माझे माहेर पंढरी…

0
32
  • – मीना समुद्र

विठ्ठलाची मूर्ती पाहायला लोचन अधीर झाले आहेत… ऊन-वारा, वादळ-पाऊस, खाच-खड्डे सोसत हे रूप पाहायला हा जनसागर लोटला आहे. दर्शनमात्रे मनकामना पूर्ण होणार आहे. भक्तिभावाच्या लाटा उचंबळत आहेत. माहेर आता अगदी उंबरठ्याशी आहे…

आषाढ बरसतो आहे मुसळधार, धुवांधार. आभाळातून सरसर, झरझर निघणार्‍या पाऊसधारा पंढरीला निघालेल्या वारकर्‍यांइतक्याच ओढीने धरणीकडे येत आहेत. कसली बरे ही ओढ? ही ओढ माहेराची! मायबाप नांदतात त्या घराची! प्रेमळ, कौतुकभरल्या, स्नेहल डोळ्यांनी आसुसून जिथे आपल्या काळजाच्या तुकड्याची वाट पाहिली जाते त्या घराची ही ओढ! आषाढधारा या धरणीच्या लेकी तशाच दुरातून आपल्या माहेरी येत आहेत. भेटीने जीव सुखावतो आहे. माय मातीचा पदर ओलाचिंब होतो आहे. स्नेहरंगी मन रंगून गेले आहे. मोठाच दिलासा लाभला आहे सकल जीवांना. आणि हे वारकरी? यांनाही ओढ लागली आहे चंद्रभागेतटी विटेवर उभ्या असलेल्या, २८ युगे भक्तांसाठी तिष्ठणार्‍या विठूरायाची. त्या करुणाघन कृपाळू विठ्ठलाची. त्या सावळ्या परब्रह्माची! त्याच्या समचरणांची! त्यावर डोई ठेवून आपला सारा भरिभार त्यावर सोपविण्याची! कारण तोच आहे त्यांचा खरा आधार. रंजल्या-गांजल्या लेकरांचा कैवारी. दीनदुःखितांना दिलासा देणारा दयावंत. ध्वजा-पताका मिरवत येणार्‍या अठरापगड जातीच्या भक्त-भागवतांची प्रतीक्षा करणारा, ‘गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्वकाळ’ म्हणून आळवणार्‍या वैष्णवांची वाट पाहणारा, साध्यासुध्या भोळ्याभाबड्या श्रद्धाळू भक्तांची गार्‍हाणी ऐकणारा, त्यांचे आसू पुसणारा, ‘संसारतापे तापलो मी देवा, करीता या सेवा कुटुंबाची’ म्हणणार्‍या थकल्याभागल्या लेकरांचे श्रम हरणारा, दर्शनमात्रेच मनकामना पूर्ण करणारा असा हा विठ्ठल बरवा, माधव बरवा! बहुता सुकृताची जोडी म्हणून या विठ्ठलाची आवडी, त्याला भेटण्याची आस, त्याला पाहण्याची ओढ या वारकर्‍यांना लागली आहे. विठ्ठल-रखुमाई त्यांचे मायतात आहेत आणि ‘जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा आपुलीया’ ही त्यांची मनस्वी इच्छा आहे.

मधल्या दोन वर्षांच्या संकटकाळात वारीत खंड पडला. वारकर्‍यांचा जीव तर चुटपुटलाच, पण पंढरीच्या विठूलाही या भक्तांच्या गर्दीची, संतांच्या मांदियाळीची, सज्जनांच्या भेटीची ओढ तशीच दाबून ठेवावी लागली. कधीही वारी न चुकवलेल्या वारकर्‍यांच्या मनातला प्रश्‍न संकर्षण कर्‍हाडे यांच्या कवितेने विचारला, ‘म्हणजे यंदा आम्ही रखुमाई अन् पांडुरंगाला पाहायचं नाही? अरे! लेकरांनीच कसं आपल्या आईबापाकडे यायचं नाही?’ लेकरांचं ठीक आहे, त्यांनी नुसतं ‘श्रीहरी’ म्हटलं तरी विठ्ठलाचा चेहरा समोर येतो. पण पंढरीत गजबज नसेल तर विठ्ठलाचा जीव तरी कसा रमेल? वारी नाही हे वाईटच झालं, पण पी.पी.ई. कीट घालून, बंदोबस्तासाठी खाकी ड्रेस घालून, अन् सीमेवरती लढून तो विठूराय पुन्हा विटेवर उभा आहे. ‘देवा तू इतकी कामे करून थकत नाहीस का? तुलाही थोडा आराम हवाच. फक्त एवढंच कर, तुझ्या भक्तीशिवाय दुसरा संसर्गच ठेवू नकोस. संसर्ग भक्तीचा आणि स्वच्छता चंद्रभागेच्या स्नानाची, अन् सगळ्यांवर एकच लस ग्यानबा-तुकारामाच्या नामाची’ असे हृदयाला हात घालणारे शब्द संकर्षण यांच्या कवितेत आहेत. आणि शेवटी ‘पुढच्या वर्षी येतो बघ, तोपर्यंत तुझ्या भक्तांकडे लक्ष ठेव’ असे साकडे घातले आहे. दरवेळी वाचणार्‍याच्या, पाहणार्‍याच्या अन् ऐकणार्‍याच्या डोळ्यांत टच्‌कन् पाणी आणणारी ही कविता. पण भेटीसाठी पुढच्या वर्षी येण्याचा वायदा विठ्ठलकृपेने पूर्ण झाला आहे आणि संकट टळून वारी सुरू झाली आहे. पूर्वीच्याच जोशात अन् जल्लोषात, किंबहुना जास्तच आनंद आणि उत्साहाने ग्यानबा तुकारामाचा जयघोष निनादत आहे.

