‘माझी बस’ 16 मेपासून बंद

0
14

गोवा कदंब वाहतूक महामंडळाने माझी बस योजना येत्या 16 मेपासून बंद करण्याचा निर्णय घेतला असून, माझी बस योजना नव्या स्वरूपात आणण्यात येणार आहे.

कदंब वाहतूक मंडळाने ऑगस्ट 2023 मध्ये माझी बस योजना प्रायोगिक तत्त्वावर राबविण्याला सुरुवात केली होती. या योजनेखाली प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बसगाड्या भाडेपट्टीवर घेऊन चालविण्यात घेण्यात येत होत्या. या योजनेमध्ये 57 खासगी बसमालकांनी सहभाग घेतला. कदंब महामंडळ तोट्यात आहे. या योजनेमुळे तोट्यात आणखी वाढ झाल्याने कदंबच्या संचालक मंडळाने ही बस योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेमध्ये सुधारणा करून ही योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कदंब महामंडळाचा तोट्याचे प्रमाण कमी करण्यासाठी खासगी बसमालकांना देण्यात येणाऱ्या आर्थिक लाभामध्ये कपात केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जुन्याच नियमानुसार माझी बस योजना चालविण्याची मागणी खासगी बसमालकांकडून केली जात आहे. काणकोण, कुडचडे भागातील जास्त खासगी बसचालक या योजनेमध्ये सहभागी झालेले आहेत.

कदंब महामंडळाने माझी बस योजनेसाठी नवीन मसुदा तयार केला आहे. हा मसुदा जाहीर करण्यापूर्वी खासगी बसमालकांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी खासगी बस व्यावसायिक संघटनेचे सरचिटणीस सुदीप ताम्हणकर यांनी केली. राज्य सरकारकडून खासगी बसमालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या इंधन अनुदान योजनेखालील कोट्यवधींची थकबाकी प्रलंबित आहे. प्रलंबित इंधन अनुदान वितरित करावे, अशी मागणी ताम्हणकर यांनी केली.