पहाटे ६.२० वाजता पर्वरी पोलिसांना एक निनावी फोन आला. मांडवी पुलावर बेतीच्या बाजूने जीए – ०३ – एल – ८४५२ ही प्लेझर स्कूटर व महिलेच्या चपला दिसत असल्याची माहिती त्या अज्ञात व्यक्तीने पोलिसांना दिली.
पर्वरीचे पोलीस निरीक्षक मनोज म्हार्दोळकर यांनी तातडीने एक पोलीस वाहन तेथे प्रत्यक्ष पाहणीसाठी रवाना केले व किनारी पोलीस आणि तटरक्षक दलालाही सूचित केले. उपनिरीक्षक विलेश दुर्भाटकर यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता, हा आत्महत्येचा प्रकार असावा असा संशय त्यांना आला. याचवेळी सदर महिलेचा पती उत्तम कांबळी हा आपल्या पत्नीचा शोध घेत तेथे पोहोचला. त्याने आपल्या पत्नीची स्कूटर आणि चपला ओळखल्या.
आपली पत्नी मुलींसह बेपत्ता झाल्याची माहिती त्याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी नदीत किनारी पोलिसांच्या मदतीने शोध घेतला असता दुपारी १२. २५ च्या सुमारास डॉ. कांबळी यांचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. त्यानंतर कु. तनिष्का या अडीच वर्षांच्या छोट्या मुलीचा मृतदेह दुपारी १.२० च्या सुमारास आढळला. कु. मनस्वी या दुसर्या मुलीच्या मृतदेहाचा शोध संध्याकाळी उशिरापर्यंत घेण्यात येत होता.
या प्रकरणी डॉ. वैशालीच्या पतीशी संपर्क साधला असता घरात सामान्य वातावरण होते. आत्महत्येचे नेमके कारण समजू शकत नाही असा दावा त्याने केला. मात्र, घरगुती भांडणातून हा आत्महत्येचा प्रकार घडला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
सदर डॉक्टर महिलेने कोणतीही चिठी लिहून ठेवल्याचे आढळून आलेले नाही असे पोलिसांनी सांगितले. डॉ वैशाली मडगाव येथील हॉस्पिसिओ रुग्णालयात शल्यचिकित्सक म्हणून कार्यरत होत्या. त्यांचे पती उत्तम कांबळी हे गोमेकॉमध्ये डॉक्टर आहेत. या आत्महत्येमुळे पंचशील कॉम्प्लेक्स तसेच सुकूर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.