मांडावर फुलला ‘धालो’

0
1380

– डॉ. रामकृष्ण जनार्दन हळर्णकर

‘गोवा हा कलेचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध आहे’ असे गोमंतकात आलेला एक प्रसिद्ध प्रवासी फिलिपो सासेती याने आपल्या १५९५ च्या पत्रात लिहिले आहे. तो इटालियन होता. त्याचे हे म्हणणे खरे आहे. गोवा लोककला व लोकसाहित्याने समृद्ध आहे.

भावनांच्या कल्लोळातून साहित्य जन्माला येते. व्यक्तीनिर्मित साहित्यकृतीला हे परिमाण लावले जाते. लोकसाहित्याचे आणि लोककलेचेही असेच आहे. फरक एवढाच की लोकसाहित्य ही समूहमनाची भावाभिव्यक्ती आहे. समूहाच्या आंतरिक कल्लोळाचा झालेला सहज सुुंदर उद्रेक, शब्दमाध्यमातून अभिव्यक्त होणारी जीवनपद्धती, अनुभव, विश्‍वास, भ्रम, श्रद्धा, जीवनमूल्ये, प्रथा-परंपरा या सार्‍यांचा उच्छ्‌वास शब्दांतून प्रगट होतो. लोकसाहित्य हा लोककलेचा एक भाग आहे. अनिकेत वेळी हे घडते, उद्गाता नसतो ते लोकसाहित्य. लोकसाहित्य हा लोककलेचा एक अभ्यास आहे. म्हणून अभ्यासवृत्ती ठेवूनच लोकसाहित्याकडे पाहावे लागते, तरच त्याची खोली, प्रगल्भता आपल्याला समजू शकते. धालो हा लोककलेचा आणि लोकसाहित्याचा एक प्रकार आहे.

गोव्यातील धालो उत्सव

गोवा निसर्गसौंदर्याने सजलेला आहे. त्याला देवादिकांचे वरदान लाभलेले आहे. येथील छोटी-छोटी गावे एकाच माळेत गुंफलेली. या गावांत अनादीकालापासून सण-उत्सव साजरे केले जातात. येथे वर्षाचे बाराही महिने सण साजरे केले जातात. शिमगा, बारा गावच्या बारा जात्रा, पंचमी, दसरा, धालो अशा सणा-परबांनी येथील गावे लोककलामय झालेली आहेत.

‘धालो’ हा गोव्याचा पारंपरिक उत्सव आहे. तो निसर्गरम्य गावांचे सौंदर्य खुलवतो. हा केवळ महिलांचा उत्सव आहे. पण उच्चवर्णीय महिला यात भाग घेत नाहीत. पौष महिना… गुलाबी थंडीने वातावरण आल्हाददायक बनले आहे. पौष महिन्यात पौर्णिमेच्या सुमारास या धालो उत्सवाला प्रारंभ होतो. निसर्गाचा लोकजीवनाशी अत्यंत घनिष्ठ संबंध आहे. गाववासीयांचे निसर्गाशी अतूट नाते आहे व त्याचा संबंध त्यांच्या दैनंदिन परिचर्येत आहे. त्यांनी आपली संस्कृती, संस्कार धालोच्या माध्यमातून जोपासले आहेत. थंडीचा गारवा धालो उत्सवाला एक वेगळीच स्फूर्ती देतो.

धालो हा लोककलेचा एक प्रकार आहे. लोककला ही परंपरेतून चालत आलेली असते. लोककलेचा कोणी निर्माणकरता नसतो. ती कधीकाळी कोणीतरी सुरू केलेली असते. गोव्यात धालोत्सव पूर्वजांनी सुरू केला असावा. समूहाच्या भावभावनांना जपणारा, परंपरा- श्रद्धा- विश्‍वास यांचे प्राणपणाने जतन करणारा, जुन्याचा त्याग न करणारा, नव्याचा स्वीकार करणाच्या बाबतीत सावधगिरी बाळगणारा हा धालोत्सव आहे. धालो वेगवेगळ्या पद्धतीने खेळल्या जातात. सुरुवातीचे व समाप्तीचे दिवस गावागावांत वेगवेगळे असतात. सुवासिनी, कुमारिका धालोत भाग घेतात. उत्सवाच्या निमित्ताने पाच किंवा सात दिवस स्त्रिया एकत्र जमतात आणि हा उत्सव साजरा करतात. धालो हा उत्सव असला तरी एक विधी म्हणून त्याचा आविष्कार महत्त्वाचा आहे. यात जेवढा उत्सवाचा भाग असतो तेवढाच विधीचाही असतो. या सर्व विधी केवळ परंपरेने माहीत झालेल्या आहेत.

