सौ. लक्ष्मी ना. जोग, खडपाबांध – फोंडा
जगात स्त्रीचे महत्त्व लक्षात घेऊन ते सर्वांना सांगणारी, तिच्यावरील आपत्कालात तिला आधार देणारी व मदत देणारी स्त्री संघटना सर्वांत आधी स्थापन झाली तिला सलाम! कारण स्त्रीला स्वसामर्थ्याची खरी ओळख तिने करून दिली होती. तिला जागृत केले होते. मग ती मतदानाचा हक्क मिळवून देण्याविषयी असो किंवा शिक्षित होण्याविषयी असो. तिला आत्मभान आले हे महत्त्वाचे. त्या आधी, ‘‘आलाय ना स्त्री जन्म? मग सगळे सोसणे क्रमप्राप्तच आहे.’’ अशी तिची पक्की समजूत होती. पण स्त्री संघटनांच्या स्त्री हिताच्या कार्यामुळे. ‘‘स्त्री ही सामर्थ्यसंपन्न आहे. तिला समाजात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून तिने स्वत:ला क्षुद्र किंवा क्षुल्लक कधीच समजू नये. अन्याय सहन करू नये.’’ असे प्रेरणादायी विचार हळू हळू रुजू लागले. हे लोण मग जगभर पसरले.
आपल्याकडेही खूप स्त्री संघटना निर्माण झाल्या आहेत. अजूनही होत आहेत. कुटुंबात किंवा समाजात स्त्रीवर्गावर होणार्या अन्यायाच्या ठिकाणी त्या धाऊन जातात. योग्य ती कायवाईही करताना दिसतात. स्त्रीयांवरील अन्यायांचे प्रमाणही दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतेच आहे. कुटुंबात, समाजात, नोकरीच्या ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणी स्त्री हक्क पायदळी तुडवले जात आहेत. हे कमी म्हणून की काय आता प्राथमिक शाळेपासूनच मुलींकडे बघण्याची दृष्टी दूषित होऊन अत्याचार घडत आहेत. भयानक प्रसंगांना अजाण बालिकांनासुद्धा तोंड द्यावे लागत आहे. याचाच परिपोष म्हणजे स्त्री भ्रूण हत्त्या! अशा विकृत वासनांच्या जगात कुठली माता मुलीला जन्म द्यायला धजावेल?
हे सगळं आपण रोजच्या रोज वृत्तपत्रांतही वाचतो व आपल्या आजूबाजूलाही घडताना पाहातो. हे पाहाता स्त्री संघटनांचे काम व जबाबदारी खूपच वाढली असल्याचे स्त्री संघटनांनी कायम लक्षात ठेवले पाहिजे. अग्निशामक सेवा किंवा १०८ क्र. सेवा यांच्याप्रमाणे सदा सज्ज व तत्पर राहिले पाहिजे. कारण परिस्थितीच अशी झाली आहे की, चोर, गुंड, खुनी, अतिरेकी, गुन्हेगार मोकाट सुटले आहेत. त्यांना कुणाचीही भिती राहिलेली नाही. त्यामुळे कधी कोणता अन्याय होईल व धावून जावे लागेल हे सांगता येत नाही. हे झाले सर्रास घडत असलेल्या घटनांबाबत. पण अशा घटना ज्या कारणांमुळे घडतात ती कारणे लहानांपासून मोठ्यांपर्यंत निरनिराळ्या माध्यमातून अक्षरश: कोसळत असतात. सदोदित डोळ्यांसमोर दिसत