माझे घर, जीएसटीबाबत सोमवारपासून जनजागृती

0
4

मुख्यमंत्री डॉ. सावंत यांची माहिती

भाजपकडून माझे घर योजना आणि जीएसटी सुधारणांबाबत राज्यपातळीवर जनजागृती मोहीम येत्या सोमवार 13 ऑक्टोबरपासून मये आणि डिचोली मतदारसंघातून राबविण्यास सुरुवात करणार आहे, अशी माहिती काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

भाजप गोवा प्रदेशतर्फे माझे घर योजना आणि जीएसटी सुधारणांबाबत जनजागृती मोहिमेबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी एक कार्यशाळा काल मिनेझिस ब्रागांझा सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी भाजप कार्यकर्त्यांना माझे घर योजना आणि जीएसटी सुधारणांबाबत सविस्तर विवेचन केले. या दोन्ही योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोचविण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे व इतरांची उपस्थिती होती. माझे घर योजना पूर्णपणे समजून घेतल्यानंतरच विरोधकांनी आरोप करावे, असे आवाहन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले. विरोधकांकडून उपस्थित करण्यात येत असलेले मुद्दे अयोग्य आहेत. या योजनेमुळे कोणी बाहेरील गोव्यात येणार नाहीत, असेही नाईक यांनी सांगितले.

आप आणि कॉँग्रेस यांच्यातील आरोप प्रत्यारोपांचा भाजपवर कोणताही परिणाम होणार नाही. भाजप आणि मित्र पक्ष एकसंध आहेत, असेही प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी सांगितले.