धालो मांड

गोव्यात आज बरेच बदल झाले आहेत, पण धालो खेळण्याची पारंपरिक प्रथा आणि व्यवस्था जुनीच आहे. गावात वीज आली आहे. विजेच्या उजेडात धालो खेळताना मजा कुछ औरच असते. गावात प्रांगण असते. या अंगणात धालो खेळतात. यालाच ‘धालो मांड’ म्हणतात. याच मांडावर बायका एकत्र येतात. गावातील घरांची रचना साधी आहे. इथले दैनंदिन जीवन शांत, सावकाश आहे.

धालोमुळे येथील महिला एकत्र येतात. गावाची सेवा करतात. अडल्यानडल्यांना मदत करतात. देवांचा जप करतात. धालोत्सव पार पाडण्यासाठी गावात दरवर्षी महिलांची समिती निवडली जाते. या समितीत विविध वाड्यांवरील महिलांना सदस्यत्व दिले जाते. धालो हा महिलांचा आत्मविश्‍वास वाढवणाराही उत्सव आहे.

धालांची पहिली रात्र

पहिल्या चांदण्यारात्री गावातल्या सर्व बायका धालाच्या मांडावर येतात. तेथे तुळशीवृंदावन असते. प्रथम मांडाची मानकरी महिला (गावकान) तेथे समई पेटवते. केळीच्या पानावर किंवा ताटात तांदूळ, नारळ ठेवले जातात. खण, नारळ, काजळ, कुंकू, फुले, केळे, खोबरे ठेवून गावच्या गावपुरुषाची प्रार्थना केली जाते. हे गावपुरुष गावाचे रक्षण करतात, अशी लोकांची समजूत आहे. जमलेल्या बायकांना कुंकू लावले जाते. प्रथम देवाला गार्‍हाणे घातले जाते. देवाजवळ मागणे मागीतले जाते. ज्यांना मुलंबाळं नाहीत त्यांना मुलं होऊ दे, बेकारांना नोकरी मिळू दे, लग्ने जुळू दे, गावाचे भले होऊ दे अशी त्या देवाजवळ कामना करतात. गार्‍हाणे घातल्यानंतर नारळ फोडला जातो. त्याची ‘शीरनी’ सर्वांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

नटूनथटून महिला मांडावर जमतात. धालो खेळण्याची तयारी सुरू होते. महिलांच्या दोन आडव्या रांगा होतात. एकमेकीच्या कंबरेत हात गुंफून एक रांग गाणे म्हणत पाच पावले पुढे येते. कंबरेत वाकते व मागे जाते. मग दुसरी रांग गाण्याची दुसरी ओळ म्हणत तशीच पुढे येऊन वाकते व मागे जाते. ही कृती करताना त्या लोकगीतांचे गायन करतात. ही लोकगीते कोणत्या तरी कृतीशी, विधीशी संबद्ध असतात किंवा विधीचा एक भाग म्हणून म्हटली जातात. गाणे सुरू होते-

श्री धालो गे धालो,

तुमी धालानी खेळू ये यांगे धालो धालानी खेळू या,

येयली जाल्यार बरे जाले सखयां साद दिला गे….

आणि मग पुढे दुसरे गाणे म्हणतात-

नारळ फोडुनी शीरनी करुनी

वाटले तुळशी वृंदावनी

गंध फुले घेई ताटी

वाटीन माणातल्या गुरूला

नारळ फोडुनी शीरनी करुनी

वाटीन सगळ्या देवरंभा गे

चारी कुळा घरी धालो जाल्या

येणे झाले आज गे

भूतनाथाच्या घरी धालो जाल्या

येणे झाले आज गे…

असे त्या आपल्या दैवतांना नमन करतात. गाण्यामध्ये त्या-त्या देवतेचे नाव गोवून त्यांना मांडावर खेळायला बोलावले जाते. त्यांची ती दैवते मांडावर खेळू आल्याची भावना होते.

