‘माझी बस’ योजना राज्यभरात राबवली जाणार

0
6

>> वाहतूकमंत्र्यांची माहिती; तीन प्रवासी मार्गांवर अल्प प्रतिसादानंतरही निर्णय

राज्य सरकारच्या खासगी प्रवासी बसगाड्या ताब्यात घेऊन चालविण्याच्या ‘माझी बस’ योजनेला खासगी प्रवासी बसमालकांकडून चांगला प्रतिसाद लाभलेला नाही. तीन प्रवासी मार्गांवर ही योजना राबविण्याचा निर्णय यापूर्वीच घेण्यात आलेला आहे. आता ही योजना राज्यभरात राबविण्यात येणार आहे. कदंब महामंडळाकडे 250 बसगाड्यांची कमतरता आहे. येत्या डिसेंबरपर्यंत नवीन 99 इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार आहेत, तर स्मार्ट सिटी योजनेखाली आणखी 39 इलेक्ट्रिक बसगाड्या मिळणार आहेत, अशी माहिती वाहतूक तथा उद्योगमंत्री माविन गुदिन्हो यांनी विधानसभेत वाहतूक, उद्योग, पंचायत खात्याच्या अनुदानित पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना काल दिली.

राज्यातील प्रमुख बसस्थानकांच्या नूतनीकरणाचे काम केंद्र सरकारच्या सहकार्यातून केले जाणार आहे. बसस्थानकाचे बसपोर्टमध्ये रूपांतर केले जाणार आहे. ही योजना तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. पणजी, मडगाव, वास्को, म्हापसा या बसस्थानकांची कामे प्राधान्यक्रमाने घेतली जाणार आहेत. ‘गोंयचो पात्रांव’ योजनेखाली सुमारे 100 युवकांना टॅक्सी देण्यात येणार आहेत. ॲप आधारित गोवा माईल्स या कंपनीकडून टॅक्सीचालकांना दुबई, सिंगापूर येथे अभ्यासदौऱ्यासाठी पाठविण्यात येणार आहे, असेही गुदिन्हो यांनी सांगितले.

आणखी 29 ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
राज्यात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियमभंग प्रकरणी वाहनचालकांना दंड ठोठावला जात आहे. राज्यात आणखी 29 नवीन ठिकाणी वाहतूक नियमभंग नोंदणी करणारे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, असे मंत्री माविन गुदिन्हो यांनी सांगितले.

4654 रुपयांचे शुल्क भरावेच लागणार
टुरिस्ट टॅक्सीचालकांना डिजिटल मीटर नियमांचे पालन करावे लागणार आहे. राज्य सरकारला डिजिटल मीटर नियमावलीमध्ये सूट देण्याचा अधिकार नाही. टॅक्सीमालकांनी न्यायालयात धाव घ्यावी. टुरिस्ट टॅक्सीसाठीचे 4654 रुपयांचे शुल्क माफ केले जाऊ शकत नाही. टॅक्सीमालकांना हे शुल्क भरावे लागणार आहे. डिजिटल मीटरचा वापर न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे, असा इशारा मंत्री माविन गुदिन्हो यांनी दिला.