असतात. पण त्याविषयी कुणीही ब्रसुद्धा काढत नाहीत. या कारणांबाबतही जाब विचारायचा अधिकार अशा संघटनाना असतो. कारण एकट्या दुकट्या स्त्रीची तिथे डाळ शिजत नाही. पण संघटना मात्र त्याचा वापर फारशा करताना दिसत नाहीत. उदा. वृत्तपत्रे व काही मासिकांच्या मुखपृष्ठावरील स्त्रीची अर्धनग्न छायाचित्रे, जाहिरातीत भडकपणे स्त्री अवयव व दृश्य दाखवणे, दुकानांच्या बाहेर उघड्या टांगलेल्या अवस्थेत अंतर्वस्त्रे घातलेल्या कृत्रिम मॉडेल्स, सिनेमांचे मोठे ठळक उत्तान दृश्यांचे पोस्टर्स, प्रत्यक्ष चित्रपटांतील पारदर्शक व अतिशय तोकडे कपडे घातलेल्या नट्या व डान्स करणारी नट्यांची पलटण, टिव्ही मालिकांमध्ये नको त्या दृश्यांना दिलेले महत्त्व, एका पुरुषामागून तोकडे कपडे घालून धावत असलेल्या ललना, असे आणखीही खूप काही सांगता येईल. पण त्यांना विचारतो का कोण? काहीही दाखवा! आम्ही शांतपणे पाहू. ही वृत्ती कधी संपणार आपली? स्त्री संघटनांनी याबाबत पुढाकार घेऊन ते करणार्या (अंगप्रदर्शन) स्त्रियांना व निर्मार्त्यांना जाब विचारून, खडसावून अशा गोष्टींना तीव्र विरोध केला पाहिजे. दुसरे एक म्हणजे हल्ली मालिकांमध्ये पराकोटीच्या मत्सरापोटी गरोदर स्त्रीला छळताना दाखवतात. तिचा गर्भ नाहीसा करण्यासाठी तिच्या नकळत तिला वीषासारखी औषधे देतात. छोट्या बाळांना मारण्याचे कुभांड रचताना दाखवतात. एक स्त्री हे करते, त्याला बाकीचे साथ देतात. हे दाखवून निर्माते काय सूचित करतात? मी म्हणते त्यात काम करणार्या स्त्रिया तरी ते काम करायला नकार का देत नाहीत? स्त्रियांचा अनेक तर्हेनी मानसिक व शारीरिक छळ अशा मालिकांतून दाखवण्याचा निर्मात्यांचा हेतू काय? त्यांचे अनुकरण पहाणार्यांनी करावं? अशा कुटुंबात व समाजात स्त्री प्रतिमा विकृत करणार्या मालिका स्त्री संघटनांनी एकत्र येऊन बंद पाडल्या पाहिजेत. त्यांच्यावर बारीक नजर ठेवून इतर स्त्रियांना हाताशी धरून निर्माते पुन:श्च अशा मालिका निर्माण करणार नाहीत असा धडा त्यांना शिकवला पाहिजे. हल्ली (या आधीही) त्यांना कुणी विचारतच नाहीत. सेंसॉर बोर्ड म्हणजे निवड समितीत स्त्रिया असतातच. पण त्यांनी बहुतेक नोटांची पट्टी डोळ्यांवर बांधलेली असावी. त्यांना हे काहीच कसे दिसत नाही? म्हणून मला वाटतं की स्त्री संघटनांनी, फक्त समाजात घडणार्या अन्याय्य घटनांच्या बरोबरच वरील गोष्टींचाही विचार करावा व एकजुटीने स्त्रीत्वाची बदनामी, विटंबना, छळ होणार्या गोष्टींना कडाडून विरोध करावा. धाक निर्माण करावा.
