मांद्रेतून दयांनद सोपटेंनाच उमेदवारी मिळण्याची चिन्हे

0
12

>> देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अप्रत्यक्षरित्या संकेत

गोवा विधानसभा निवडणुकीची उमेदवारी अजून खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना जाहीर झालेली नाही. उमेदवारी जाहीर कण्यासाठी पक्षाची एक उच्चस्तरीय संसदीय समिती असते, तीच उमेदवारी जाहीर करेल. मुख्यमंत्र्यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नसली, तरी त्यांचे तिकिट कुणी कापू शकते का, असा सवाल करत आमदार दयानंद सोपटे यांनी या निवडणुकीत सर्वात जास्त मते मिळवण्याचा विक्रम साधण्यासाठी प्रयत्न करावा.

जनतेने एवढा चांगला आमदार निवडून दिलेला असताना पक्ष वेगळा विचार करणार नाही, असे सांगत भाजपचे गोवा निवडणूक निरीक्षक देवेंद्र फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या दयानंद सोपटेंनाच मांद्रेतून उमेदवारी मिळेल, असे संकेत दिले. त्यामुळे या मतदारसंघातून लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे तिकिट कापले जाण्याची शक्यता आहे.

मांद्रेतील दीनदयाळ सभागृहात आयोजित केलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. मांद्रे मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळवण्यासाठी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर आणि आमदार दयानंद सोपटे यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर या मेळाव्यातून सोपटे यांनी शक्तिप्रदर्शन घडवण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण सभागृह कार्यकर्त्यांनी खचाखच भरले होते. तसेच चारशे-पाचशे लोक सभागृहाबाहेर उपस्थित होते, ही बाब मान्य करून उद्या निवडणूक झाली तरी भाजपचा उमेदवार निवडून येईल, असे फडणवीस यांनी सांगितले.

यावेळी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आप, तृणमूल स्थलांतरित पक्ष
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आप व तृणमूलवर टीका केली. सध्या गोव्यात बाहेरून अनेक राजकीय पक्ष दाखल होत आहेत. आप, तृणमूल या पक्षांना सायबेरियन पक्ष्यांची उपमा देत फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली. सायबेरियन पक्ष्यांसारखे हे दोन्ही स्थलांतरित पक्ष असून, ते निवडणुकीच्या कालावधीपुरतीच दाखल होतात आणि नंतर परत आपल्या राज्यात जातात, असे फडणवीस यांनी सांगितले.

गोवा विधानसभा निवडणुकीची
आचारसंहिता जानेवारीत लागू होणार

गोवा विधानसभेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होण्याची शक्यता असून, निवडणूक आचारसंहिता जानेवारी २०२२ मध्ये लागू होण्याची शक्यता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल व्यक्त केली. मांद्रे येथील भाजप कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

नाराज आमदारांशी फडणवीस करणार चर्चा
भाजपचे गोवा विधानसभा निवडणूक प्रमुख देवेंद्र फडणवीस यांचे काल दोन दिवसांच्या गोवा दौर्‍यावर आगमन झाले असून, फडणवीस यांच्या या दौर्‍यात भाजप – मगो यांच्यातील युतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा हे गोवा दौर्‍यावर येणार आहेत. नड्डा यांच्या दौर्‍यातील कार्यक्रमाचा आढावा देखील फडणवीस घेणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीतील उमेदवारीवरून भाजपचे काही नेते आणि आमदार नाराज बनलेले आहेत. त्यांच्याशी देखील फडणवीस चर्चा करणार आहेत.