महिलांची बाजी

0
77

भारतीय महिला संघाने काल दक्षिण आफ्रिकेचा पहिल्या टी-२० सामन्यात ७ गडी व ७ चेंडू राखून पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर द. आफ्रिकेने २० षटकांत केवळ ४ गडी गमावून १६४ धावा चोपल्या. क्लो ट्रायोन हिने केवळ ७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ३२ धावा झोडपून यजमानांना आव्हानात्मक धावसंख्या रचून दिली. याव्यतिरिक्त कर्णधार डॅन वॅन निएकर्क (३८), मिगनॉन डुप्रीझ (३१) यांनी वेगाने धावा जमविल्या. भारताकडून अनुजा पाटीलने द. आफ्रिकेच्या धावगतीला लगाम घालताना ४ षटकांत २३ धावांच्या मोबदल्यात २ गडी बाद केले.

विजयासाठी विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना स्मृती मंधाना (१५ चेंडूंत २८) व मिताली राज (४८ चेंडूंत नाबाद ५४) यांनी पहिल्या गड्यासाठी केवळ ४.४ षटकांत ४७ धावांची सलामी दिली. कर्णधार हरमनप्रीत कौर दुर्देवाने एक चेेंड खेळून भोपळाही न फोडता धावबाद झाली. चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या जेमिमा रॉड्रिक्सने कसलेल्या फलंदाजाप्रमाणे मुक्तपणे फटकेबाजी करत पदार्पणाचा दबाव स्वतःवर टाकला नाही. १७ वर्षीय जेमिमाने केवळ २७ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ३७ धावा करत आपले आंतरराष्ट्रीय पदार्पण साजरे केले. वेदा कृष्णमूर्तीने २२ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारासह नाबाद ३७ धावा जमवून मितालीसह भारताचा विजय साकार केला. या सामन्याद्वारे भारताकडून जेमिमाव्यतिरिक्त यष्टिरक्षक फलंदाज तानिया भाटिया, मध्यमगती गोलंदाज पूजा वस्त्राकर व राधा यादव यांनी पदार्पण केले. यजमानांकडून नादिन डी क्लर्क व रायसिबे एन्तोझाके यांनी आपला पहिला टी-२० सामना खेळला. मालिकेतील दुसरा सामना १६ रोजी ईस्ट लंडनच्या बफेलो पार्क मैदानावर खेळविण्यात येणार आहे.