उच्चस्तरीय बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
राज्य सरकारच्या माझे घर योजनेचे अर्ज येत्या सोमवार दि. 13 ऑक्टोबर पासून नागरिकांना उपलब्ध केले जाणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना काल दिली.
माझे घर योजनेचा शुभारंभ होऊन पाच उलटले तरी अद्याप त्याचे अर्ज नागरिकांना मिळाले नसून, आता पुढील आठवड्यातच हे अर्ज नागरिकांना मिळू शकणार आहेत. ज्या दिवशी या योजनेचा शुभारंभ झाला त्याच दिवसापासून मिळणार असल्याचे सांगितले गेले होते; मात्र अद्याप हे अर्ज नागरिकांना मिळालेले नाहीत. आता सोमवारपासून हे अर्ज नागरिकांना उपलब्ध होणार आहेत.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पर्वरी येथे मंत्रालयात माझे घर योजनेचा एका उच्चस्तरीय बैठकीत काल आढावा घेतला. राज्य सरकारच्या माझे घर या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते गेल्या 4 ऑक्टोबरला दिमाखात करण्यात आला होता. राज्यातील सरकारी, कोमुनिदाद, खासगी जमिनीतील फेब्रुवारी 2014 पूर्वीची बेकायदा घरे कायदेशीर करण्याचे उद्दिष्ट आहे.
माझे घर योजनेची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्यासाठी कालच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना विविध सूचना केल्या. गेली कित्येक वर्षे अनेक नागरिक आपल्या घराचा मालकी हक्क मिळविण्याच्या प्रतीक्षेत आहेत. या योजनेअंतर्गत अर्ज निकाल काढण्याच्या कामात पारदर्शकता ठेवून जलदगतीने काम करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली.
यावेळी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात, महसूल सचिव संदीप जॅकीस व अन्य अधिकारी यांची उपस्थिती होती.

