महाराष्ट्र सत्तासंघर्ष प्रकरणी पुढील सुनावणी २७ सप्टेंबरला

0
33

शिवसेनेच्या धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या हक्कासंदर्भात आदेश देण्यास नकार देत बुधवारी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने ही सुनावणी २७ सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलली. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाला २० दिवसांनी होणार्‍या सुनावणीपर्यंत कोणताही ठोस निर्णय घेता येणार नाही. न्यायालयाची सुनावणी पुढे गेल्यामुळे उद्धव ठाकरे गटाला तूर्त दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला २३ सप्टेंबरपर्यंत निवडणूक चिन्हांच्या हक्कासंदर्भात भूमिका मांडण्यासाठी मुदत दिली होती. या मुदतीत ठाकरे गटाला संबंधित कागदपत्रे सादर करावी लागतील व युक्तिवाद करावा लागेल. न्यायालयासमोर ठाकरे गटाला आपले म्हणणे मांडता येणार असले तरी, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी २७ सप्टेंबर रोजी असल्याने उर्वरित चार दिवसांमध्ये आयोगाला ठोस आदेश काढता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीमध्ये होणार्‍या निर्णयानंतर निवडणूक आयोग चिन्हाच्या हक्कासंदर्भात आदेश देऊ शकेल. त्यामुळे २७ सप्टेंबरनंतर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होण्याची शक्यता असून, शिंदे व ठाकरे गटांना युक्तिवाद करून निवडणूक चिन्हावर आपलाच हक्क असल्याचे पटवून द्यावे लागेल.