रथा तुज्यो माडयो, साडेतीनशे घुडयो

रथा कोण देव बैसे गे,

रथात बसली धर्तरी माया

मांडार खेळू आली गे|

धालात प्रत्येक देवादिकाचा आदर केला जातो. या गाण्यात पहिले नमन धर्तरी व वनदेवतेला होते. त्यानंतर अनेक देवता मांडावर खेळायला येतात. यांमध्ये तुळशीमाया, गावपुरुष, चंद्रसूर्य, गणेश अशा असंख्य देवतांना आमंत्रण दिले जाते. अशा गीतांचे गायन धालो खेळताना केले जाते.

लोकसाहित्य म्हणजे केवळ लोकगीते नव्हेत, तर ज्यातून लोकजीवन अभिव्यक्त होते अशा अनेक बाबींचा समावेश यात करावा लागतो. धालो गीतांत याचे भान ठेवले आहे, म्हणून तर बायका धुंद होऊन नाचतात.

निमंत्रणे पाठवणे हासुद्धा धालांचा एक भाग असतो, म्हणून समस्त दैवतांना नमन करून ‘सगळ्या गावचे चौगुले, सगळ्या गावचे बंधो’ यांनाही निमंत्रण दिले जाते.

मोनी आयली मोनी गेली, सखया साद घाला गे

माण धरून खेळा गे…

या त्यांच्या गाण्यात मधुरता असते. ताल व लय असते. पार्श्‍वसंगीताची साथ नसूनही गाण्यात गोडवा असतो. एकमेकींची ओळख होते. देवदेवता मांडावर आल्याची खूण म्हणजे त्यांचे वर्णन गाण्यातून होते. देवांची वर्णने बायकांनी गायलेल्या लोकगीतांत असतात. अगदी पुरातन काळापासून कथा व गीतांकडे बघण्याची भारतीयांची दृष्टी ही भाविकाची आहे. इतकी की कथा व गीतांना त्यांनी वेगळेच व्यक्तित्व व देवत्व अर्पण केलेले आढळते. म्हणून तर आपल्या समाजमनावर लोकगीतांचा पगडा दिसून येतो.

लोकगीते

धालो खेळताना बायका गाणी म्हणतात. तो एक लोकगीतांचा प्रकार आहे. या लोकगीतांच्या निर्मितीमागे अनेकविध प्रेरणा असतात. या सर्व प्रेरणांच्या संयोगातून लोकगीते निर्माण होत असली तरी लोकगीत आणि समूहमन यांचा निकटचा संबंध असल्यामुळे त्यात प्रामुख्याने सामूहिक मनाचाच आविष्कार होतो. मानवी जीवनाच्या सर्व पैलूंचे दर्शन त्यात घडत असल्यामुळे त्याला सामूहिक पातळी प्राप्त होते. लोकगीते सर्वांना सुचत असली तरी कुणा एका व्यक्तीचा त्याच्यावर अधिकार नसतो. कारण त्या लोकगीताची मूळ प्रेरणा ही सामाजिकच असते. वि. का. राजवाडे म्हणतात त्याप्रमाणे, ‘लोकगीते ही उत्सव प्रसंगी भक्तिभावाने तल्लिनता प्राप्त झाली असता व सामाजिक मन एकतान झाले असता निर्माण होतात.’ जसजशी रात्र वाढत जाते तसतशी धालांच्या मांडावरची रंगतही वाढते आणि लोकगीतांचे स्वर हवेत दरवळत राहतात. नंतरची प्रत्येक रात्र विविधतेने बहरलेली, गाणी, फुगड्या, नाच यांनी भरलेली असते. निसर्ग व देवदेवता यांच्या अनेक कथा या गायनातून पुढे येतात-

एक मंडल घ्या हो नारी, अर्धे मंडल घ्या हो नारी

अर्धे मंडल नको हो नारी, आमी धालांची सोवरी सुंदरी

असे लोकगीतांतून लोकसंस्कृतीचे दर्शन घडते. तसेच धर्म, भाषा, विधी इत्यादी समाजजीवनाच्या विविध अंगाशी ही लोकगीते संबंधित असतात. थोडक्यात लोकगीतांच्या प्रेरणा व्यक्तिगत, कलात्मक असल्या तरी त्यात सामाजिक प्रेरणांचाच प्रभाव अधिक दिसून येतो.

