माओवादी नेता भूपतीसह 60 जणांचे आत्मसमर्पण

0
15

गडचिरोली पोलीस आणि महाराष्ट्राच्या गृहविभागाच्या माओवाद विरोधातील लढाईला आजवरचे सर्वांत मोठे यश मिळाले आहे. माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव ऊर्फ सोनू ऊर्फ भूपती याने त्याच्या 60 सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. काल 14 ऑक्टोबर रोजी रात्री दक्षिण गडचिरोली जिल्ह्यातील घनदाट जंगलात छत्तीसगड सीमेलगत महाराष्ट्राच्या बाजूने हे सामूहिक आत्मसमर्पण झाले आहे.

गेले काही दिवस सातत्याने सोनू उर्फ भूपती वेगवेगळ्या पत्रकांच्या माध्यमातून सशस्त्रमाओवादाचा मार्ग सोडला पाहिजे, आणि सरकारसोबत शांती वार्ता करून मुख्य प्रवाहात माओवाद्यांनी यावे अशी भूमिका मांडत होता. मात्र सेंट्रल कमिटीच्या उर्वरित सदस्यांनी त्याच्या या भूमिकेला तीव्र विरोध दर्शवला होता आणि तसे पत्रक काढत ही सोनू ऊर्फ भूपतीची वैयक्तिक भूमिका असल्याचे जाहीर केले होते. मात्र, सोनू उर्फ भूपतीच्या सशस्त्र माओवाद सोडून शांतता वार्ता केली पाहिजे, या प्रस्तावाचा परिणाम माओवाद्यांच्या निम्नस्तरावर होऊ लागला होता.

अशातच, काही दिवसांपूर्वी गडचिरोली डिव्हिजनने एकत्रितरीत्या पत्रक काढत सोनू उर्फ भूपतीच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. त्यानंतर उत्तर बस्तर आणि माड डिव्हिजनमधील काही नक्षल कमांडर स्नेही तशाच पद्धतीचे पत्रक काढले होते. त्यामुळे सोनू उर्फ भूपती लवकरच शरणागती पत्करेल, अशी शक्यता निर्माण झाली होती.मात्र तो प्रामुख्याने छत्तीसगड किंवा तेलंगणामध्ये शरणागती पत्करेल, अशी स्थिती असताना महाराष्ट्र पोलिसांना भूपलीला शस्त्र खाली ठेवून शरणागती पत्करण्यासंदर्भात मन वळवण्यात यश मिळवले.

महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद हद्दपार
काल रात्री ही 60 माओवाद्यांनी शरणागती पत्करल्यामुळे या सामूहिक शरणागतीचा मोठा परिणाम महाराष्ट्रातील सशस्त्र माओवादावर होणार आहे. लवकरच महाराष्ट्रातून सशस्त्र माओवाद पूर्णपणे हद्दपार होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.