छोट्या-मोठ्या गावांतून, शहरांतून, नगरांतून वारकर्‍यांच्या दिंड्या निघाल्या आहेत. आळंदीहून ज्ञानेश्‍वर, देहूतून तुकाराम, पैठणहून एकनाथ, सासवडहून सोपानदेव, त्र्यंबकेश्‍वराहून निवृत्तीनाथ आणि उत्तर हिंदुस्थानातून कबीर यांच्या पालख्या घेऊन वैष्णव मोठ्या शिस्तबद्ध रीतीने पंढरीच्या वारीला निघाले आहेत. पांढराशुभ्र सदरा, धोतर, टोपी, फेटे घातलेले, गळ्यात तुळशीमाळा आणि कपाळी गंधबुक्का लावलेले हे वारकरी, हे भक्त भागवत विठूनामाचा गजर करीत, टाळ- चिपळ्या- मृदंग- एकतारी वाजवीत, विठ्ठलाची गाणी गात, अभंग, ओव्या म्हणत मोठ्या आनंदाने पंढरीची वाट चालत आहेत. लुगडी नेसलेल्या आयाबायांच्या डोक्यावर तुळशीवृंदावने आहेत. काही चिल्लीपिल्ली वाटावीत अशी मुलंही नामाच्या तालावर टाळ वाजवीत वारीत सामील आहेत. तरुणाईही या आकर्षणाचा भाग झाली आहे. वारी मुक्कामात, वारकर्‍यांना हरप्रकारचे साहाय्य करण्यासाठी हजारो हात काम करीत आहेत. त्यांचा मार्ग, त्यांची वाटचाल सुखकर करताना मनोमन त्यात सामील होत आहेत. पालखीचा मुक्काम असेल तिथेही सर्व मार्ग रांगोळ्या-पताकांनी सजले-धजले आहेत. अबीर-गुलाल आपले रंग उधळीत वातावरणाला आगळाच नूर देत आहेत. जातपातधर्माच्या, पंथाच्या पल्याड गेलेली ही वारी समतेची, सहकाराची, सेवेची आणि आनंदाची पर्वणी आहेच. हा नामजप, कथाकीर्तने, भजन गायने आणि या गुढ्यापताका, झेंडे डौलाने फडकत आपल्या आध्यात्मिक, इहलौकिक आणि पारलौकिक अशा सामुदायिक सुखाची जाणीव करून देत आहेत. वारीत मने कशी निर्भर झाली आहेत. आपल्या माहेरी जाण्यासाठी आतुरली आहेत. विठाई माऊलीच्या दर्शनाचे वेध लागले आहेत. ‘सदा माझे डोळां जडो तुझी मूर्ती| रखुमाईच्या पती सोयरिया॥ हाच भाव सर्वांच्या मनी वसला आहे. मधे घोड्यांचे रिंगण आहे. गतसाली वारीबरोबर चालणारे हरीण होते; यावर्षी मेंढ्यांचे रिंगण रंगलेले पाहिले. सार्‍याच प्राणिमात्रात त्याचा अंश आहे, निवास आहे. त्यामुळे हरएक आत्म्याला त्याची जाणीव आहे हेच दिसून येतं वारीत घडणार्‍या अशा घटनांमधून. आपल्या डोळ्यांवरची, मनावरची झापडं दूर सारून तो एकात्मिक भावाचा अनुभव देणारी वारी, हा आधुनिक जगातला एक मोठा चमत्कारही आहे आणि साक्षात्कारही!

आता या वारीच्या सांगतेचा क्षण उद्यावर आला आहे. वारकर्‍यांचं, भक्तगणांचं, साधुसाधकांचं माहेर आता अगदी जवळ येऊन ठेपलं आहे. आषाढी एकादशी हा तो वारीच्या सांगतेचा आणि साफल्याचा दिवस- उद्याच आहे. त्यामुळे सार्‍यांची मनं अधीर आहेत. ‘सासरच्या वाटे अंथरले काटे, माहेरच्या वाटे मखमल दाटे’ असं म्हणतात. इथे खरीच हिरवळ दाटली आहे. कृपाघन होऊन आषाढ बरसला आहे. चंद्रभागेतीरी वैष्णवांची दाटी होऊ लागली आहे. नामाच्या गजराने भीमातीर गर्जू लागले आहे. कस्तुरीटिळा लावलेली, कानी मकरकुंडले, कंठी कौस्तुभमणी आणि गळ्यात तुळशीहार घातलेली पीतांबरधारी विठ्ठलाची मूर्ती पाहायला लोचन अधीर झाले आहेत. ऊन-वारा, वादळ-पाऊस, खाच-खड्डे सोसत हे रूप पाहायला हा जनसागर लोटला आहे. दर्शनमात्रे मनकामना पूर्ण होणार आहे. देवळाचा उंच कळसही पाहून हात जोडले जात आहेत. भक्तिभावाच्या लाटा उचंबळत आहेत. माहेर आता उंबरठ्याशी आहे. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई, एकनाथ, नामदेव, तुकाराम, गोरा कुंभार, सावतामाळी, कान्होपात्रा, जनाई, सखुबाई, सार्‍या साधुसंतांचे आणि कर्मरतांचे हे माहेर. त्यांना जिथे शांती-समाधान लाभले ते हे पंढरपूर. सार्‍यासार्‍यांना आता या माहेरी विसावा मिळणार आहे. मनातून जयघोष उमटतो आहे- पुंडलिक वरदा हरी विठ्ठल!