मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या आदेशानुसार भोम येथे मंगळवारी सकाळी पोलीस बंदोबस्तात बांधकाम खात्याच्या अभियंत्यांनी महामार्गासाठी आरेखन केले. स्थानिक लोकांचा या महामार्गाला विरोध असल्याने काल भोम येथे या आरेखनाच्या वेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आपल्या गावातून हा महामार्ग जाण्यास त्यांचा विरोध असून सरकारने बगलमार्गाची व्यवस्था करावी, अशी त्यांची मागणी आहे.
फक्त 4 घरे जाणार असल्याचा दावा करणाऱ्या सरकारने यापूर्वी भोम गावातील 40 जणांना पाठवलेल्या नोटिसा, 6 पदरी रस्त्यासाठी फक्त 25 मीटर जागा संपादन कसे, आरेखनावेळी उड्डाणपुलाच्या खांबाची माहिती देण्यास अभियंत्यांचा नकार यामुळे स्थानिक लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती वाढ झाली आहे. उड्डाणपुलाऐवजी बगल रस्त्याच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम असून, गरज पडल्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपली बाजू मांडण्याचा विचार ग्रामस्थांनी चालवला आहे.
या मुद्द्यावर भोम ग्रामस्थांनी सोमवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची भेट घेतली होती. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी बांधकाम खात्याच्या अभियंत्यांना ग्रामस्थांना आरेखन दाखवून देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार बांधकाम खात्याच्या राष्ट्रीय महामार्ग विभागाचे वरिष्ठ अभियंते दत्तप्रसाद कामत, कार्यकारी अभियंता सत्येंद्र भोबे, सहाय्यक अभियंता चंदा परवार व अन्य अभियंत्यांनी आरेखन करण्यात सुरुवात केली. त्यावेळी अभियंत्यांनी काही ठिकाणी 25 मीटर, तर काही ठिकाणी 60 मीटर जागेचे आरेखन केले.
बांधकाम खात्याने देखील यापूर्वी न्यायालयात 60 मीटर रस्ता उभारण्याचे पत्र सादर केले आहे. आरेखनावेळी रस्त्याच्या बाजूला असलेल्या मुख्य मंदिराच्या आवारात सुद्धा मोजमापन करण्यात आले. तसेच मंदिरासमोरील तळी सुद्धा आरेखन केलेल्या क्षेत्रात येत असल्याचे उघड झाले. त्यामुळे ग्रामस्थांनी उड्डाण पुलाऐवजी बगल रस्ता उभारावा, अशी मागणी लावून धरली. याशिवाय उपस्थित अभियंत्यांकडे उड्डाणपुलाच्या खांबांसंबधी माहिती देण्याची मागणी लोकांनी केली; पण ती माहिती देण्यास अभियंत्यांनी नकार दिला.
भोम गावातून सहहापदरी रस्ता उभारण्यात येणार आहे. परिसरातील फक्त चार घरे जाणार असून, त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात येणार सहाय्यक अभियंता चंदा परवार यांनी असल्याचे सांगितले.
दरम्यान, भोम पंचायतचे नवनिर्वाचित सरपंच सुनील नाईक यांनी यावेळी ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले.
भोमवासियांशी पुन्हा चर्चा करणार : मुख्यमंत्री
जुने गोवे ते भोम या 7 किलोमीटर लांबीच्या प्रस्तावित महामार्ग प्रश्नी आपण पुन्हा एकदा भोम येथील ग्रामस्थांशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल स्पष्ट केले. एकदा अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष प्रकल्पस्थळी हजर राहून लोकांसमक्ष आरेखन केले आणि त्यांना नेमकी माहिती मिळाली की ते चर्चेसाठी पुन्हा आपणाकडे चर्चेसाठी येऊ शकतात हे आपण त्यांना यापूर्वीच कळवले असल्याचे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. सरकारने चर्चेचा मार्ग खुला ठेवला आहे, असे मुख्यमंत्र्यांनी पुढे नमूद केले.