बायका फेर धरून नाचतात आणि गाणी म्हणतात. त्यातील एक गाणे-

हातात कुचे राम राजे, गुरुडावर बैसले गे स्वामी

रुप्याची घागर सोन्याची दोरी, देवा न्हाणवती गे

सुंदरशे राम बाये आकरीचे, धरतरे जेवण केला साकरीचे

फुलानी मधे फूल, मोगर्‍या वास भारी

अशा प्रकारे सुरंगी, बकुळा, अबोली, चाफा अशा फुलांचे वर्णन गात गावच्या बायका नाचत असतात. जुन्या जमानातल्या बायका या निरक्षर होत्या, म्हणून लोकगीताचा उगम निरक्षरता आहे. त्याचा कर्ता अज्ञात असतो. अनामिक असतो. लोकगीत ही भूतकाळातील कृती असून पुष्कळदा शतकांची परंपर तिच्यामागे असते.

एकदा का अंगात वारे भरले की बायकांना कशाचेही भान राहत नाही. त्या देहभान विसरून धालो खेळू लागतात. झिम्मा घालतात, फुगड्या खेळतात आणि नाचतात. आकाशात शुभ्र चांदणे, मधूनच डोकावणारा चंद्र आणि अंगाला झोंबणारा गारवा. सर्दीची पर्वा न करता बायका धुंद होऊन धालो खेळू लागतात. गाण्याचे मधुर बोल कानी पडतात ते असे-

वाटेवयले मिरयेली तुका कितली मिरया भारू गे

माणाचा गुरू धरतरी माये तू भायर

सरला घोड्या सत्रे कारू गे

त्येका सत्रे झाला भारू गे

चारी कुळा भायर सरल्या घोड्या सत्रे कारू गे

चावडेवयलो, हिपळीवयलो भायर सरला

कोणेवयलो, खुटयेकार

भायर सरला गे घोड्या सत्रे कारू गे

या गाण्यातून चावडेवयलो, हिपळीवयलो, कोणेवयलो (देवचार) अशा स्थानदेवांना दंडवत घातला जातो. देवांचे वर्णन या गाण्यातून केले जाते. दर चार कोसवर पाणी बदलते तर दर आठ मैलांवर भाषा. तशेच लोकगीताचे शब्द आणि धालोत्सवाची नाचगाणी गावागावांत बदलत जातात. पण उद्देश मात्र एकच असतो. लोकगीते बोलीभाषेत असतात. गोव्याची बोलीभाषा कोंकणी व मराठी. त्याच्यातून काव्यवस्तूचा आविष्कार गांभीर्याने होतो.

नंतरची प्रत्येक रात्र वेगवेगळ्या प्रकारची गाणी, फुगड्या, नाच यांनी मंतरलेली असते. निसर्ग व देवदेवता यांच्या अनेक कथा गायनातून पुढे येतात. चांदण्यात स्त्री चटकचांदणी दिसू लागते. त्यांचे नऊवारी लुगडे (आता सहावारी) आणि त्यांचे मांडभर फिरकी घेऊन नाचणे फार सुंदर असते.

मावळगीच्या मळ्यामागे भाचो जमीन खणता गे

मावळणीच्या मळ्यात गे भाचो जाई रोयता

भाचो जुई रोयता…

गोव्यात जास्त करून घरांसमोर किंवा घरांमागे ‘पोरसू’ अर्थात बागा असतात. त्याच बागांचे वर्णन बायका करतात. भाचा सुरंगी, जाई, जुई, अबोली, चाफा अशी फुले बागेत लावतो. यातून मामा-मामीची असलेली आवड दिसून येते. लोकगीते मौखिक परंपरेने चालत आलेली असतात. त्याचे आवाहन सार्वत्रिक व सार्वकालिक असते. लोकगीत केव्हा निर्माण झाले यासंबंधी सांगणे कठीण असते. लोकगीत जुने किंवा नवे नसते; हे मुळात वैयक्तिक वृत्तीचे सामूहिकतेत रूपांतरित झालेले असते.