दिल्ली, वास्को व अन्य बर्याच ठिकाणी ज्या हिडीस, संतापजनक व माणुसकीला काळिमा फासणार्या घटना घडल्या त्यापासून आपण काही बोध घेतला का? नाही! नाहीच!! कारण तो घेतला असता तर त्याबद्दल काहीतरी चांगली कृती घडली असती. दिल्ली व वास्कोच्या संदर्भात तरुण व नागरिक एकत्र आले ते खूप चांगले झाले. त्यांनी निषेध मोर्चे काढले. धरणे धरले. आंदोलने केली व सर्व देश पेटून उठला हे खरे. निषेधाचे अंगारे पेटून थोडी धग विद्यमान सरकारलाही लागली हेही खरे आहे. जनता अगदीच निद्रिस्त नाही हे तरी सर्वांना समजले. पण… त्याची धग थोडी शांत झाल्यावर वातावरण ‘जैसे थे’ वाटते आहे. म्हणजे पेटून उठलेल्यांचा कुठे मागमूसही नाही! दूरऽऽ तिकडे आग लागली होती म्हणे… मला काय त्याचे? त्यांचे ते निस्तरतील! मी एकटी काय करू?’’ अशी वृत्ती दिसते. उत्तान अंगांचा बेताल नाच, डान्स, रेव्ह पार्ट्या, पब, डान्सिग क्लब, कॅब्रे, जाहिरातीतील स्त्रीयांनी उघड्या अंगानी केलेल्या आंघोळी, हे अव्याहतपणे चालूच आहे. तरुण वर्ग तर काय ‘‘नजो–नकळो–ना’’ या कोकणीतील म्हणीप्रमाणे सगळ्याबाबतीत कानांवर हात ठेवून वागतो आहे. बसमध्ये खच्चून असलेल्या गर्दीतून वाट काढताना कंटक्टर जराही मनात संकोच ठेवत नाही. महिलांसाठी राखीव आसनावर उपटसुंभ अतिक्रमण करताहेत. वृद्ध आणि लेकुरवाळ्या मात्र टांगल्याप्रमाणे झेलपटताहेत. पण त्यांना कुणीही उठून जागा देत नाही. रस्त्यावर अनोख्या कैफात प्रचंड वेगाने मोठ्ठा कर्णकर्कश आवाज करीत बाईक अंगाला घसटून नेल्या जात आहेत. त्यामुळे स्त्रिया, वृद्ध यांना जीव मुठीत धरून चालावे लागत आहे. अशा लोकांना पाहिल्यावर त्यांना तिथल्या तिथे खडसावणारी कुणी संघटना असेल तर थोडा तरी आळा बसेल असे वाटते. अशी कामेही स्त्री संघटनानी हाती घ्यायला हरकत नाही.
स्त्री संघटनांवर माझ्या मते आणखी एक महत्त्वाची जबाबदारी असायला हरकत नाही. अर्थात त्यांचे ध्येय्य मनाव कल्याण आणि स्त्री कल्याण असले तर! हल्ली शाळांमधून मुलांना माध्यान्ह आहार म्हणजे मधल्यावेळेचा अल्पोपाहार देतात. हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य आहे हे नि:संशय; पण हा आहार स्वादिष्ट असतो की नाही, बनवतात तिथे कितपत स्वच्छता असते. धान्य व्यवस्थित निवडतात ना? याकडे पुरेसे लक्ष द्यायला हवे. पण ते दिले जात नाही असे बर्याचवेळा आढळून आले आहे. या माध्यान्ह आहाराबाबत अनेक बारीकसारीक विषय अंतर्भूत होतात. यात अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जे कोणी हा आहार तयार करून वितरणाची जबाबदारी घेतात त्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की हा आहार देशाच्या भावी नागरिकांसाठी म्हणजे लहान मुलांसाठी खास करतो आहोत. त्यांत जराही हेळसांड, हयगय, अस्वच्छता, आळस, कसातरीपणा उपयोगाचा नाही. पण हीच साधी पण महत्त्वाची गोष्ट कुणीही लक्षात ठेवत नाहीत. ही अक्षम्य चूक आहे. म्हणूनच त्या आहारात पाळी, झुरळे, किडे आढळतात. या किळसवण्या प्रकारामुळे मुलांना तो नकोसा होतो.
तो चविष्ठही नसतो. याचा परिणाम म्हणजे केलेल्या (शिजवलेल्या) आहारातील जास्तसा भाग वाया जातो. हे नुकसान सरकारला व पर्यायाने आपल्यालाच होत असते. आहार तयार करणार्यावर सरकारचा अंकुश असताना सुध्दा हे प्रकार होतात व दडपलेही जातात. सामान्य नागरिक व पालक थोडे दिवस याची चर्चा करतात व सोडून देतात. कारण व्यस्त दैनंदिनी मुळात आहार तयार करून तो वितरणाची जबाबदारी (हमी) जास्तीकरून महिला स्वयंसहाय्य गट, महिला मंडळे किंवा अन्य उत्साही समाजसेवेची आवड असणार्या महिलाच घेतात. या सगळ्या स्वत: महिला असून सुध्दा त्या त्याबाबत योग्य खबरदारी कशी घेत नाहीत याचेच आश्चर्य वाटते. माता जशी आपल्या मुलांची डोळ्यात तेल घालून काळजी सर्व बाबतीत घेते तशी या एका बाबतीत आपली जबाबदारी कशी विसरतात? म्हणूनच महिला संघटनांनी यावर अभ्यास करून अंकुश ठेवला तर सरकारचा निधी, धान्य व मेहेनत यांचा अपव्यय टळेल व मुलांनाही चांगला माध्यान्ह आहार लाभेल, असे मला वाटते.
