संशयित रशियन नागरिक डिसेंबरमध्ये गोव्यात
पेडणे तालुक्यात विविध ठिकाणी वास्तव्य
रशियन नागरिक आलेक्सेई लिओनोव्ह याने पेडणे तालुक्यात दि. 14 रोजी मधलावाडा मोरजी येथे तर दि. 16 रोजी हरमल बामनभाटी या ठिकाणी दोन रशियन महिलांची हत्या केली. ही हत्या करण्यासाठी संशयित आलेक्सेई याने वापरलेली हत्यारे मांद्रे पोलिसांनी जप्त केली आहेत.
रशियन नागरिक आलेक्सेई लिओनोव्ह याने दि. 14 रोजी मधलावाडा मोरजी येथे एलिना वानिव्हा (37) व दि. 16 रोजी हरमल बामनभाटी येथे एलिना कास्तानोव्हा (37) अशा दोन रशियन महिलांचा गळा चिरून खून केला. मांद्रे पोलिसांनी या प्रकरणी तपास करताना संशयित आलेक्सेई याने या खुनासाठी वापरलेली हत्यारे जप्त केली आहेत.
सदर संशयित रशियन नागरिक आलेक्सेई हा डिसेंबर महिन्यामध्ये गोव्यात आला होता. सुरुवातीला तो हरमल, मांद्रे, मोरजी, कोरगाव अशा वेगवेगळ्या ठिकाणी राहत असे. अनेक रशियन महिलांशी तो मैत्री करत होता. तो एकाच ठिकाणी वास्तव्यास नसल्यामुळे पोलिसांना तपास करताना खूपच अडचणी येत आहेत. त्याच्याकडे व्हिसा आहे की नाही? याचाही शोध मांद्रे पोलीस घेत आहेत.
पुराव्यांचा पोलिसांकडून शोध
आठवड्याभरात आलेक्सेई याने आणखी हत्या केल्या असतील तर त्याचे पुरावे जमवण्यासाठी पोलीस कार्यरत आहेत. आलेक्सेई हा जबानी देताना अधूनमधून आपले शब्द बदलत आहे. त्यामुळे तो नक्कीच सत्य बोलतो की त्याच्या बोलण्यामध्ये तफावत आहे? याचाही अभ्यास पोलीस करत आहेत. यासाठी पोलिसांनी तज्ज्ञ मंडळींची मदत घेत तो सांगत असलेल्या जागेवर पोलीस जात आहेत. परंतु दोन व्यतिरिक्त इतर मृतदेह सापडत नसल्यामुळे आलेक्सेई याने नक्की किती खून केले? याची माहिती पोलिसांनाही उपलब्ध होत नाही.
आलेक्सेई याने नक्की किती खून केले याचा शोध पोलीस घेत आहेत. तो केवळ खोटे प्रेम करायचा. समोरच्या युवतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन तो दुसऱ्या महिलेशी मैत्री करून एक-दोन दिवस तिच्यासोबत राहायचा अशी ही माहिती खात्रीलायक सूत्राकडून उपलब्ध होत आहे. मैत्री केल्यानंतर त्या महिलेशी शारिरीक संबंध ठेवून नंतर तिच्याकडे पैस मागत होता. तिच्यावर शारिरीक अत्याचार करत असे अशीही माहिती उपलब्ध झाली आहे.
मैत्री, विश्वासानंतर पैसे, शारिरीक संबंध व खून
रशियन आलेक्सेई हा दिसायला सुंदर व आकर्षक दिसत होता. त्यामुळे त्याची युवती, महिलांशी सहज मैत्री होत होती. तो मैत्री केल्यानंतर समोरच्या महिलेचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर तिच्याशी शारिरीक संबंध ठेवयाचा व मोठ्या प्रमाणात पैसेही घ्यायचा. तो सतत फिरत होता व एकाच ठिकाणी वास्तव्य करत नव्हता. त्यामुळे तो नेमका कुठे जास्त दिवस राहिला? त्याचाही शोध पोलीस घेत आहेत.
दोन रशियन महिलांची हत्या केल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याने आणखी हत्या केली आहे का? याचा शोध पोलीस घेत आहेत. मात्र सदर रशियन नागरिक आलेक्सेई हा वारंवार आपली जबानी बदल आहे. वेगवेगळ्या जबान्या देत असल्यामुळे पोलिसांना तपास करताना खूप अडचणी येत आहेत. परंतु आलेक्सेई याने अजूनही काही महिलांची हत्या केल्याचा संशय पोलिसांना आहे. मात्र आलेक्सेई याच्या या कृत्यामुळे अनेक रशियन नागरिक व महिला भयभीत झाल्या आहेत.
कायदा, सुव्यवस्था ढासळल्यानेच
रशियन महिलांचे खून ः सरदेसाई
राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याने एका विदेशी नागरिकाने गोव्यात दोन विदेशी महिलांचा खून करण्याचे धाडस केले, असा दावा गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई यांनी एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल केले.
दुहेरी हत्याकांड करणारा व्यक्ती रशियन आहे. त्याने रशियामध्ये कोणालाही मारले नाही, परंतु गोव्यात दुहेरी हत्याकांड केले कारण येथे गोवा एक सुरक्षित राज्य आहे. गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. राज्यात गुन्हेगार पोलिसांना घाबरत नाही, अशी टीका आमदार सरदेसाई यांनी केली.
गोवा हे किनारपट्टीचे राज्य असल्याने दहशतवादाची शक्यता नेहमीच असते. त्यामुळे राज्यात एटीएसची आवश्यकता आहे. संभाव्य धोके टाळण्यासाठी कोणत्याही घटना घडल्या नसल्या तरी एटीएस तैनात केले पाहिजे, असेही आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
राज्याचे पोलीस महासंचालक एटीएस सुरक्षा घेऊन फिरत आहेत की नाही, हे आपणाला माहीत नाही. आपणाला सर्वांत मोठा धोका आहे. कारण, आपण विविध विषयांवर खूप बोलतो. पण, आपण कधीही संरक्षण मागितले नाही, असे आमदार सरदेसाई यांनी सांगितले.
उच्च शिक्षण धोक्यात
गोव्यातील तरुणांचे भविष्य गोवा विद्यापीठावर अवलंबून आहे. खासगी विद्यापीठामुळे गोवा विद्यापीठाचे अस्तित्व तसेच गोव्यातील उच्च शिक्षण धोक्यात आहे, असा आरोप आमदार विजय सरदेसाई यांनी केली. गोव्यातील पर्यावरणाचा अभ्यासक्रम केवळ गोवा विद्यापीठाने चालविला पाहिजे. एखाद्या खासगी विद्यापीठाला गोव्यातील पर्यावरण अभ्यासक्रम देऊ नये. कारण त्यांना गोवा आणि त्याच्या पर्यावरणाची काळजी नाही, अशी टीका आमदार सरदेसाई यांनी केली.