स्त्रियांची गीते

फुगडी हा धालोउत्सवाचाच एक भाग आहे. धालो उत्सव हा खास फुगडीचा. धालो मांडावर महिला फुगडी घालतात. फुगडीला गाण्याची साथ असते. वाद्यसाथ असत नाही. नाचणार्‍या बायका गाणी म्हणतात-

सांग गे वयनी

सांग गे मला

देखिला व्हय गे म्हज्या भरतारा (नवरा)

हयगे बाये, हयगे बाये

देखियला….

कापडां मोलयता कलावतीला

बायका जोशात येत गाणे गातात. फुगडीतली गाणी फक्त बायकाच म्हणतात. लोकवाङ्‌मय आणि स्त्रीजीवन यांचा असलेला अन्योन्य संबंध सर्वश्रुत आहे. धालो-फुगडीतली गाणी ही लोकगीते आहेत. स्त्रियांनी आपल्या अलिखित वाङ्‌मयाने लोकवाङ्‌मयाचे दालन नुसतेच समृद्ध केले असे नाही तर भाषा-वैभव वाढविले आणि रुक्ष मानवी जीवनात भावसौंदर्य निर्माण केले.

धालोत गायलेली गाणी ही स्त्रीप्रधान गीते आहेत. सौ. मालती दांडेकरांना स्त्रीगीते म्हणजे ‘लोकसाहित्याचे लेणे’ वाटते. ग्रामीण जीवनाचे प्रतिबिंब त्यात पडलेले असल्यामुळे ती एका अर्थाने ग्रामीण लोकगीतेच आहेत. बहुतेक सर्व सण, उत्सव, विधींमध्ये स्त्रियांचा सहभाग असतो. स्त्रियांच्या भावजीवनाची अभिव्यक्ती त्यांच्या लोकगीतात असते. कशी ती पहा-

वाज गो घुमटा, वाजता बरे

वाजता बरे, शंकराले कलवत

नाचता बरें, नाचता बरें

वाज गो घुमटा, वाजना

शंकराले कलवत

नाचनाऽऽ!

सगळ्या बायका गोलाकार नाचतात. लयीवरील पदन्यास, टाळ्या, देहाच्या विशिष्ट हालचालीत त्या धालो खेळतात. त्यांचे ते इंद्रियशक्ती एकवटून नाचणे बघितल्यावर भार आल्यासारखे वाटते. वर्तुळकार नाचत असताना ठेक्यावर उजवा हात वरपर्यंत नेतात. त्यांचे ते नाचणे-गाणे बघ्यांनाही नाचण्यास विवश करते.

बारीक चमेलीचे फुल गो सखे

बारीक चमेलीचे फुल गो

भेटोक येयला मजो भाव गो… सखे,

भेटोक येयला मजो भाव गो

फुगडी घालताना अशी एकमेकांची थट्टामस्करी केली जाते. गाण्यातून शेरेबाजी आणि टोमणे मारले जातात. हे टोमणे सांकेतिक असतात म्हणून ‘संकेतबहुलता’

हा लोकगीतांचा लक्षणीय विशेष होय. लोकगीतांतून येणारे संकेत रूढ संकेतांपेक्षा वेगळे असतात. हे संकेत लोकजीवनाशी एकरूप झालेले असतात. आशयाचे संकेत जसे येतात तसेच वर्णनाचेही येतात. वरील गाण्यात अलंकारिक भाषा वापरली आहे. भावाला चमेलीच्या फुलाची उपमा दिली आहे. बायकाचा संकेत ‘भावाला’ केलेला आहे.