म्हणजेच महिला संघटनांनी आता महिलांवरील संकटकाळातच धाऊन जाऊन कार्य करायचे नसून मुलांवर होणार्या अन्यायाबाबतही सतर्क राहाण्याची नितांत गरज उत्पन्न झाली आहे. महिला संघटना सर्वसामान्यपणे प्रत्येक स्त्रीचा आधार असाव्यात. तिनेही अशा संघटनांकडे परकीपणाने किंवा तिर्हाईताप्रमाणे न बघता आपुलकीने बघावे व आपल्या जवळपास समजा कुणा स्त्रीवर अन्याय होत असलेला दिसला तर त्यांच्याशी संपर्क साधावा. फक्त बघ्याची भूमिका घेऊ नये.
खरे म्हणजे प्रत्येक स्त्रीनेच आता बेसावध न राहता ‘खबरदार’ स्थितीत राहायला हवे. रोज शाळा कॉलेजात, नोकरीला जाणारी आपली मुलगी किती ‘सुरक्षित’ आहे हे कळून चुकले आहे. तिला त्रास होणार या भीतीने घरात बसवून ठेऊ शकत नाही व प्रत्येक कडे आपणही तिच्याबरोबर जाऊ शकत नाही. प्रत्येक पुरुषाची नजर भयावह वाटते आहे. प्रत्येकात तिला त्या गुन्हे प्रत्येक आईला आता गारांची सावली दिसते. कुणाचा विश्वासच वाटत नाही. या सगळ्यापासून आपल्या कोवळ्या, जिवापाड जपून मोठ्या झालेल्या एखाद्या नाजूक फुलाप्रमाणे सांभाळलेल्या बाळीला त्याच्यापासून धोका आहे असे तिला वाटते. मग काय करायचे? अशा संभ्रमात ती माता सैरभैर झाली आहे. पण तिने आता हातपाय गाळून चालणार नाही. सक्रिय असलेल्या महिला संघटनांच्या संपर्कात तिने सतत राहिले पाहिजे. आपल्या मुलीत सुप्त असलेली दुर्गा तिने जागवली पाहिजे. वेळ आली तर समोरच्या बदमाशाला धारातीर्थी पाडण्याची क्षमता आपल्या लेकीत निर्माण करावी. मुळूमुळू रडत बसण्याचे दिवस आता संपले. आता लढण्याचे दिवस आहेत याची जाणीव तिने तिला द्यायला हवी. हातात. शस्त्र असले तरी ते चालवण्याचे धैर्य व शक्ती बाईकडे हवी. आम्ही तुझ्या पाठिशी असलो तरी तुझ्या जन्माला पुरणार नाही. म्हणून तू स्वत:चे स्वत:च रक्षण करायला हवेस, असे सांगून तिला स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण किंवा कराटे शिकवायला हवे.
केवळ स्त्री संघटना किंवा स्त्रिया यांचेवरच ही जबाबदारी आटहे असे नाही तर प्रत्येक बाप, पती, मुलगा, मित्र वगैरे प्रत्येकानेच जबाबदारीने वागायला हवे. हल्ली ही नाती सुध्दा वासनातिरेकामुळे बदनाम झालेली आहेत. अनेक कारणामुळे महिला संघटनांची जबाबदारी दिवस दिवस वाढतच आहे. यापुढे जाऊन ती आणखीनच वाढेल की काय हे येणारा काळच ठरवील, अपेक्षा मात्र वाढतच राहणार असे चिन्ह दिसत आहे.
……………….

