माझ्यावरील शिस्तभंगाचा आरोप चुकीचा

0
10

मंत्री सुभाष फळदेसाई यांचे प्रतिपादन

प्रदेशाध्यक्षांच्या प्रतिक्रियेने नाराज झाल्याचे स्पष्ट

कुडचडे मतदारसंघातील असलेल्या काकोडा येथील हनुमान मंदिरात जाऊन आपण सपत्निक तेथे देवाचे दर्शन घेतले. मात्र याचा अर्थ आपण काकोडा मतदारसंघातून पुढील निवडणूक लढवणार असा समज करून घेण्यात आला आहे.

आपण शिस्तभंग केल्याचा आरोप करून भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी आपणावर शंभर टक्के कारवाई केली जाईल, अशी जी प्रतिक्रिया माध्यमांना दिली ती फार दुखावणारी होती. मात्र त्याला अनुसरून आपल्याविरुद्ध जे-जे काही बोलले गेले त्याकडे आपण दुर्लक्ष केले असल्याचे काल भाजपचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी स्पष्ट केले. आपला सांगे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित झाला आणि आपणास पक्षाने कुडचडे मतदारसंघात उमेदवारी दिली तर आपण येथून आनंदाने निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी काल एका केबल टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीतून स्पष्ट केले. परंतु कुडचडे मतदारसंघातील उमेदवारी दिली नाही तर येथून निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नसल्याचे त्यांनी पुढे बोलताना स्पष्ट केले.

काल आपल्या मतदारांनी आपणाकडे येऊन त्याविषयी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे फळदेसाई यांनी सांगितले.
आपला सांगे मतदारसंघ जर एसटीसाठी आरक्षित झाला तर आपण कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढण्यास उत्सुक आहे. मात्र, याचा अर्थ पक्षाने आपणाला उमेदवारी दिली नाही तर आपण बंड करून येथे निवडणूक लढवणार असा होत नसल्याचे फळदेसाई हे म्हणाले.
नीलेश काब्राल हे कुडचडे मतदारसंघाचे आमदार आहेत आणि मतदार म्हणून पाहता या मतदारसंघावर पहिला हक्क हा त्यांचाच आहे. शिवाय रोहन फळदेसाई हेही त्याच मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास उत्सुक असून ते दोघेही आपले मित्र असून त्यांच्याशी आपले चांगले संबंध असल्याचे फळदेसाई यांनी स्पष्ट केले.

सांगे मतदारसंघ आरक्षित
झाल्यास माझ्यावर अन्याय

आपला सांगे मतदारसंघ हा आरक्षित झाला आणि अशावेळी जर पक्षाने आपली सोय दुसऱ्या मतदारसंघात केली नाही तर आपल्यावर फार मोठा अन्याय होणार असल्याचे ते म्हणाले.

कुडचडे मतदारसंघ हा आपल्यासाठी आजोळासारखा आहे. येथे आपले मामा तसेच बंधू व इतर कित्येक नातेवाईक राहत आहेत. आपणही पूर्वी या मतदारसंघात राहिलो असून आताही येणेजाणे होत असते असे फळदेसाई यांनी स्पष्ट केले. पक्ष माझ्यासाठी जो काही निर्णय घेईल त्याचे आपण पालन करणार असल्याचे ते पुढे बोलताना म्हणाले. केपे मतदारसंघ हा आरक्षित होण्याची मोठी शक्यता आहे, असे सांगून नपेक्षा आपण येथून निवडणूक लढवली असती, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुभाष फळदेसाई यांच्या कुडचडे मतदारसंघातील राजकीय हालचाली भाजप मुळीच सहन करणार नाही, असा इशारा दामू नाईक यांनी दिला होता. पक्षाने फळदेसाई यांना कुडचडे मतदारसंघात कोणतेही राजकीय काम करण्याची परवानगी दिलेली नाही आणि अशी कृती केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असा इशारा दामू नाईक यानी दिला होता. त्यामुळे काल सांगे मतदारसंघातील मतदारांच्या रागाचा पारा चढला. आमचे आमदार हे मंत्री असून त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष कारणाशिवाय असा इशारा कसा काय देऊ शकतात, असा प्रश्न उपस्थित करीत या मतदारांनी दामू नाईक यांच्या कृतीविषयी संताप व्यक्त केला.

दामूंच्या इशाऱ्यामुळे कार्यकर्ते संतप्त

सांगे मतदारसंघ एसटीसाठी आरक्षित होऊ घातल्याच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील शेकडो कार्यकर्त्यांनी काल रविवारी सकाळपासून सांगे मतदारसंघाचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांच्या केपे येथील निवासस्थानी गर्दी करत तेथे ठाण मांडले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी फळदेसाई यांनी आपला मतदारसंघ सोडून कुडचडे मतदारसंघातून पुढील निवडणूक लढवण्याचा विचार करू नये, अशी मागणी केली. तसेच कुडचडे मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी करून सुभाष फळदेसाई यांनी पक्षशिस्तीचा भंग केला असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया पत्रकारांना दिल्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याविरोधात कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. दामू नाईक यांनी सांगे मतदारसंघातील मतदारांची माफी मागावी, अशी मागणी केली. सांगेच्या मतदारांनी अशी कडक भूमिका घेतल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.