मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावसाळ्यापूर्वीच्या काळातील नदीच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबतचा अंतरिम अहवाल काल सादर केला. मांडवी नदीत पुलाच्या परिसरात जलप्रदूषण कायम आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, गोवा खंडपीठाने ॲमिकस क्युरी यांना या अहवालाची तपासणी करून प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत. गोवा खंडपीठाने पणजी महानगरपालिका क्षेत्रातील मळा येथील तलावातील मृत मासे प्रकरणाची स्वेच्छा दखल घेतलेली आहे. त्यात मांडवी नदीतील प्रदूषणाचा सुध्दा समावेश करण्यात आला आहे. गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाने पावसाळ्यापूर्वी नदीतील पाण्याचे नमुने गोळा करून तपासणी केली होती. त्यात मांडवी नदीतील पाणी प्रदूषित झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