गोव्यातील गणेशचतुर्थी म्हणजे फुगड्यांचा धुमधडाका तर धालो म्हणजे फुगड्यांची दिवाळी आहे. धालो-मांडात फुगड्यांचे खालील प्रकार आहेत-

१) सादी फुगडी, २) भोंवरी फुगडी, ३) बेबकी फुगडी, ४) दोट्टी फुगडी (कचे), ५) जोडी फुगडी (झिम्मा), ६) रगडो फुगडी, ७) हातफेर्‍याची फुगडी, ८) दांड्यावयली फुगडी, ९) उबी फुगडी, १०) धालो फुगडी, ११) बसकी फुगडी, १२) कळशी फुगडी, १३) नागडी फुगडी, १४) रंभा फुगडी.

या फुगड्यांत विषयाला धरून गाणी गायली जातात आणि सुराच्या तालावर बायका नाचतात. याचा गौरव करताना डॉ. नांदापूरकर म्हणतात, ‘स्त्रीगीतांची रचना उक्ती-वैचित्र्यांनी पूर्ण खच्चून भरली आहे. प्रसंगानुरूप ती कोमल आणि कठोर आहे. लाघवी तशीच सडेतोड आहे. शब्दांचा संक्षेप असला तरी तीत अर्थाचा विस्तार आहे आणि भावनांना कलेत बसविण्याची कला आहे. भावना एकच असली तरी वेगवेगळ्या पद्धतींनी मांडण्याचे सामर्थ्य आहे.’ ही स्त्रीगीते जीवनातूनच फुललेली असल्यामुळे व त्यांना वास्तवतेचा आधार असल्यामुळे ही जणू स्वतःच्याच भावनेचा आविष्कार समजून स्त्रिया गातात. धालो लोककलेने, भावना आणि कल्पना यांच्या सुमधुर मिश्रणाने नटलेल्या या गीतांनी स्त्रीमनाचा विकास केला आहे.

थिरकणे विराम घेताना

पाचवी किंवा सातवी ही धालो उत्सवाची शेवटची रात्र असते. त्या शेवटच्या रात्री थिरकणार्‍या बायकांच्या पावलांना विराम मिळतो. त्या रात्री विशेष कार्यक्रम होतो. शेवटची रात्र संपूर्ण जागवायची असते. त्यासाठी धालोत भाग घेणार्‍या प्रत्येकाने अर्धा पड तांदूळ, नारळ, चार आणे घेऊन मांडावर यावे लागते. या साहित्यातून आटवल (खिचडी) तयार केली जाते. हे आटवल फार चविष्ट असते. देवदेवतांना त्याचा भाग द्यावा लागतो, तर राहिलेला भाग जमलेल्या स्त्रियांनी खायचा असतो. शेवटच्या रात्री काही विधी पार पाडले जातात.

मोरूलो ः बायकांमधील चांगला अभिनय येथे दिसून येतो. गावची एक बाई मोराची नक्कल करते आणि मोरासारखी नाचते-

इती इती मोरा

पोराची पिसा काडा

पिसा काडून

भुर्रऽऽ करून उडोन

मोर गेला घरा

या प्रकाराला ‘मोरूलो’ असे म्हणतात. अन्य बायका मोराचे कौतुक करतात. त्याच्याभोवती फेर धरून नाचतात. हा मोर वनदेवतेने पाठवलेला असतो. त्याला बायका चांगला चांगला मोतीयाचा चारा खायला देतात व सन्मानाने परत पाठवतात.

घोणीचा अभिनय : घोण हा एक पक्षी. तिची पिल्ले हरवतात. मग आई पिल्लांना शोधत येते. ‘हांगा आसा म्हजी घोणची पिलां’ म्हणत एक बाई येते. बायकांच्या घोळक्यात कुठेतरी पिल्ले आहेत म्हणून ती शोधते. बायका तिला चकवतात. अखेर पिल्ले मिळतात. आई आनंदाने घरी जाते.

नवरानवरीचा अभिनय : लग्न प्रकारात एक बाई नवरा बनते तर दुसरी नवरी होते. मुंडावळ्या बांधून ही वर-वधूची वरात निघते. सगळीकडे फिरते. अन्य लोक त्यांना आहेर देतात. वरात तुळशीपाशी येते. देवाला नमस्कार होतो. या विधीचा मूळ उद्देश नववधूने घरात चांगले नांदावे, सासू-सासर्‍यांची सेवा करावी हा असतो. हा लग्नसोहळा अगदी यथार्थ असतो.

