माजी आमदार जितेंद्र देशप्रभूंचे निधन –

0
161

>> न्युमोनियामुळे गोमेकॉत सुरू होते उपचार

 

पेडणे मतदारसंघाचे माजी आमदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते जितेंद्र रघुराज देशप्रभू (६४) यांचे काल न्यूमोनियामुळे निधन झाले. प्रकृती बिघडल्याने काल संध्याकाळी त्यांना गोवा वैद्यकीय महाविद्यालयात भरती करण्यात आले होते. तेथेच त्यांचे निधन झाले. त्यांची कोरोनासाठीही तपासणी करण्यात आली होती. पण त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता हे अहवालातून सिद्ध झाल्याचे गोमेकॉचे डीन शिवानंद बांदेकर यांनी सांगितले. १९९९ ते २००२ व २००२ ते २००६ असे दोनदा ते पेडणे मतदारसंघातून गोवा विधानसभेवर निवडले गेले होते.

देशप्रभू यांची एक हुशार व व्यासंगी नेते अशी ओळख होती. राजकारणाबरोबरच विविध विषयांवरील त्यांचा अभ्यास दांडगा होता. इंग्रजी, हिंदी, कोकणी, मराठी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व होते. त्यांना गायनाचीही आवड होती.

देशप्रभू यांच्या निधनावर विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर तसेच विविध कॉंग्रेस व अन्य पक्षांच्या नेत्यांनी दुःख व्यक्त केले आहे.

पेडणे तालुक्यात हळहळ

 

पेडण्याचे माजी आमदार जितेंद्र देशप्रभू यांच्या निधनाने पेडणे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. सर्वसामान्य नागरिकांशी मात्र सर्वसामान्यांप्रमाणे वागणारे देशप्रभू दोनवेळा पेडणे मतदारसंघातून कॉंग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले होते.

काल दि. २१ रोजी न्युमोनियामुळे देशप्रभू यांचे बांबोळी येथे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सर्वपक्षीय स्थानिक नेत्यांना धक्का बसला. जितेंद्र देशप्रभू यांना काल दि. २१ रोजी सकाळी ११ वा. धारगळ येथील रेडकर इस्पितळात उपचारासाठी नेले होते. तिथे त्यांची  तब्येत अधिक बिघडल्याने त्यांना तातडीने गोमेकॉत दाखल केले होते. मात्र उपचार चालू असतानाच त्यांचे निधन झाले.

जितेंद्र देशप्रभू हे पेडणेतून आमदार म्हणून निवडून येण्यापूर्वी कॉंग्रेसने त्यांची १९९३ साली पेडणे पालिकेवर नगराध्यक्ष म्हणून निवड केली होती.

राजेशाहीत जन्माला आलेले जितेंद्र देशप्रभू हे जनतेकडे, आपल्या मतदारांकडे मात्र कधी राजा म्हणून वागले नाहीत हे त्यांचे वैशिष्ट्य होय.

मागच्या दहा वर्षापूर्वी त्यांच्या मुलाचा पर्वरी येथे अपघातात मृत्यू झाला होता, त्यावेळी त्यांना मोठा धक्का बसला होता. त्यांच्यामागे पत्नी मुलगी नऊ वर्षाचा मुलगा, भाऊ, पुतणे, भावजय, बहिणी असा मोठा परिवार आहे.

विद्या संकुलाचे स्वप्न अपूर्ण

व्हायकाऊंट विद्यालयाची इमारत विद्यार्थ्यांसाठी सोयी सुविधांच्या दृष्टीने अपुरी पडत होती. त्यामुळे जवळच जो भद्रगड किल्ला आहे त्याठिकाणी सुसज्ज विद्या संकुल उभारण्याचा संकल्प केला होता मात्र त्यांचे ते स्वप्न अपुरे राहिले आहे. तसेच त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर पालिकेने जुनी टपाल इमारत मोडून त्या ठिकाणी त्यांच्या मुलाच्या नावे कृणाल देशप्रभू हॉस्पिटल म्हणून उभारण्याचा ठराव सर्वानुमते मांडला होता. मात्र त्याचीही वेळेवर कार्यवाही न झाल्याने तेही  स्वप्नच अधुरे राहिले आहे.

गर्दी करू नये ः देवेंद्र देशप्रभू

दरम्यान, नागरिकांनी कुणीही कृपया गर्दी करू नये. राज्यात १४४ कलम लागू केल्यामुळे चार व्यक्तींपेक्षा जास्त नागरिकांनी एकत्रित येऊ नये असा आदेश आहे. त्यामुळे सांत्वनासाठी येताना १४४ कलमाचा भंग होणार नाही याची काळजी घ्यावी असे आवाहन जितेंद्र देशप्रभू यांचे बंधू देवेंद्र यांनी केले  आहे.