोलंबस बनून मी त्याच्या शोधात आहे. पाहू जगात कोणकोणत्या रूपात त्याचं दर्शन घडतं! त्या सार्‍या रूपांना कॅनव्हासवर आणून त्यांचं एक प्रदर्शन मांडायची माझी मनीषा आहे. ती पूर्ण होईल का? हाही एक प्रश्‍न असला, तरी ‘व्हेअर देर इज अ विल, देयर इज अ वे!’ हे उत्तरही माझ्याजवळ आहे.