पिंगळी प्रकार : धालोतील लोकगीतांची विविधता पाहणे आवश्यक आहे. लोकगीत हे समूहमनाचे प्रतिबिंब आहे. ग्रामीण जीवनातील समूहाच्या भावभावना, त्यांच्या श्रद्धा, परंपरा, जीवनमूल्ये यांचा सर्वंकष संगम लोकगीतांत आपल्याला दिसतो. कला, नृत्य व लोकगीत असा धालोचा त्रिवेणी संगम. असाच पिंगळी हा एक कलेचा प्रकार. यात प्रमुख मांडकरी बाई डोक्याला फेटा बांधून पिंगळी बनून येते. तिच्या एका हातात मुसळ तर दुसर्‍या हातात तांब्या असतो. ती वाड्यावर गाणे म्हणत फिरते…

आमी पिंगळे घाटाचे, तांदूळ घाला भाताचे

खुटखुट करता काय, पेटे चावी काडटा काय

आमका पैशे दिता काय?

तिच्या हाती तांब्या असतो. वर आंब्याचा टाळ, नारळ, तर कधी नुसताच तांब्या. आतले नाणे वाजवत ती बायकांच्या घोळक्यामधून तालावर नाचत फिरते.

सावजाची शिकार : या धालो उत्सवातून महिलांच्या विविध कलागुणांचे आपण निरीक्षण करू शकतो. त्यांची नृत्यकला, गायन विषयीचे कौशल्य जाणवते. धालो नृत्यातील गीते सर्वस्पर्शी आणि साहसी असतात. शिकार करणे हाही धालोचा एक प्रकार आहे. सावज मिळावे म्हणून बायका मांडातल्या गुरूला प्रदक्षिणा घालतात. शिकार करण्याचा अभिनय करतात. हे काम ब्राह्मण पती-पत्नीने करावयाचे असते. हा अभिनय बायकाच करतात. त्यावेळी हे गाणे म्हटले जाते-

भिल्ले भिल मोरा

पादरी माझा भुकेला

पादरीच्या गळ्यात सरपळी

पादरी नाचता गोंयच्या हारीर

सावजा मारली एकशें बारा

आर शेऽऽऽ

असे म्हणत पाच प्रदक्षिणा काढतात आणि मगच सावज मिळते. यात सावज बनण्याचे काम मात्र एखादा पाचसहा वर्षांचा अशक्त मुलगा करतो. त्याला कांबळीत लपवून ठेवतात. सावज मिळाले म्हणून बायका आनंदाने बेहोष होऊन नाचत नाचत मांडात घेऊन येतात. संपूर्ण धालो उत्सवाशी पुरुषाचा संबंध एवढाच आहे. हे सावज मारल्यानंतर सर्व गोष्टी प्रतीकरूपाने केल्या जातात. चुडी घेऊन त्या सावजाला फिरवतात. एक नारळ फोडून त्याचा अर्धा भाग सावज झालेल्याला दिला जातो. तो उठून पळ काढतो. उरलेला भाग स्त्रीसमूदायात वाटला जातो.

अभिनयाची संधी बायकांना धालातूनच मिळते. त्यांच्या कलाकौशल्याचे प्रदर्शन होते. धालातून समाजप्रबोधन होते. बायका लोकगीते ताला-ठेक्यावर गातात. त्यांच्या चाली विशिष्ट प्रकारच्या असतात. लोकगीताच्या शब्दांवर स्वरांचे प्रभुत्व असते. लयप्रधान स्वररचनेमुळे लोकगीते दीर्घजीवी झाली आहेत. वनातील वृक्षाप्रमाणे त्यांची मुळे भूतकाळात खोलवर रुजलेली असतात; परंतु तिला नित्यनूतन शाखा, फुले, फळे येत असतात. गोव्यात धालो समूहाने खेळतात, नाचतात, फुगडी घालतात. लोकगीताचे मूळ समूहाच्या संगीतात असते असे मला वाटते.

