मांडवी नदीतही दिसणार कार्निव्हल चित्ररथ

0
6

>> यंदाचा कार्निव्हल अनोखा करण्याचा पर्यटनमंत्र्यांचा मानस

गोव्यातील, विशेष करून पणजी शहरातील यंदाचा कार्निव्हल हा अनोखा आणि ‘न भूतो…’ असा होणार असून, यंदा प्रथमच कार्निव्हलचे जमिनीबरोबरच पाण्यातून व आकाशातूनही दर्शन होणार आहे. यंदा हेलिकॉप्टरही कार्निव्हल मिरवणुकीचा एक भाग असेल. तसेच यावेळी मांडवी नदीतही चित्ररथ असतील, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल दिली.

यंदा 18 फेब्रुवारीपासून कार्निव्हल महोत्सव सुरू होणार असून, 21 फेब्रुवारीपर्यंत तो चालेल. 17 फेब्रुवारी रोजी पर्वरी येथे ‘कर्टन रेझर’ कार्यक्रम होईल. यंदा पणजी, पर्वरी, मडगाव, वास्को, म्हापसा व मोरजी येथे कार्निव्हल मिरवणूक होईल, असे खंवटे यांनी सांगितले. राज्यातील शिगमोत्सव मिरवणुका 8 मार्च ते 21 मार्चपर्यंत चालतील. शिगमोत्सव मिरवणूक फोंडा, डिचोली, म्हापसा, पणजी, पर्वरी, पेडणे, वाळपई, साखळी, कुडचडे, वास्को, मडगाव, सांगे, केपे व काणकोण येथे होतील, अशी माहिती पर्यटनमंत्र्यांनी दिली.