पंतप्रधानपदी येण्यापूर्वी ते काही काळ देशाचे परराष्ट्रमंत्रीही होते. काल संध्याकाळी ३.३१ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. ४ डिसेंबर १९१९ रोजी सध्याच्या पाकिस्तानातील झेलम येथे जन्मलेले गुजराल वयाच्या अकराव्या वर्षी स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले होते. १९४२ च्या चले जाव चळवळीत भाग घेतल्याबद्दल त्यांना तुरुंगवासही झाला होता. आधी कॉंग्रेस व नंतर जनता दलामध्ये त्यांची राजकीय कारकीर्द बहरली.
इंदिरा गांधींच्या पंतप्रधानपदाच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभार सांभाळला. नंतर आणीबाणी आली तेव्हा माहिती व प्रसारणमंत्री असलेल्या गुजराल यांना तत्कालीन महासत्ता मानल्या जाणार्या रशियात भारताचे राजदूत म्हणून पाठवण्यात आले. ऐंशीच्या दशकात गुजराल यांनी कॉंग्रेसचा त्याग करून जनता दलात प्रवेश केला. प्रादेशिक पक्षांनी आघाडी सरकार स्थापन केले तेव्हा जनता दलाच्या नेतृत्वाखालील संयुक्त आघाडी सरकारमध्ये गुजराल १९९७ साली सामील झाले. देवेगौडा यांच्या नेतृत्वाखालील सरकारला असलेला पाठिंबा कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष सीताराम केसरी यांनी काढून घेतल्यानंतर जो नेतृत्वबदल झाला त्यात गुजराल यांना पंतप्रधानपद मिळाले. मात्र, त्यांचे ते सरकार फार काळ टिकले नाही. इंद्रकुमार गुजराल यांचे पुत्र नरेश गुजराल हे राज्यसभेचे खासदार आहेत व आता अकाली दलाचे नेते बनले आहेत.