रंभा : रंभा येणे हा धालोतील महत्त्वाचा भाग आहे. या रंभा फक्त न्हाण न आलेल्या कुमारिकांच्या अंगात येतात. अंग घुसळून नाचता-नाचता त्यांच्या अंगात येते. त्यांच्या अंगात देव संचारलेला आहे असे मानले जाते. मग कुणी त्यांना अडीअडचणी, गार्‍हाणे सांगतात. रंभा पिडानिवारण करण्यासाठी उपायही सुचवतात. हा प्रकार अवसर किंवा भार आल्यासारखा आहे. मांडावर काही ‘भ्रष्टकार’ झाला तर रंभा येत नाही.

कुठल्याही गोष्टीला सुरुवात व शेवट असतेच. जशी सुरुवात गोड होते, तसाच शेवटही गोड व्हावा असे सर्वांनाच वाटते. धालो उत्सवाचा शेवटही फारच गोड होतो. शेवटी फक्त सुवासिनी बायका तेवढ्या उभ्या राहून गाणे म्हणतात-

माथ्याच्या फुलान आमी खेळ खेळयलो

सदीच्या कापडान आमी मेळ मेळयलो

धालो सार्‍या विधी-परंपरा आणि रुढींअनुसार होतात. गोव्याची संस्कृती जपली जाते. गावातल्या जाणकार बायका तरुण पिढीला मार्गदर्शन करतात. शेवटी धरित्रीमातेची प्रार्थना होते. धरित्रीमातेला नाचून खूप त्रास दिला म्हणून क्षमा मागितली जाते. मांडावर शेण सारवले जाते. त्यावेळचे हे गाणे-

शेण कालयात

शेणा पडले किडे रे धालो

आमच्या माथ्यार फुला झेलो

घाला माथ्यार शेणा कालो

आयच्यान धालो सोंपल्यो रे

खंयच्या वाटेन गेलो रे धालो

हे गाणे म्हणत असताना डोक्यातील फुल शेणात टाकले जाते. शेणाचा टिळा कपाळाला लावतात. जमलेल्यांना खोबरे वाटले जाते. दूरवर कुठूनतरी कोंबडा आरवतो. पहाट झाल्याची चाहूल लागते. सर्व महिला आपापल्या घरी जाऊन गार झोपी जातात आणि धालोचा उत्सव संपतो.

धालोगीते सगळ्यांनाच वेड लावतात, मोहिनी घालतात व लोकांच्या अंतःकरणात कायमची ठसतात. या गीतांतून होणारा उत्कट भावनाविष्कार हे त्याचे प्रमुख कारण आहे. स्त्रीमनाने आपला संपूर्ण आत्मा त्या गीतात ओतलेला असतो.

ही धालोगीते ऐकताना कुठेही त्याच्या कर्त्याची जाणीव होत नाही. कारण या गीतांना सामूहिक मनाची पातळी लाभलेली असते. मातृप्रेम, भावा-बहिणींमधील जिव्हाळा, जातकुळीचा अभिमान, देवावरील श्रद्धा, गोव्यातल्या सृष्टिसौंदर्याचे वेड, वात्सल्य, प्रणयाची उत्सुकता, त्याग, सहनशीलता, रसिकवृत्ती आणि पर्यावरणाबद्दल वाटणारी काळजी या विविध भावना धालांच्या गीतांतून व्यक्त होतात.

गोव्यातल्या धालोंना प्रेक्षकवर्ग असतो, पण संख्येने खूप कमी. बायकांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने पुरुषवर्ग सहसा येत नाही. पोरेटोरे असतात. गावात उत्साह असतो. विधीचे महत्त्व असलेला हा उत्सव सारा गाव आपलासा मानतो. त्याची एक वेगळी अस्मिता आहे. कला, अभिनय व नृत्य यांचा मेळ धालो उत्सवाची खास विशेषता आहे. बायका अत्यंत तन्मयतेने आणि तेवढ्याच प्रभावीपणे धालो सादर करतात. त्यांच्या सादरीकरणात विविधता जाणवते. लोकगीतात गोडवा तर नृत्य पद्धतीत लवचीकपणा जाणवतो. तेथे भांडणे होत नाहीत, होतात फक्त धालो.