परवा झालेल्या राज्य वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीत वरील निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. दि. ८ रोजीच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनी यासंबंधीची अधिसूचना जारी केली जाईल, अशी माहिती वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी दिली. सध्या मिनीबसमध्ये एकूण ८ राखीव जागा होत्या. पैकी ४ महिलांसाठी, २ ज्येष्ठ नागरिकांना व २ विकलांगांना, आता मिनीबसध्ये एकूण १२ राखीव आसने असेल. पैकी ८ महिला, २ ज्येष्ठ नागरिक व २ विकलांगांसाठी असेल. मोठ्या बसेसमध्ये सध्या १२ राखीव आसने होती. पैकी ६ महिला २ ज्येष्ठ नागरिक व २ विकलांग. यापुढे १८ राखीव आसने असेल पैकी १२ महिला, ३ ज्येष्ठ नागरिक व ३ विकलांगासाठी असेल.
वरील नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित प्रवाशाबरोबरच कंडक्टरलाही शंभर रुपये दंड भरावा लागेल, असे देसाई यांनी सांगितले. कंडक्टर व चालकाला ओळखपत्र सक्तीचे तसेच बस मालकांचा दूरध्वनी क्रमांक बसवर लावणे सक्तीचे करण्यात आले असून त्यासाठी त्यांना ३० दिवसांची मुदत देण्यात आली आहे. वरील निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी वेळोवेळी बसेसची तपासणी करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.
पुढील तीन वर्षांच्या काळात १५ वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या बसगाड्या भंगारात काढण्याच्या निर्णयाची सरकारने टप्प्या टप्प्याने अंमलबजावणी करण्याचे ठरविले आहे. तीन वर्षांच्या काळात ३२५ बसेस भंगारात काढाव्या लागेल त्यात खाजगी बसेसबरोबर कदंब महामंडळाच्या बसेसचा समावेश अहे.
राज्य वाहतूक प्राधिकरणाने त्यासाठी कार्यक्रम निश्चित केला आहे. ३० नोव्हेंबर २०१३ रोजी १७ वर्षे पूर्ण झालेल्या बसच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नाही. ३१ मार्च २०१४ नंतर १६ वर्षे पूर्ण झालेल्या बसचा तसेच ३१ मार्च २०१५ रोजी १५ वर्षे पूर्ण झालेल्या बसेसच्या परवान्याचे नूतनीकरण होणार नसल्याचे संचालकांनी सांगितले. बस मालकांना अनुदान देण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करणार असल्याचे सांगण्यात आले.
‘रेन्ट अ बाईक’ला ब्रेक
राज्यातील टॅक्सी, रीक्षा व अन्य संघटनांकडून आलेल्या मागणीची दखल घेऊन वाहतूक खात्याने ‘रेन्ट अ बाईक’ व ‘रेन्ट अ कॅब’ला वर्षभर परवाने न देण्याचा निर्णय घेतल्याचे वाहतूक संचालक अरुण देसाई यांनी काल सांगितले.
राज्यात ५६०० टॅक्सी असून ‘रेन्ट अ बाईक’मुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम होत होता. पर्यटन बस गाड्यांवर इनक्रेडिबल इंडिया असे पेन्ट करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. १००० सीसी क्षमतेच्या कारनाही पर्यटक टॅक्सी म्हणून परवाना देण्याच्या प्रस्तावास राज्य वाहतूक प्राधिकरणाने मान्यता दिली आहे. युनायटेड टॅक्सीमन संघटनेने वरील मागणी केली होती.
राज्यातील बसेस, रीक्षा व मोटरसायकल पायटल भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला. दि. १५ रोजी होणार्या बैठकीत भाडेवाढीचा निर्णय होऊ शकेल, असे वाहतूक संचालकांनी सांगितले. खासगी मालकानी पहिल्या ३ कि. मी.साठी दहा रुपये भाडेवाढ मागतली आहे. राज्य वाहतूक प्राधिकरणाच्या बैठकीस फक्त दोन संघटनांचे प्रतिनिधी होते.
एकूण ७ संघटना असल्याने त्यांनाही विश्वासात घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे देसाई यांनी सांगितले. आफोन्सो नामक एका व्यक्तीने फातर्पे ते पणजी मार्गावर वातानुकुलीत बससेवा सुरू करण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यावर चर्चा होऊन तो फेटळण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले.

